

मँचेस्टर : मॅरिझान कॅपच्या दोन जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवत केलेल्या नाबाद ८१ धावांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने महिला टी२० विश्वचषक स्पर्धेतील अटीतटीच्या सामन्यात भारतावर ६ विकेट्सने महत्त्वपूर्ण विजय मिळवला.
भारताने दिलेल्या १५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने ५ चेंडू राखून १९.१ षटकांत ४ बाद १६१ धावा केल्या. या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया आणि भारतानंतर तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. भारताकडून बदली क्षेत्ररक्षक राधा यादवने कॅपचे दोन सोपे झेल सोडले, जे भारतासाठी घातक ठरले. कॅपने अवघ्या ४५ चेंडूंत ७ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ८१ धावा ठोकल्या. त्यापूर्वी तिने गोलंदाजीतही २७ धावांत २ बळी घेतले होते. फलंदाजीतही भारतीय खेळाडूंनी निराशा केली.
कपने ताझमीन ब्रिट्स (४० धावा) सोबत तिसऱ्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी करून दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा पाया रचला. तत्पूर्वी, भारताने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १५८ धावा केल्या होत्या. भारताची सुरुवात खराब झाली आणि संघ बिनबाद ५४ वरून ४ बाद ८३ अशा अडचणीत सापडला. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी पाचव्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी करत डाव सावरला. दीप्तीने २१ चेंडूंत ३ चौकारांसह २९ धावा केल्या, तर हरमनप्रीतने २२ चेंडूंत २४ धावांचे योगदान दिले. हरमनप्रीत कौर पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये २०० टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी जगातील पहिली क्रिकेटपटू ठरली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या डावात भारताकडून श्री चरणीने शानदार गोलंदाजी करत ३ षटकांत २४ धावा देत ३ बळी घेतले. तिने पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात धाव न देता २ बळी घेत दक्षिण आफ्रिकेला झटके दिले. तिने आधी लॉरा वोल्व्हार्डला (२० धावा) बाद केले आणि त्यानंतर डेर्कसनला (०) त्रिफळाचीत केले. मात्र, त्यानंतर कॅप आणि ब्रिट्स यांनी ६३ चेंडूंत ९७ धावांची भागीदारी करत सामना दक्षिण आफ्रिकेच्या नियंत्रणात आणला. राधाने कॅपचे झेल सोडल्यामुळे ही भागीदारी वाढली. शफालीने ब्रिट्सला बाद करून ही जोडी फोडली, मात्र तोपर्यंत आफ्रिकेचा विजय सुकर झाला होता.