

मुंबई : गटसाखळीत पूर्णपणे दबदबा गाजवल्यानंतर आता वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. वानखेडे स्टेडियमवर सोमवारी रंगणाऱ्या या सामन्यात झिम्बाब्वेचा विजयरथ रोखण्याचे आव्हान वेस्ट इंडिजला पेलावे लागणार आहे.
झिम्बाब्वेने श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि ओमान यांना पराभूत करत ब गटात वर्चस्व गाजवले. त्यांची आयर्लंडविरुद्धची लढत पावसामुळे होऊ शकली नाही. त्यामुळे झिम्बाब्वेने ७ गुणांसह ब गटात अग्रस्थान पटकावले. वेस्ट इंडिजने इंग्लंड, स्कॉटलंड, इटली आणि नेपाळ यांचा धुव्वा उडवत चारही विजयांसह ८ गुणांनिशी क गटात अग्रस्थान प्राप्त केले. ब आणि क गटातील अग्रस्थानी राहिलेले हे दोन्ही संघ सोमवारी वानखेडे स्टेडियमवर उपांत्य फेरीतील जागा निश्चित करण्यासाठी उत्सुक असतील.
डॅरेन सॅमीच्या नेतृत्वाखाली दोन वेळा टी-२० वर्ल्डकप पटकावणाऱ्या वेस्ट इंडिजच्या संघात सातत्याचा अभाव जाणवतो. यावेळी शाय होप वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व सांभाळत आहे, मात्र गटसाखळीत चारही सामने जिंकले असले तरी आता त्यांची खरी लढाई सुरू झालेली आहे. शाय होपला (दोन अर्धशतकांसह १५५ धावा) सूर गवसला असून शिमरॉन हेटमायर (१३४) हासुद्धा फॉर्मात आहे. जेसन होल्डर (७ विकेट्स) आणि रॉस्टन चेस गोलंदाजीत चमक दाखवत आहेत. शेरफाने रुदरफोर्ड (१२६ धावा) यानेही चांगले योगदान दिले आहे. रोमारियो शेफर्ड (६ विकेट्स) यांच्याकडून विंडीजला अष्टपैलू कामगिरीची अपेक्षा आहे. दुसरीकडे, झिम्बाब्वेने सर्व क्रिकेटपंडितांचे अंदाज फोल ठरवून थाटात सुपर-८ फेरी गाठली आहे. मात्र आता सुपर-८ फेरीत त्यांच्या गटात विंडीजसह दक्षिण आफ्रिका आणि भारताचा समावेश असल्यामुळे कामगिरी उंचावण्याचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे. युवा फलंदाज ब्रायन बेनेट याने दोन अर्धशतकांसह १७५ धावा केल्या आहेत.
प्रतिस्पर्धी संघ
वेस्ट इंडिज : शाय होप (कर्णधार), शिम्रॉन हेटमायर, मॅथ्यू फोर्ड, अकील होसेन, रॉस्टन चेस, रोमारिओ शेफर्ड, जॉन्सन चार्ल्स, जेडन सील्स, क्वेंटिन सॅम्पसन, रोवमन पॉवेल, ब्रँडन किंग, गुडाकेश मोटी, शर्फेन रुदरफोर्ड, शामर जोसेफ, जेसन होल्डर.
झिम्बाब्वे : सिकंदर रझा (कर्णधार), बेन कुरान, क्लाइव्ह मदांडे, ताडीवानाशे मारूमनी, डिऑन मेयर्स, ब्रायन बेनेट, रायन बर्ल, ब्रॅड इव्हान्स, टोनी मुनयोंगा, ताशिंगा मुसेकिवा, ग्रॅमी क्रेमर, टिनोटेंडा मपोसा, वेलिंग्टन मसाकद्झा, ब्लेसिंग मुझाराबानी, रिचर्ड गारवा.
सामन्याची वेळ : सायं. ७ वाजल्यापासून.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क.