
दुबई : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचा सर्वकालीन रेटिंग-पॉइंटचा विक्रम मोडित काढला. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीवरून बुमराच्या खात्यात ९०७ रेटिंग पॉइंट आहेत.
अश्विनने डिसेंबर २०१६ मध्ये सर्वाधिक ९०४ रेटिंग पॉइंट मिळवले होते. हा विक्रम बुमराने मागे टाकला. बॉर्डर- गावस्कर कसोटी मालिकेतील मेलबर्न येथे झालेल्या कसोटीत बुमराने ९०४ रेटिंग पॉइंट मिळवत अश्विनच्या विक्रमाशी बरोबरी केली होती.
तसेच मेलबर्न कसोटीत बुमराने ९ विकेट मिळवल्या होत्या. त्यामुळे कसोटी गोलंदांच्या क्रमवारीतील अव्वल स्थान त्याने अधिक भक्कम केले आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने मेलबर्न कसोटीत ६ विकेट मिळवत १५ रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. तसेच चौथ्या कसोटीच्या दोन्ही डावांत मिळून ९० धावा जमवल्याने त्याने अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत तिसरे स्थान गाठले आहे.
सलामीवीर यशस्वी जयस्वालने बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ८२ धावांची खेळी खेळत ८५४ रेटिंग पॉइंटसह चौथे स्थान पटकावले. पहिल्या कसोटी शतकामुळे नितीश कुमार रेड्डीला २० स्थानांचा फायदा झाला असून त्याने कसोटी फलंदाजांच्या यादीत ५३व्या स्थानी झेप घेतली आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर - गावस्कर मालिका सुरू असून भारतीय संघ १-२ असा पिछाडीवर आहे. जसप्रीत बुमराने मात्र या मालिकेत प्रभावी गोलंदाजी केली आहे. चार कसोटी सामन्यांनंतर बुमराच्या खात्यात ३० विकेट आहेत. मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम त्याच्याच नावे आहे.