ICC T20 World Cup 2026 : बुमराला पॉवरप्लेमध्ये किमान दोन षटके द्यावी! गावस्करांचा उपांत्य लढतीसाठी भारताला सल्ला

भारताने इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य लढतीत जसप्रीत बुमराला पॉवरप्लेमध्ये दोन षटके गोलंदाजी द्यावी, असा सल्ला माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी दिला आहे.
बुमराला पॉवरप्लेमध्ये किमान दोन षटके द्यावी! गावस्करांचा उपांत्य लढतीसाठी भारताला सल्ला
बुमराला पॉवरप्लेमध्ये किमान दोन षटके द्यावी! गावस्करांचा उपांत्य लढतीसाठी भारताला सल्लाPhoto : BCCI
Published on

मुंबई : भारताने इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य लढतीत जसप्रीत बुमराला पॉवरप्लेमध्ये दोन षटके गोलंदाजी द्यावी, असा सल्ला माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी दिला आहे.

भारत-इंग्लंड यांच्यात गुरुवार, ५ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर उपांत्य सामना रंगणार आहे. २०२४मध्ये भारताने इंग्लंडला उपांत्य फेरीतच नमवले होते. यंदा पुन्हा हे दोन संघ आमनेसामने येत आहेत. एकीकडे भारताने सुपर-आठ फेरीत तीनपैकी दोन सामने जिंकून आगेकूच केली, तर इंग्लंडने त्यांच्या गटात सुपर-आठ फेरीतील तिन्ही लढती जिंकून अग्रस्थानासह उपांत्य फेरी गाठली.

भारताने वानखेडेवर विश्वचषकातील सलामीचा म्हणजेच अमेरिकेविरुद्धचा सामना खेळला होता. त्यावेळी खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी पोषक होती. तसेच इंग्लंडने वानखेडेवर वेस्ट इंडिज आणि नेपाळ यांच्याविरुद्ध लढती खेळल्या. त्यांपैकी नेपाळविरुद्ध त्यांनी शेवटच्या षटकात बाजी मारली, तर वेस्ट इंडिजकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आता उभय संघांतील द्वंद्वात कोण बाजी मारणार, याकडे लक्ष असेल.

“बुमराला भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध पॉवरप्लेमध्ये एकच षटक दिले. तेसुद्धा त्याला पाचव्या षटकात गोलंदाजीसाठी आणले. मात्र इंग्लंडविरुद्ध वानखेडेवर त्याने पॉवरप्लेमध्ये किमान दोन षटके गोलंदाजी करणे गरजेचे आहे. बुमराने जर फिल सॉल्ट, जॉस बटलर, हॅरी ब्रूक यांपैकी दोन फलंदाजांना तेव्हाच माघारी पाठवले, तर पुढील कार्य अधिक सोपे होईल,” असे गावस्कर म्हणाले.

आफ्रिकाविरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर बुमराने पॉवरप्लेमध्ये दोन षटके गोलंदाजी केली होती. त्यावेळी त्याने क्विंटन डीकॉक व रायन रिकल्टनला बाद केले. या लढतीत भारत पराभूत झाला. मात्र गावस्करांनी तो मुद्दा अधोरेखित केला.

“बुमराला भारताने पहिल्या किंवा दुसऱ्या षटकातच गोलंदाजीसाठी आणले पाहिजे. त्याची चार षटके निर्णायक असल्याने तुम्ही त्याला अखेरच्या षटकांसाठी राखून ठेवता, याची मला कल्पना आहे. मात्र पॉवरप्लेमध्ये प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज स्थिरावले व त्यांनी आक्रमक खेळ केला, तर बुमरावरही दडपण येईल. त्या उलट पॉवरप्लेमध्ये बुमराला ते सावध खेळून काढण्याच्या प्रयत्नात बाद होण्याची शक्यता आहे,” असे गावस्कर यांनी सांगितले.

२०२४च्या टी-२० विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या बुमराने यंदा ६ सामन्यांत ९ बळी मिळवले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in