गुजरातच्या गोलंदाजांविरुद्ध पंजाबच्या फलंदाजांचा कस!

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरातने यंदाच्या हंगामातील आतापर्यंतच्या तीन सामन्यांत दोन विजय मिळवले आहेत. हे दोन्ही सामने गुजरातने घरच्या मैदानावर जिंकले आहेत. मुंबईला नमवल्यानंतर त्यांना चेन्नईकडून पराभव पत्करावा लागला होता.
गुजरातच्या गोलंदाजांविरुद्ध पंजाबच्या फलंदाजांचा कस!

अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) गुरुवारी होणाऱ्या लढतीत गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांविरुद्ध पंजाब किंग्जच्या फलंदाजांची कसोटी लागेल. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत गोलंदाजांचेच वर्चस्व राहण्याची शक्यता असून चाहत्यांना कडवी झुंज अपेक्षित आहे.

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरातने यंदाच्या हंगामातील आतापर्यंतच्या तीन सामन्यांत दोन विजय मिळवले आहेत. हे दोन्ही सामने गुजरातने घरच्या मैदानावर जिंकले आहेत. मुंबईला नमवल्यानंतर त्यांना चेन्नईकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र हैदराबादविरुद्ध गुजरातने सरशी साधली. त्यामुळे ते आता तिसऱ्या विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरतील. या स्टेडियमवर आतापर्यंत एकाही संघाला १७०पेक्षा धावसंख्यासुद्धा करता आलेली नाही. त्यामुळे बॅट आणि बॉलमध्ये कडवा संघर्ष पाहायला मिळेल.

दुसरीकडे शिखर धवनच्या पंजाबने घरच्या मैदानात सलामीला दिल्लीला सहज नमवले. मात्र त्यानंतर बंगळुरू आणि लखनऊविरुद्ध खेळताना त्यांना पराभव पत्करावा लागला. पंजाब सलग तिसरा सामना प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानात खेळणार आहे. त्यामुळे ते गुजरातला कसे आव्हान देणार, हे पाहणे रंजक ठरेल. तूर्तास पंजाबचा संघ तीन सामन्यांतील एका विजयासह गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे. प्रतिभावान खेळाडूंचा भरणा असूनही पंजाबला २०१४नंतर एकदाही बाद फेरीसुद्धा गाठता आलेली नाही. त्यामुळे यंदा त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

मोहित, रशिद गुजरातचे अस्त्र

मधल्या षटकात धीम्या गतीचा चेंडूंचा सुरेख वापर करणारा अनुभवी मोहित शर्मा आणि करामती फिरकीपटू रशिद खान यांची जोडी गुजरातची ताकद आहे. त्याशिवाय स्पेन्सर जॉन्सन आणि अझमतुल्ला ओमरझाई यांची वेगवान जोडीही लयीत आहे. अफगाणचाच नूर अहमद फिरकीच्या जाळ्यात पंजाबला अडकवू शकतो. फलंदाजीत गुजरातची कर्णधार गिल आणि धोकादायक डेव्हिड मिलरवर भिस्त आहे. साई सुदर्शन सातत्याने योगदान देत आहे. मात्र राहुल तेवतिया, वृद्धिमान साहा, विजय शंकर यांना कामगिरी उंचवावी लागणार आहे. गुजरातच्या फलंदाजीला अद्याप या स्पर्धेत पूर्णपणे छाप पाडता आलेली नाही.

धवन लयीत; जितेशकडे लक्ष

धवनने तीन सामन्यांत अनुक्रमे २२, ४५, ७० अशा धावा करून पंजाबला सातत्याने चांगली सुरुवात करून दिली आहे. त्याशिवाय जॉनी बेअरस्टोलासुद्धा सूर गवसला आहे. मात्र लियाम लिव्हिंगस्टोन, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा यांचे अपयश पंजाबला महागात पडत आहे. विशेषत: आगामी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघातील यष्टिरक्षक-फलंदाजाच्या स्थानासाठी दावेदारी पेश करायची असल्यास जितेशला कामगिरीत सुधारणा करावी लागेल. गोलंदाजीसुद्धा पंजाबसाठी चिंतेचा विषय असून हर्षल पटेल अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकलेला नाही. कॅगिसो रबाडा, सॅम करन व अर्शदीप सिंग या वेगवान त्रिकुटावर पंजाबच्या आशा आहेत.

प्रतिस्पर्धी संघ

  • गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यम्सन, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, नूर अहमद, आर. साईकिशोर, रशिद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा, अझमतुल्ला ओमरझाई, उमेश यादव, शाहरूख खान, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, मानव सुतार, स्पेन्सर जॉन्सन, संदीप वॉरियर, बी. आर. शरथ.

  • पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), जितेश शर्मा, जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, हरप्रीत भाटिया, रायली रॉसो, शशांक सिंग, ख्रिस वोक्स, विश्वनाथ सिंग, आशुतोष शर्मा, तनय थ्यागराजन, अथर्व तायडे, ऋषी धवन, सॅम करन, सिकंदर रझा, शिवम सिंग, प्रिन्स चौधरी, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग, कगिसो रबाडा, नॅथन एलिस, राहुल चहर, विद्वत कॅव्हेरप्पा, हर्षल पटेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in