U19 WC: भारताचा रोमहर्षक विजय, ४ बाद ३२ परिस्थितीतून सचिन-उदयची जिगरबाज खेळी; ९ व्यांदा अंतिम फेरीत धडक

महाराष्ट्राचा सचिन धस आणि कर्णधार उदय सहारन यांनी साकारलेल्या जिगरबाज अर्धशतकांच्या बळावर भारताने सलग पाचव्यांदा युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.
U19 WC: भारताचा रोमहर्षक विजय, ४ बाद ३२ परिस्थितीतून सचिन-उदयची जिगरबाज खेळी; ९ व्यांदा अंतिम फेरीत धडक
(सचिन धस आणि उदय सहारन)

बेनोनी : महाराष्ट्राचा सचिन धस (९५ चेंडूंत ९६ धावा) आणि कर्णधार उदय सहारन (१२४ चेंडूंत ८१ धावा) यांनी साकारलेल्या जिगरबाज अर्धशतकांच्या बळावर भारताने सलग पाचव्यांदा युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. अटीतटीच्या उपांत्य सामन्यात भारताने यजमान दक्षिण आफ्रिकेवर २ गडी आणि ७ चेंडू राखून मात केली. आता रविवारी भारताची पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील विजेत्याशी गाठ पडेल.

विलीमोर पार्क येथे झालेल्या या उपांत्य लढतीत आफ्रिकेने दिलेले २४५ धावांचे लक्ष्य भारताने ४८.५ षटकांत आठ फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची एकवेळ ४ बाद ३२ अशी केविलवाणी अवस्था होती. डावखुरा वेगवान गोलंदाज क्वेना मफकाने सलीमीवीर आदर्श सिंगला पहिल्याच चेंडूवर माघारी पाठवले. त्यानंतर ट्रिस्टन लूसने महाराष्ट्राचा अर्शीन कुलकर्णी (१२), मुंबईकर मुशीर खान (४), प्रियांशू मोलिया (५) या तिघांना बाद करून भारताची दाणादाण उडवली.

४ बाद ३२ अशा स्थितीतून सचिन व उदय यांची जोडी जमली. नेपाळविरुद्धच्या लढतीत या दोघांनी द्विशतकी भागीदारी रचतानाच शतके साकारली होती. यावेळी सचिनने काहीसा आक्रमक, तर उदयने संयमी खेळ केला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी तब्बल १७१ धावांची निर्णायक भागीदारी रचली. ही जोडी भारताला विजय मिळवून देणार असे वाटत असतानाच सचिन बाद झाला. त्याला सलग दुसऱ्या शतकाने हुलकावणी दिली. मात्र सचिनने ११ चौकार व १ षटकारासह ९६ धावा करताना संघाला विजयासमीप नेले.

अरावेल्ली अविनाश (१०), मुरुगन अभिषेक (०) स्वस्तात माघारी परतल्यामुळे सामन्यात रंगत निर्माण झाली. त्यातच उदयसुद्धा ८१ धावांवर धावचीत झाला. त्याने ६ चौकार लगावले. मात्र राज लिंबानीने ४ चेंडूंतच नाबाद ११ धावा फटकावून भारताचा विजय साकारला. राजनेच ४९व्या षटकातील पाचव्या चेंडूवर विजयी चौकार लगावला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेने ५० षटकांत ७ बाद २४४ अशी धावसंख्या उभारली. सलामीवीर लुआन प्रिटोरियस (७६) व रिचर्ड सेलेट्सवेन (६४) यांनी अर्धशतके झळकावली. भारताकडून वेगवान गोलंदाज राजने तीन, तर फिरकीपडू मुशीरने दोन बळी मिळवले.

सलग ५ व्यांदा आणि एकूण ९ व्यांदा अंतिम फेरी-

भारताने सलग पाचव्यांदा आणि एकंदर नवव्यांदा युवा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. यांपैकी २०१८, २०२२मध्ये भारताने विजेतेपद मिळवले. तर २०१६ व २०२०मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

संक्षिप्त धावफलक

दक्षिण आफ्रिका : ५० षटकांत ७ बाद २४४ (लुआन प्रिटोरियस ७६, रिचर्ड सेलेट्सवेन ६४; राज लिंबानी ३/६०, मुशीर खान २/४३) पराभूत वि.

भारत : ४८.५ षटकांत ८ बाद २४८ (सचिन धस ९६, उदय सहारन ८१; क्वेना मफका ३/३२, ट्रिस्टन लूस ३/३७)

सामनावीर : उदय सहारन

logo
marathi.freepressjournal.in