कुटुंबीय आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रोहित शर्मा स्टँडचे लोकार्पण

‘हिटमॅन’, ‘मुंबईचा राजा’ अशा नावांनी क्रीडा विश्वात लोकप्रिय असलेल्या रोहित शर्माच्या नावाचे स्टँडचे शुक्रवारी लोकार्पण झाले. वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारी संपूर्ण कुटुंब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘रोहित शर्मा स्टँड’वरून पडदा काढण्यात आला, तेव्हा टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.
कुटुंबीय आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रोहित शर्मा स्टँडचे लोकार्पण
Published on

‘हिटमॅन’, ‘मुंबईचा राजा’ अशा नावांनी क्रीडा विश्वात लोकप्रिय असलेल्या रोहित शर्माच्या नावाचे स्टँडचे शुक्रवारी लोकार्पण झाले. वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारी संपूर्ण कुटुंब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘रोहित शर्मा स्टँड’वरून पडदा काढण्यात आला, तेव्हा टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.

“ज्या ठिकाणी देव असतो तीच खरी पंढरी असते आणि या वानखेडे मैदानावर क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकर यांचा पुतळा आहे. पुढील ५० वर्षे वानखेडे मैदान क्रिकेटसाठी ऐतिहासिक असणार आहे. या वानखेडे मैदानावर अनेक दिग्गज खेळाडू घडले आहेत. रोहित शर्मा हा भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. पाठोपाठ दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धा त्याने भारतासाठी जिंकून इतिहास रचला आहे. एखादा खेळाडू खेळत असतानाच त्याचे नाव मैदनातील स्टँडला देण्याचा हा वानखेडेच्या इतिहासतील पहिलाच क्षण असेल,” असे मुख्यमंत्री फणडवीस यांनी सांगितले.

“खेळत असतानाच वानखेडे मैदनावरील एका स्टँडला नाव लागणे हा माझ्यासाठी मोठा अभिमानाचा क्षण आहे. देशासाठी खेळताना मिळालेला हा सन्मान आहे. आजचा दिवस विशेष आहे. वानखेडे मैदानात नाव असणे ते ही अनेक दिग्गज क्रिकेट खेळाडूंसोबत हा मोठा सन्मान आहे,” असे रोहित म्हणाला.

“एखाद्या खेळाडूसाठी हा क्षण फार अभिमानास्पद आहे. यामुळे आणखी प्रेरणा मिळेल, असेही रोहितने यावेळी नमूद केले.

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्या पुढाकाराने रोहितचे नाव स्टँडला देण्यात आले. तसेच यावेळी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि भारताचे माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे नावही एका स्टँडला देण्यात आले. तसेच एमसीएचे दिवंगत अध्यक्ष अमोल काळे यांचे नाव ‘लाँज’ देण्यात आले. यावेळी वानखेडेमध्ये दर्दी क्रीडाप्रेमी उपस्थित होते. तसेच रोहितचा सुपर फॅन दीपकने यावेळी खास भारतीय जर्सी परिधान करून रोहितला सन्मान दिला.

यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय नाईक, सचिव अभय हडप यांच्यासह मुंबई इंडियन्सचे खेळाडू, तसेच दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री यांच्यासह मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, विविध क्लब्सचे सचिव व क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. तसेच मुंबई इंडियन्स संघातील सर्व खेळाडूही हा सोहळा पाहण्यासाठी मुंबईत होते.

आता २१ मे रोजी मुंबई-दिल्ली यांच्यातील आयपीएल सामना वानखेडेवर होणार आहे. त्यावेळी रोहितने त्याच्या स्टँडमध्ये षटकार ठोकावा, असे मत माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी नोंदवले. सोहळा संपल्यानंतर रोहितने आपल्या कुटुंबियांना प्रथम गाडीत बसवले व नंतर तो सरावासाठी मैदानात दाखल झाला. तोपर्यंत चाहत्यांचा घोळका जमाच होता.

रोहितच्या प्रशिक्षकांनाच निमंत्रण नाही?
रोहितच्या सुरुवातीच्या काळातील प्रशिक्षक किंबहुना त्याच्या कारकीर्दीला दिशा दाखवणाऱ्या दिनेश लाड यांना या सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले नव्हते, असे समजते. स्वत: लाड यांनी याविषयी मत मांडताना, मला रोहित अथवा कोणत्याही एमसीएच्या पदाधिकाऱ्याने कार्यक्रमाचे निमंत्रण दिलेले नाही, असे सांगितले. मात्र याविषयी एमसीएतील एका व्यक्तीला याविषयी विचारले असता त्यांनी आम्ही सर्व क्लबच्या सेक्रेटरींना व माजी क्रिकेटपटूंना ऑनलाइनच निमंत्रण पाठवले, असे सांगितले. “दोन दिवसांच्या अंतरात सर्वांना भेटून निमंत्रण देणे शक्य नव्हते. अतिशय घाईमध्ये हा कार्यक्रम ठरल्याने एमसीएवर मोठी जबाबदारी होती. मात्र तरीही अनेक जण वेळात वेळ काढून आले. कुणालाही वैयक्तिक भेटून अथवा विशेष असे वेगळे निमंत्रण दिलेले नाही. त्यामुळे कुणीही वाईट वाटून घेऊ नये,” असे एमसीएच्या सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
logo
marathi.freepressjournal.in