वेळापत्रकातील बदलास पाकिस्तानची सहमती

भारत-पाकिस्तान सामन्याच्या तारखेबाबत आयसीसी लवकरच करणार अधिकृत घोषणा
वेळापत्रकातील बदलास पाकिस्तानची सहमती

पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) प्रस्ताव मान्य केला आहे. त्यांनी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील वेळापत्रक बदलण्यास हिरवा कंदील दर्शवल्याने भारत-पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज मुकाबला शनिवार, १४ ऑक्टोबरला रंगण्याची शक्यता आहे. आयसीसी पुढील काही दिवसांत याविषयी अधिकृत घोषणा करणार आहे.

भारतात यंदा ५ ऑक्टोबरपासून एकदिवसीय विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. तर भारत-पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी १५ ऑक्टोबर म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार होते. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही लढत होईल. परंतु नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर या दिवशी सुरक्षेची समस्या उद्भवण्याची शक्यता असल्याने सुरक्षा संस्थांनीच ही लढत एक दिवस अगोदर खेळवण्याचे बीसीसीआयला सुचवले. त्यामुळे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी आयसीसीसोबत झालेल्या बैठकीनंतर पाकिस्तानकडे तारीख बदलण्याबाबतचा प्रस्ताव मांडला.

पाकिस्तानने हा प्रस्ताव मान्य केला आहे. त्यानुसार ते १४ तारखेला भारताविरुद्ध खेळतील. तसेच १२ ऑक्टोबरला श्रीलंकेविरुद्ध होणारी त्यांची लढत दोन दिवस अगोदर म्हणजेच १० तारखेला खेळवण्यात येईल. यामुळे दोन्ही संघांना १४ ऑक्टोबरच्या लढतीकरता सराव करण्यास पुरेसा वेळ मिळेल. भारतीय संघ ११ तारखेला अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे.

दरम्यान, १४ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड-बांगलादेश लढत चेन्नईत होणार असून, इंग्लंड-अफगाणिस्तानसुद्धा त्याच दिवशी दिल्ली येथे आमनेसामने येतील. त्यामुळे या सामन्यांबाबतही आयसीसीला निर्णय घ्यावा लागणार आहे. तसेच सध्याच्या वेळापत्रकानुसार १० ऑक्टोबरला इंग्लंड-बांगलादेश आमनेसामने येणार असून ही लढत अन्य दिवशी होण्याची शक्यता आहे.

कपिल यांचे बीसीसीआयवर टीकास्त्र

भारताचे विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी बीसीसीआयच्या नियोजनावर खडाडून टीका केली आहे. भारतीय संघाला विश्वचषकात सर्वाधिक ९ शहरांत खेळताना प्रचंड प्रवास करावा लागणार आहे. तसेच वेळापत्रकातील गदारोळावरूनही कपिल यांनी बीसीसीआयला फटकारले आहे. “भारत विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे, तरीही भारतीय संघालाच विश्वचषकात सर्वाधिक प्रवासा करावा लागणार आहे. याचा कुठे ना कुठे तरी भारताला फटका बसू शकतो. त्याशिवाय एवढ्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन करताना बीसीसीआयने १५ ऑक्टोबर रोजी नवरात्री सुरू होत असल्याचा आढावा घेतला नाही का? तसेच अहमदाबादमध्येच ही लढत खेळवण्याचा अट्टाहास का?,” असे प्रश्न कपिल यांनी विचारले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in