मँचेस्टर : रवींद्र जडेजा व वॉशिंग्टन सुंदर यांनी रविवारी दमदार व झुंजार शतके साकारली. त्यामुळे भारताने इंग्लंडविरुद्धची चौथी कसोटी अनिर्णित राखली. त्यांची शतके होण्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स व अन्य खेळाडू हातमिळवणीसाठी सातत्याने पुढे येत होते. मात्र भारताने यास नकार दिला. त्यामुळेच इंग्लंडच्या या वर्तनावर क्रीडाविश्वातून टीका करण्यात येत आहे.
ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर झालेल्या या कसोटीत इंग्लंडने पहिल्या डावात ३११ धावांची आघाडी घेतली होती. त्या प्रत्युत्तरात भारताने दुसऱ्या डावात तब्बल १४३ षटके फलंदाजी करताना ४ बाद ४२५ धावांपर्यंत मजल मारली. भारताने एकूण ११४ धावांची आघाडीसुद्धा घेतली. जडेजा व सुंदर यांनी अखेरच्या तासात शतके झळकावून इंग्लंडवर दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याची वेळच येणार नाही, याची खात्री बाळगली. अखेरीस सुंदरचे शतक झाल्यावर दोन्ही संघांतील खेळाडूंनी आपसी सहमतीने सामना अनिर्णित राखण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी तब्बल २०३ धावांची अभेद्य भागीदारी रचून इंग्लंडला हैराण केले.
“जडेजा व सुंदर यांनी ज्याप्रकारे सामना वाचवला ते कौतुकास्पद होते. कसोटीच्या अखेरच्या दिवशी पूर्ण दोन सत्र एकही विकेट न गमावता फलंदाजी करणे सोपे नसते. त्यामुळे ते दोघेही शतकाचे हकदार होते. यामुळे सामन्याच्या निकालावर कोणताही परिणाम होणार नव्हता. इंग्लंडचा संघ फलंदाजी करत असता, तर त्यांनी आपल्या फलंदाजांची शतके होण्यापूर्वीच डाव घोषित केला असता का,” असे गंभीर म्हणाला.
त्याशिवाय इरफान पठाण, संजय मांजरेकर या माजी क्रिकेटपटूंनीही भारताच्या लढ्याचे समर्थन केले आहे. काहींना विराट कोहली कर्णधार असता, तर भारताने उर्वरित ४५ मिनिटेही इंग्लंडला क्षेत्ररक्षण करवले असते, असे मत व्यक्त केले आहे. भारताने चौथी कसोटी अनिर्णित राखली असली, तरी ते मालिकेत १-२ असे पिछाडीवर आहेत. त्यामुळे ३१ जुलैपासून सुरू होणाऱ्या पाचव्या कसोटीत भारताला विजय मिळवणे अनिवार्य असेल.
आयसीसीने २०१९पासून जागतिक कसोटी अजिंक्यपद (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) स्पर्धा सुरू केली. तेव्हापासून भारताने दोन वेळेस म्हणजेच २०२१ व २०२३च्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र दोन्ही वेळेला भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०२५मध्ये मात्र भारताला अंतिम फेरीही गाठता आली नाही.
पंतच्या जागी जगदीशनला चमूत स्थान
डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत पायाच्या दुखापतीमुळे पाचव्या कसोटीला मुकणार आहे. त्यामुळे त्याच्या जागी तमिळनाडूच्या २९ वर्षीय एन. जगदीशनला स्थान देण्यात आले आहे. मात्र अंतिम ११ खेळाडूंत ध्रुव जुरेललाच प्राधान्य देण्यात येईल, असे समजते. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत रिव्हर्स स्वीपचा फटका खेळताना पंतला पायावर चेंडू लागल्याने मैदान सोडावे लागले. तरीही त्याने फलंदाजी केली. मात्र दुसऱ्या डावात तो फलंदाजीस आला नाही.