

दुबई : एकीकडे पुरुषांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा थरार उपांत्य फेरीच्या टप्प्यावर असतानाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी महिलांच्या टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रकही जाहीर केले. इंग्लंड येथे १२ जून ते ५ जुलै २०२६ या कालावधीत महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा १०वा हंगाम रंगणार आहे. या स्पर्धेत चाहत्यांना पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यातील द्वंद्व पाहायला मिळणार आहे. १४ जून रोजी एजबॅस्टन येथे भारत-पाकिस्तानचे महिला संघ आमनेसामने येतील.
सध्या भारत आणि श्रीलंका येथे पुरुषांच्या टी-२० विश्वचषकाचा थरार सुरू आहे. त्यानंतर जून-जुलै महिन्यात क्रीडाप्रेमींना महिलांच्या टी-२० विश्वचषकाचा आनंद लुटता येईल. २००९पासून आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेत यंदा प्रथमच १२ संघ सहभागी झाले आहेत. २०२४च्या टी-२० विश्वचषकात १० संघ होते. त्यावेळी न्यूझीलंडने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला नमवून प्रथमच विश्वचषक उंचावला होता. आतापर्यंतच्या नऊ पर्वांमध्ये ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक ६ वेळा टी-२० विश्वचषकाचे जेतेपद मिळवले आहे. तर वेस्ट इंडिज, इंग्लंड यांनीदेखील प्रत्येकी एकदा ही स्पर्धा जिंकली आहे. त्यामुळे भारताला अद्याप पहिल्या टी-२० जेतेपदाची प्रतीक्षा आहे.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारताने गतवर्षी ऐतिहासिक महिलांच्या एकदिवसीय विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले. सध्या भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. टी-२० विश्वचषकातही हरमनप्रीतच भारताचे नेतृत्व करणे अपेक्षित आहे. नुकताच भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत टी-२० मालिकेत २-१ असे पराभूत केले. विश्वचषकासाठी भारताचा अ-गटात समावेश असून त्यांना ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, बांगलादेश व नेदरलँड्स यांच्याविरुद्ध लढती खेळायच्या आहेत. ब-गटात इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका, स्कॉटलंड, आयर्लंड हे संघ असतील. दोन्ही गटांतून आघाडीचे दोन संघ थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. तर अन्य चार संघ साखळीतच गारद होतील. भारताला ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, पाकिस्तान यांसारख्या संघांचा सामना करायचा आहे. त्यामुळेच भारतापुढील आव्हान खडतर असेल, असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
या स्पर्धेसाठी ८ संघ थेट पात्र ठरले. त्यासाठी क्रमवारीचा तसेच गेल्या टी-२० विश्वचषकातील अव्वल पाच संघांचा आढावा घेण्यात आला. इंग्लंड यजमानपद भूषवत असल्याने ते थेट पात्र ठरले. मग पात्रता फेरीद्वारे बांगलादेश, स्कॉटलंड, आयर्लंड, नेदरलँड्स यांनी मुख्य विश्वचषकाचे तिकीट मिळवले. १२ जून रोजी इंग्लंड विरुद्ध श्रीलंका लढतीने विश्वचषक सुरू होईल. भारतीय वेळेनुसार दुपारी ३, सायंकाळी ७ आणि रात्री ११ अशा वेळी लढती होतील. रविवार, ५ जुलै रोजी लॉर्ड्स स्टेडियमवर महाअंतिम सामना रंगेल.
दरम्यान, भारतीय संघ १४ जून रोजी पाकिस्तानविरुद्धच्या लढतीने आपल्या अभियानास प्रारंभ करेल. त्यानंतर १७ तारखेला नेदरलँड्सविरुद्ध त्यांचा दुसरा सामना असेल. मँचेस्टर येथे २१ जूनला भारत-दक्षिण आफ्रिका एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील. २५ जूनला बांगलादेशविरुद्ध खेळल्यानंतर २८ जून रोजी लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात भारताची ऑस्ट्रेलियाशी गाठ पडेल. गेल्या विश्वचषकात भारताला साखळीतच गाशा गुंडाळावा लागला होता. २०२०मध्ये भारताने फक्त एकदाच अंतिम फेरी गाठली होती. मात्र त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे एकदिवसीय विश्वचषकानंतर २०२६मध्ये भारतीय महिला टी-२० जगज्जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणणार का, हे पाहणे रंजक ठरेल.
“आयसीसीच्या महिला टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करताना आनंद होत आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या या महिलांच्या स्पर्धेसाठी चाहत्यांचा उदंड प्रतिसाद लाभेल, याची खात्री आहे,” असे आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजोग गुप्ता म्हणाले. ओव्हल येथे ३० जून व २ जुलै रोजी या स्पर्धेचे उपांत्य सामने होणार आहेत. त्यानंतर ५ जुलैला महाअंतिम मुकाबला लॉर्ड्स येथे होईल. त्यामुळे आयपीएल संपल्यानंतर महिलांच्या टी-२० विश्वचषकाकडे सर्वांचे लक्ष असेल.
महिलांच्या टी-२० विश्वचषकाची गटवारी
अ-गट : भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, नेदरलँड्स
ब-गट : इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका, आयर्लंड, स्कॉटलंड.
भारताचे साखळी सामने
रविवार, १४ जून : वि. पाकिस्तान (बर्मिंघम)
बुधवार, १७ जून : वि. नेदरलँड्स (लीड्स)
रविवार, २१ जून : वि. दक्षिण आफ्रिका (मँचेस्टर)
गुरुवार, २५ जून : वि. बांगलादेश (मँचेस्टर)
रविवार, २८ जून : वि. ऑस्ट्रेलिया (लंडन)
भारताचे सर्व सामने सायंकाळी ७ वाजता सुरू होतील.
उपांत्य, अंतिम लढतीसाठी तिकीट विक्री सुरू
पुुरुषांच्या टी-२० विश्वचषकातील उपांत्य व अंतिम सामन्यासाठी तिकीट विक्री मंगळवारपासून सुरू झाल्याचेही आयसीसीने जाहीर केले. ४ मार्च रोजी पहिला उपांत्य सामना कोलंबो किंवा कोलकाताचा ईडन गार्डन्स येथे रंगण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने उपांत्य फेरी गाठली, तर त्यांची लढत कोलंबोत होईल. पाकिस्तान स्पर्धेबाहेर गेला व श्रीलंकेसमोर भारतीय संघ आला, तर श्रीलंकेला उपांत्य लढतीसाठी मुंबईत यावे लागेल. कारण दुसरा उपांत्य सामना ५ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. त्यानंतर ८ मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना रंगणार आहे. यासाठी कोलंबोचा पर्यायही ठेवण्यात आला आहे. पाकिस्तानने अंतिम फेरी गाठली, तर ती लढत कोलंबोत होईल. दरम्यान, कोलकाता येथे उपांत्य लढत न झाल्यास भारतीय चाहत्यांना तिकीटीचे पैसे परत करण्यात येतील.