

कोलंबो : टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी श्रीलंका-न्यूझीलंड आमनेसामने येतील. दोन्ही संघांना सुपर-आठ फेरीतील आव्हान कायम राखण्यासाठी ही लढत जिंकणे गरजेचे आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना होणार असून लढतीवर पावसाचे अजिबात सावट नाही.
भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदाही गेल्या वेळेप्रमाणे २० संघ सहभागी झाले आहेत. भारत २०१६नंतर प्रथमच टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. रोहितच्या नेतृत्वात २०२४मध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावला होता.
या स्पर्धेत साखळी फेरीसाठी प्रत्येकी पाच संघांचा एक असे चार गट बनवण्यात आले होते. त्यांपैकी अ-गटातून भारत, पाकिस्तान, ब-गटातून झिम्बाब्वे, श्रीलंका, क-गटातून वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि ड-गटातून दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड यांनी आगेकूच केली. आता सुपर-आठ फेरीत दोन गट तयार करण्यात आले आहेत. यांपैकी पहिल्या गटात भारत, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज व दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. दुसऱ्या गटात पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड, न्यूझीलंड हे संघ आहेत. या फेरीत आघाडीवर असलेले दोन संघ उपांत्य फेरी गाठतील.
दरम्यान, मिचेल सँटनरच्या नेतृत्वात आणि रॉब वॉल्टरच्या प्रशिक्षणात खेळणाऱ्या न्यूझीलंडचा पहिला सुपर-आठ सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे त्यांना व पाकिस्तानला एकेक गुण देण्यात आला होता. टिम सेईफर्ट, ग्लेन फिलिप्स, डॅरेल मिचेल यांच्यावर किवी संघाची भिस्त असून गोलंदाजीत मॅट हेन्री, जेकब डफी व फिरकीपटू इश सोधी निर्णायक ठरू शकतात.
दुसरीकडे दसुन शनकाच्या नेतृत्वात व सनथ जयसूर्याच्या मार्गदर्शनाखाली खेळताना श्रीलंकेने साखळीत चांगली कामगिरी केली होती. मात्र सुपर-आठ फेरीच्या पहिल्या लढतीत त्यांना इंग्लंडकडून दारुण पराभव पत्करावा लागला. सलामीवीर पथुम निसांका, कुशल मेंडिस यांच्याकडून त्यांना फलंदाजीत अपेक्षा आहे. गोलंदाजीत फिरकीपटू महीष थिक्षणा, दुशन हेमंता यांच्यावर मदार असेल.
प्रतिस्पर्धी संघ
श्रीलंका : दसुन शनका (कर्णधार), कुशल मेंडिस, पथुम निसांका, दुश्मंता चमिरा, दुनिथ वेल्लालागे, कामिंदू मेंडिस, कामिल मिशारा, पवन रत्नायके, कुशल परेरा, महीष थिक्षणा, चरिथ असलंका, मथीशा पाथिराना, जनिथ लियांगे, इशान मलिंगा, दुशन हेमंता.
न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), रचिन रवींद्र, कायले जेमिसन, फिन ॲलन, मॅट हेन्री, ग्लेन फिलिप्स, जेकब डफी, टिम सेईफर्ट, जेम्स नीशाम, इश सोधी, लॉकी फर्ग्युसन, डॅरेल मिचेल, मार्क चॅपमन, डेवान कॉन्वे, कोल मॅकोन्ची.