क्रिकेटमध्ये मॅचफिक्सिंग नव्हे, तर स्पॉटफिक्सिंग होते; माजी कसोटीपटू अंशुमन गायकवाड

अंशुमन आणि उमेश कुलकर्णी यांना भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर आणि कर्सन घावरी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले
क्रिकेटमध्ये मॅचफिक्सिंग नव्हे, तर स्पॉटफिक्सिंग होते; माजी कसोटीपटू अंशुमन गायकवाड

मी भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक असताना मॅचफिक्सिंगच्या अनेक बातम्या कानावर पडल्या. १९९७ साली श्रीलंकेतील निधास ट्रॉफीची फायनल फिक्स असून भारत हरणार, असे धक्कादायक आणि निनावी फोनही आले; पण ती फायनल आपण जिंकलो. असे असले तरी मॅचफिक्सिंग होत नाही, हे माझे ठाम मत आहे; पण स्पॉटफिक्सिंग नक्कीच होते, असा स्ट्रेट ड्राइव्ह लगावला आहे. भारतीय संघाचे माजी कसोटीपटू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांनी. क्रिकेटमधल्या जिगरबाज खेळाडूंच्या कारकीर्दीला सन्मान करण्यासाठी एजिस फेडरल इन्शुरन्स आणि लोकमान्य सेवा संघाने आयोजित केलेल्या गट्स आणि ग्लोरी क्रिकेट सन्माम संध्येच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अंशुमन आणि उमेश कुलकर्णी यांना भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर आणि कर्सन घावरी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

दिग्गजांचा जीवनप्रवास उलगडणाऱ्या या सन्मान संध्येत कसोटीपटूंनी अशी जोरदार बॅटिंग केली की, पु. ल. देशपांडे सभागृहात मैदानावरच्याच नव्हे, तर मैदानाबाहेरच्या किश्शांचाही अक्षरश: पाऊस पडला. याप्रसंगी केवळ हास्याचे चौकार-षट्कारच ठोकले गेले नाही, तर चाचपडायला लावणाऱ्या बाउन्सर आणि यॉकर्सचाही मारा करण्यात आला. दिग्गज क्रिकेटपटूंचे किस्से ऐकायला क्रिकेटच्या दर्दी प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या सभागृहात क्षणाक्षणाला हास्याचे कारंजे उसळत होते. या सन्मान संध्येबद्दल एजिस फेडरलचे सर्वेसर्वा विघ्नेन शहाणे यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल क्रिकेटप्रेमींसह क्रिकेटपटूंनीही मनापासून आभार मानले.

दगडाने नारळ पाडण्याचा कलेने झालो गोलंदाज

भारताचे एकेकाळचे वेगवान गोलंदाज उमेश कुलकर्णी यांचा क्रिकेटप्रवासही अचंबित करणार होता. सन्मानमूर्ती कुलकर्णी आपल्या क्रिकेटप्रवासाच्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले, “अलिबागला दगडाने नारळ पाडण्याच्या माझ्या नेममुळेच मी गोलंदाज झालो. दगड मारण्याची कलाच माझी गोलंदाजीची स्टाइल झाली. माझ्या या प्रकारामुळे आईने मला माझ्या मामांकडे गिरगावला धाडले. गिरगावला आल्यावर शालेय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली; पण तेव्हा माझ्याकडे ना क्रिकेटचे कपडे होते ना शूज.”

कपिलला थांब सांगणं कठीण होते!

भारताचा यशस्वी खेळाडू कपिल देवला त्याच्या निवृत्तीबाबत सांगणं आमच्यासमोर सर्वात मोठे आव्हान होते. मी निवड समितीचा अध्यक्ष होतो. सर्वाधिक बळींचा विश्वविक्रम नोंदविल्यानंतर कपिलने निवृत्ती जाहीर करावी, असे सर्वांचे मत होते; पण पामानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कपिलने आणखी दोन वर्षे खेळणार असल्याचे जाहीर करताच आमच्या सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. कपिलने आता थांबायला हवं, असे सर्वांना वाटत होते; पण त्याला हे सांगणार कोण? ही जबाबदारी सर्वांनी माझ्याच खांद्यावर टाकली; पण कपिलनेही एका महान खेळाडूप्रमाणे माझे ऐकले आणि सन्मानाने पुढच्याच सामन्यात निवृत्ती जाहीर केली, अशी आठवण अंशुमन गायकवाड यांनी सांगितली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in