पंड्या फॅक्टर मुंबईला तारणार? मुंबई इंडियन्स आज गुजरात टायटन्सला टक्कर देणार

पंड्या फॅक्टर मुंबईला तारणार? मुंबई इंडियन्स आज गुजरात टायटन्सला टक्कर देणार

हार्दिक पंड्याने गेल्या दोन मोसमात गुजरात टायटन्सला एकदा जेतेपद मिळवून दिले तर दुसऱ्या वेळी थेट अंतिम फेरीत धडक मारून दिली. कर्णधार म्हणून भलताच यशस्वी ठरल्यानंतर हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सने करारबद्ध केले.

अहमदाबाद : मुंबई इंडियन्स संघात यंदा खांदेपालट झाले असून हार्दिक पंड्याला गुजरात टायटन्सकडून विकत घेत रोहित शर्माऐवजी त्याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. पाच विजेतेपद पटकावून देणाऱ्या रोहित शर्माचा वारसा पंड्या पुढे चालवणार का, याकडे तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. आयपीएलच्या सलामीच्या लढतीतच मुंबई इंडियन्सची गाठ रविवारी अहमदाबाद येथे गुजरात टायटन्सशी पडणार असून पंड्या फॅक्टर मुंबईला तारणार का, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

हार्दिक पंड्याने गेल्या दोन मोसमात गुजरात टायटन्सला एकदा जेतेपद मिळवून दिले तर दुसऱ्या वेळी थेट अंतिम फेरीत धडक मारून दिली. कर्णधार म्हणून भलताच यशस्वी ठरल्यानंतर हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सने करारबद्ध केले. त्यातच रोहित शर्मासारख्या अनुभवी कर्णधाराला बाजूला सारून दुखापतीने पोखरलेल्या पंड्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. आता गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात वनडे वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान झालेल्या दुखापतीनंतर हार्दिक पंड्या पुनरागमन करणार आहे. हार्दिक पूर्णपणे फिट झाल्याचे दिसत असले तरी फलंदाजी आणि गोलंदाजीत त्याची कामगिरी कशी होतेय, यावर निवड समितीचे बारकाईने लक्ष असणार आहे. कारण जून महिन्यात अमेरिका आणि कॅरेबियन बेटांवर होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपच्या दृष्टीने पंड्याची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

मुंबईला सध्या खेळाडूंच्या फिटनेसची चिंता सतावत आहे. सूर्यकुमार यादवला अद्याप राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून फिटनेस सर्टिफिकेट मिळालेले नाी. त्याचबरोबर डावखुरा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ आणि दिलशान मधुशंका यांनी दुखापतीमुळे याआधीच माघार घेतली असून त्यांच्या जागी गेराल्ड कोट्झीला स्थान देण्यात आले असले तरी त्याचे स्नायू दुखावले गेल्यामुळे तो सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. मुंबईला पाच जेतेपदे मिळवून दिल्यानंतर आता रोहित शर्मा खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे. नेतृत्वाचे दडपण नसताना त्याच्याकडून मोठ्या खेळी मुंबईला अपेक्षित आहेत. अतिक्रिकेटमुळे आपल्याला विश्रांती मिळावी, म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेतून माघारी परतलेला... त्यानंतर बीसीसीआयच्या टीकेचे धनी बनलेला... परिणामी मध्यवर्ती करारातून वगळण्यात आलेल्या इशान किशनला आता आपले कर्तृत्व पुन्हा एकदा सिद्ध करावे लागणार आहे. मुंबईकडे पंड्यासोबतच मोहम्मद नबी आणि रोमारियो शेफर्ड हे अष्टपैलू खेळाडू आहेत. त्याचबरोबर आकाश मढवाल आणि नेहल वढेरा यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे.

पंड्याचे मुंबई इंडियन्समध्ये ‘स्थलांतर’ झाल्यानंतर गुजरात टायटन्सचे नेतृत्व शुभमन गिलकडे आले आहे. कमी वयात कर्णधारपदाची जबाबदारी चोखपणे पार पाडण्यासाठी गिल सज्ज झाला आहे. त्यामुळे गुजरातला पुन्हा एकदा अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल. गिलकडे भारताचा भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिले जात आहे, मात्र त्यासाठी त्याला आयपीएलमध्ये आपल्या नेतृत्वाची छाप पाडावी लागेल. गेल्या मोसमात गिलने सर्वाधिक धावा फटकावल्या होत्या, त्यामुळे कर्णधाराचे दडपण त्याच्या फलंदाजीवर जाणवणार नाही, अशी अपेक्षा टायटन्सला आहे.

गुजरातला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची उणीव भासणार आहे. शस्त्रक्रियेमुळे मोहम्मद शमी यंदाच्या आयपीएलमध्ये खेळाडू शकणार नाही. मात्र ‘ट्रम्पकार्ड’ ओळखला जाणारा रशिद खान शस्त्रक्रियेनंतर संघात परतल्याने गुजरातसाठी ती जमेची बाजू असेल. डावखुरा वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सन आणि अझमतुल्ला ओमरझाई हे नवे खेळाडू गुजरातच्या ताफ्यात सामील झाले आहेत.

  • मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेव्हिस, जसप्रीत बुमरा, पियूष चावला, गेराल्ड कोट्झी, टिम डेव्हिड, श्रेयस गोपाळ, इशान किशन, अन्शूल कंबोज, कुमार कार्तिकेय, आकाश मढवाल, क्वेना माफका, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, नमन धीर, शिवालिक शर्मा, रोमारियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, तिलक वर्मा, विष्णू विनोद, नेहल वढेरा, ल्युक वूड आणि सूर्यकुमार यादव.

  • गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), अझमतुल्ला ओमरझाई, स्पेन्सर जॉन्सन, कार्तिक त्यागी, जोश लिटिल, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, सुशांत मिश्रा, दर्शन नलकांडे, नूर अहमद, रशिद खान, वृद्धिमन साहा, साई किशोर, साई सुदर्शन, एम. शाहरूख खान, विजय शंकर, बीआर शरथ, मोहित शर्मा, मानव सुतार, राहुल तेवतिया, मॅथ्यू वेड, केन विल्यम्सन, जयंत यादव आणि उमेश यादव.

logo
marathi.freepressjournal.in