ICC च्या कसोटी क्रमवारीत अश्विन पुन्हा अग्रस्थानी; 'या' भारतीय गोलंदाजाची घेतली जागा; कारकीर्दीत तब्बल ६ व्यांदा मिळवले अव्वल स्थान

भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने बुधवारी जागतिक कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अग्रस्थानी झेप घेतली.
ICC च्या कसोटी क्रमवारीत अश्विन पुन्हा अग्रस्थानी; 'या' भारतीय गोलंदाजाची घेतली जागा; कारकीर्दीत तब्बल ६ व्यांदा मिळवले अव्वल स्थान
Published on

दुबई : भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने बुधवारी जागतिक कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अग्रस्थानी झेप घेतली. कारकीर्दीत तब्बल सहाव्यांदा अश्विनने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले, हे विशेष. अश्विन अग्रस्थानी आल्यामुळे तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराची मात्र दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.

३७ वर्षीय अश्विनने गेल्या आठवड्यात धरमशाला येथील इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत ९ बळी पटकावले. अश्विनच्या कारकीर्दीतील हा १००वा कसोटी सामना होता. अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या पाच लढतींमध्ये सर्वाधिक २६ गडी बाद केले. मालिका सुरू होण्यापूर्वी अश्विन दुसऱ्या स्थानी होता. मात्र आता त्याने ८७० गुणांसह अग्रस्थान काबिज केले आहे. अश्विनने भारताच्याच बुमरावर सरशी साधली. बुमरा सध्या ८४७ गुणांसह ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडसह संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. हेझलवूडने नुकताच न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ६ बळी मिळवून दोन स्थानांनी आगेकूच केली. बुमराने जानेवारीत अग्रस्थान मिळवले होते. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत त्याला विश्रांती देण्यात आली, तर पाचव्या लढतीत बुमराने दोनच बळी मिळवल्याने त्याची दुसऱ्या स्थानी घसरण झाली.

याव्यतिरिक्त, डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा सातव्या स्थानी कायम आहे. चायनामन कुलदीप यादवने १६ स्थानांची झेप घेत १५वा क्रमांक पटकावला. अष्टपैलूंच्या क्रमवारीत जडेजा आणि अश्विन हे दोन्ही भारतीयच अनुक्रमे पहिल्या दोन स्थानांवर विराजमान आहेत.

फलंदाजीत रोहित सहाव्या स्थानी

जागतिक कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा कर्णधार रोहित शर्माने सहावे स्थान काबिज केले. काही आठवड्यांपूर्वी रोहितची १०पेक्षाही खालच्या स्थानी घसरण झाली होती. मात्र इंग्लंडविरुद्ध दोन शतके झळकावून त्याने आता ७५१ गुणांसह सहावा क्रमांक पटकावला आहे. भारतीय फलंदाजांचा विचार करता तोच सध्या या शर्यतीत आघाडीवर आहे. न्यूझीलंडचा केन विल्यम्सन या यादीत अग्रस्थानी आहे. त्याशिवाय भारताच्या यशस्वी जैस्वालने १०व्या स्थानावरून आठव्या, तर शुभमन गिलने ३१व्या स्थानावरून २०वा क्रमांक मिळवला आहे.

यशस्वी फेब्रुवारीतील सर्वोत्तम खेळाडू

मुंबईचा २२ वर्षीय फलंदाज यशस्वी जैस्वालची फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून आयसीसीकडून निवड करण्यात आली. यशस्वीने फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दोन द्विशतके झळकावली होती. त्याने केन विल्यम्सन व पथुम निसांका या फलंदाजांवर सरशी साधून हा पुरस्कार पटकावला. यशस्वीने इंग्लंडविरुद्ध पाच कसोटींमध्ये तब्बल दोन द्विशतकांसह ७१२ धावा कुटताना मालिकावीर पुरस्कार पटकावला होता. तसेच कारकीर्दीतील १,००० धावांचा टप्पाही त्याने ९ कसोटींमध्येच गाठला.

सहाव्यांदा अग्रस्थानी

अश्विनने कारकीर्दीत तब्बल सहाव्यांदा क्रमवारीत अग्रस्थान मिळवले. डिसेंबर २०१५मध्ये त्याने सर्वप्रथम पहिला क्रमांक पटकावला होता.

logo
marathi.freepressjournal.in