पाचवा कसोटी सामना रंगतदार अवस्थेत,इंग्लंडला विजयासाठी ३७८ धावांचे लक्ष्य

या प्रयत्नात चेतेश्वर पुजारा (१६८ चेंडूंत ६६) धावांवर स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर बाद झाला
 पाचवा कसोटी सामना रंगतदार अवस्थेत,इंग्लंडला विजयासाठी ३७८ धावांचे लक्ष्य

पुनर्नियोजित पाचवा कसोटी सामना रंगतदार अवस्थेत आला असून चौथ्या दिवशी सोमवारी शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा विजयासाठी ३७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने ३ गडी बाद १३८ धावा केल्या होत्या. ॲलेक्स लीस (६५ चेंडूंत ५६), झॅक क्रॉली (७६ चेंडूंत ४६), ओली पोप (३ चेंडूंत ०) हे बाद झाले.

त्याआधी, भारताचा दुसरा डाव २४५ धावांत संपुष्टात आला. भारताला पहिल्या डावात १३२ धावांची आघाडी असल्याने इंग्लंडला विजयासाठी ३७८ धावांचे लक्ष्य मिळाले. भारताने सोमवारी आपला दुसरा डाव ३ गडी बाद १२५ धावांपासून पुढे सुरू केल्यानंतर पहिल्या सत्रापासूनच आक्रमक पवित्रा घेत आघाडी जास्तीत वाढविण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात चेतेश्वर पुजारा (१६८ चेंडूंत ६६) धावांवर स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याचा झेल ॲलेक्स लीसने टिपला. पुजारा बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने आक्रमक खेळ करण्यास सुरूवात केली. दुसऱ्या बाजूने ऋषभ पंतनेदेखील फटकेबाजी सुरू ठेवली होती. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. साठाव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर भारताच्या १९० धावा झालेल्या असताना श्रेयस अय्यर (२६ चेंडूंत १९) बाद झाला. त्यानंतर ६३ व्या षट्कात पंतही (८६ चेंडूंत ५७) माघारी परतला.

शार्दुल ठाकूर (२६ चेंडूंत ४) आणि रवींद्र जडेजा (५८ चेंडूंत २३) यांनी भारताला समाधानकारक आघाडीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. जडेजा आणि मोहम्मद शमी यांनी भारताला उपाराहापर्यंत ७ बाद २२९ धावांपर्यंत पोहोचविले. उपाहारानंतर ७४ व्या षटकात मोहम्मद शमीला (१४ चेंडूंत १३) बेन स्टोक्सने बाद केले. त्यानंतर जडेजाला बाद करत स्टोक्सने भारताचा डाव २४५ धावात संपुष्टात आणला. स्टोक्सने ३३ धावांच्या मोबदल्यात चार बळी टिपले. ब्रॉड, पॉट्स यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. ॲन्डरसन लीच यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in