
वेस्ट इंडिजमधील त्रिनिदाद येथे झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताला केवळ गोलंदाजांच्या योगदानामुळेच ६८ धावांनी विजय मिळविता आला. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेता आली.
भारताच्या सुरूवातीच्या फलंदाजांची कामगिरी ही निराशाजनक झाली होती. सलामीला उतरलेले सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा हे फलंदाज फार काळ टिकू शकले नाहीत. केवळ रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक हेच खेळपट्टीवर टिकून राहिले. कर्णधार रोहित शर्माने ६४ धावांची शानदार खेळी केली. अखेरच्या ५ षटकांत भारताने ५९ धावा केल्या.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या वेस्ट इंडिजचे गोलंदाज भारताला कमी धावसंख्येवर रोखण्यात अपयशी ठरले आणि भारताने यजमानांसमोर १९१ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला २० षटकांत ८ बाद १२२ धावांपर्यंतच मजल मारता आली.
वेस्ट इंडिज फलंदाजांनी सुरूवात दणक्यात केली होती; मात्र पहिली विकेट गमावल्यानंतर लागलेल्या गळतीतून सावरण्यात विंडीजला अपयश आले. सामन्याला सुरूवात होण्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा याने खेळाडूंना दिलेला सल्लाही उपयोगी पडला. खेळपट्टीवर टिकून राहणे महत्वाचे असल्याचे त्यांने सांगितले होते. त्यामुळेच किमान दिनेश कार्तिकने तरी त्याचा सल्ला अमलात आणून आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात हातभार लावला. कार्तिकने या सामन्यात फिनिशरची भूमिका बजावली. दिनेश कार्तिकला सातव्या क्रमांकावर संधी मिळाली. दिनेश कार्तिकने सामन्यात २१५.७८ च्या स्ट्राईक रेटने जबरदस्त फटकेबाजी केली. त्याने १९ चेंडूंत ४१ धावा केल्या. या सामन्यात त्याने चार चौकार आणि दोन षटकार लगावले. दिनेशच्या या झंझावातामुळे इशान किशन आणि संजू सॅमसन या दोघांच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, रोहित म्हणाला की, “ सुरुवातीला फटकेबाजी करणे सोपे नव्हते. क्रीझवर स्थिरावून बराच काळ फलंदाजी करण्याची गरज होती आणि ज्या पद्धतीने आम्ही पहिला डाव संपवला, तो एक चांगला प्रयत्न होता.”