ऑस्ट्रेलियात आता महिलांचे द्वंद्व! हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताचा आज ब्रिस्बेनला कांगारूंशी पहिला एकदिवसीय सामना

एकीकडे भारतीय पुरुष क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज होत असताना आता ऑस्ट्रेलियातच महिला संघांमधील जुगलबंदीही चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया महिला संघांमधील ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला गुरुवारपासून ब्रिस्बेन येथे प्रारंभ होणार आहे.
ऑस्ट्रेलियात आता महिलांचे द्वंद्व! हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताचा आज ब्रिस्बेनला कांगारूंशी पहिला एकदिवसीय सामना
Published on: 

ब्रिस्बेन : एकीकडे भारतीय पुरुष क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज होत असताना आता ऑस्ट्रेलियातच महिला संघांमधील जुगलबंदीही चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया महिला संघांमधील ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला गुरुवारपासून ब्रिस्बेन येथे प्रारंभ होणार आहे.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताला काही महिन्यांपूर्वी झालेल्या टी-२० विश्वचषकात साखळीतच गाशा गुंडाळावा लागला. त्यानंतर मायदेशात भारताने न्यूझीलंडला एकदिवसीय मालिकेत २-१ असे नमवले. आता पुन्हा एकदा हरमनप्रीतच्याच नेतृत्वात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेल्या भारतीय महिला संघासमोर कामगिरी उंचावण्याचे आव्हान असेल. पुढील वर्षी महिलांचा एकदिवसीय विश्वचषक रंगणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताने आतापासून संघबांधणी करायला हवी.

दरम्यान, या मालिकेसाठी शफाली वर्माला भारतीय संघातून वगळण्यात आले आहे. तसेच यास्तिका भाटियाला दुखापत झाली असल्याने स्मृती मानधनाच्या साथीने सलामीला कोण येणार, हे पाहणे रंजक ठरेल. ऑस्ट्रेलियात झालेल्या १६ एकदिवसीय सामन्यांपैकी भारतीय महिलांनी फक्त ४ लढती जिंकल्या आहेत. तसेच २०२१मध्ये उभय संघांत ऑस्ट्रेलियात झालेल्या मालिकेत यजमानांनीच २-१ असा विजय मिळवला होता. त्यामुळे अमोल मुझुमदार यांच्या प्रशिक्षणाखाली खेळणाऱ्या भारतीय महिलांपुढे मोठे आव्हान असेल.

दुसरीकडे एलिसा हीली दुखापतग्रस्त असल्याने ताहिला मॅकग्रा या मालिकेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणार आहे. मार्चनंतर प्रथमच ऑस्ट्रेलियाचा संघ एखादी एकदिवसीय मालिका खेळणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाने भारताला भारतातच धूळ चारली होती. त्यामुळे मायदेशात खेळतानाही त्यांचेच पारडे जड असेल. पुढील वर्षी भारतात महिलांचा विश्वचषक होणार असून त्यासाठी सर्वप्रथम पात्र ठरण्याची ऑस्ट्रेलियाला संधी आहे.

या लढतीत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना पोषक असणार असून दोन्ही संघांमध्ये मालिकेचा विजयारंभ करण्यासाठी चुरस पाहायला मिळणार आहे.

शफालीला डच्चू

या मालिकेसाठी शफाली वर्माला भारतीय संघातून डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे बऱ्याच कालावधीनंतर एकदिवसीय प्रकारात स्मृतीच्या साथीने नवा सलामीवीर चाहत्यांना पाहायला मिळेल.

उभय संघांत आतापर्यंत झालेल्या ५३ एकदिवसीय सामन्यांपैकी भारताने फक्त १०, तर ऑस्ट्रेलियन महिलांनी तब्बल ४३ लढती जिंकल्या आहेत. त्यामुळे आकडेवारीनुसार कांगारूंचेच पारडे यावेळीही जड आहे.

भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, प्रिया पुनिया, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, उमा छेत्री, रिचा घोष, तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, राधा यादव, तिथास साधू, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग, साइमा ठाकोर.

ऑस्ट्रेलिया : ताहिला मॅकग्रा (कर्णधार), ॲश्लेघ गार्डनर, डार्सी ब्राऊन, किम गार्थ, अलाना किंग, फोबे लिचफील्ड, सोफी मोलिनिक्स, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगान शूट, ॲनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम, जॉर्जिया वॉल.

वेळ : सकाळी ८.५० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २ आणि हॉटस्टार ॲप