यंग ब्रिगेडची मालिकेत आघाडी! तिसऱ्या सामन्यात भारताची झिम्बाब्वेवर २३ धावांनी मात; गिल, सुंदर चमकले

India-Zimbabwe T20 Series: भारताने तिसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेवर २३ धावांनी मात करून पाच लढतींच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. उभय संघांतील चौथी लढत शनिवारी खेळवण्यात येईल.
 यंग ब्रिगेडची मालिकेत आघाडी! तिसऱ्या सामन्यात भारताची झिम्बाब्वेवर २३ धावांनी मात; गिल, सुंदर चमकले
X

हरारे : कर्णधार शुभमन गिलने (४९ चेंडूंत ६६ धावा) साकारलेल्या अर्धशतकाला फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरच्या (१५ धावांत ३ बळी) प्रभावी गोलंदाजीची सुरेख साथ लाभली. त्यामुळे भारताने तिसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेवर २३ धावांनी मात करून पाच लढतींच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. उभय संघांतील चौथी लढत शनिवारी खेळवण्यात येईल.

हरारे स्पोर्ट्स क्लबवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ४ बाद १८२ धावांपर्यंत मजल मारली. टी-२० विश्वचषक विजेत्या संघातून येथे परतलेल्या मुंबईकर यशस्वी जैस्वालने गिलच्या साथीने आक्रमक सुरुवात केली. या दोघांनी ८ षटकांत ६७ धावांची सलामी नोंदवली. यशस्वी ३६ धावांवर बाद झाल्यावर गेल्या लढतीतील शतकवीर अभिषेक शर्माला (१०) तिसऱ्या क्रमांकावर छाप पाडता आली नाही. सिकंदर रझाने या दोघांचा अडथळा दूर केला.

मात्र २४ वर्षीय गिलने टी-२० कारकीर्दीतील दुसरे अर्धशतक साकारताना ७ चौकार व ३ षटकार लगावले. कर्णधार म्हणून गिलचे पहिलेच अर्धशतक ठरले. त्याने महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडसह तिसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी रचली. ब्लेसिंग मुझरबानीने गिलला बाद केले. त्यानेच ऋतुराजलाही जाळ्यात अडकवले. ४ चौकार व ३ षटकार लगावणाऱ्या ऋतुराजला अर्धशतकाने एका धावेने हुलकावणी दिली. संजू सॅमसन (नाबाद १२) व रिंकू सिंग (नाबाद १) यांनी भारताला पावणेदोनशे धावांपलीकडे नेले.

लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला २० षटकांत ६ बाद १५९ धावांमध्ये रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. डायन मेयर्सने ४९ चेंडूंत नाबाद ६५ धावांची झुंज दिली. मात्र क्लाइव्ह मदांडे (३७) वगळता अन्य फलंदाजांची त्याला साथ लाभली नाही. सुंदरने रझा (१५), जोनाथन कॅम्पबेल (१), मदांडे यांचे बळी मिळवताना ४ षटकांत फक्त १५ धावा दिल्या. आवेश खानने २, तर खलील अहमदने १ गडी टिपला. सुंदरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याची ही कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली.

दरम्यान, शिवम दुबेचेही या लढतीसाठी संघात पुनरागमन झाले. साई सुदर्शन व रियान पराग यांना संघाबाहेर करण्यात आले.

संक्षिप्त धावफलक

> भारत : २० षटकांत ४ बाद १८२ (शुभमन गिल ६६, ऋतुराज गायकवाड ४९; सिकंदर रझा २/२४) विजयी वि.

> झिम्बाब्वे : २० षटकांत ६ बाद १५९ (डायन मेयर्स नाबाद ६५, क्लाइव्ह मदांडे ३७; वॉशिंग्टन सुंदर ३/१५)

> सामनावीर : वॉशिंग्टन सुंदर

logo
marathi.freepressjournal.in