

ब्रिस्बेन : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक टी-२० मालिका विजयासाठी सज्ज आहे. शनिवारी ब्रिस्बेन येथील गॅबाच्या मैदानात भारताचे शिलेदार ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाचव्या टी-२० सामन्यात दोन हात करतील. त्यामुळे २-१ असा आघाडीवर असलेला भारत या लढतीसह मालिकेवरही कब्जा मिळवण्यासाठी आतुर असेल.
उभय संघांतील कॅनबरा येथील पहिली लढत पावसामुळे रद्द झाली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर सहज वर्चस्व गाजवले. मग होबार्ट येथील तिसऱ्या सामन्यात भारताने पलटवार केला व मालिकेत बरोबरी साधली. चौथ्या लढतीत मग अक्षर पटेलने दिलेल्या अष्टपैलू योगदानामुळे भारताने कांगारूंचा ५२ धावांनी धुव्वा उडवत मालिकेत आघाडी घेतली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग चौथी टी-२० मालिका जिंकण्याची भारताला सुवर्णसंधी आहे. तसेच कांगारूंना त्यांच्याच भूमीत भारताने २०२०-२१मध्ये २-१ असे नमवले होते. त्यानंतर सलग दुसऱ्यांदा ते हा पराक्रम करू शकतात.
दरम्यान, भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका काही दिवसांपूर्वी पार पडली. मिचेल मार्शच्या नेतृत्वात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतावर २-१ असा विजय मिळवला. मात्र त्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रोहितने शतक, तर विराटने अर्धशतक झळकावून चाहत्यांची मने जिंकली. तसेच अद्यापही आपल्यात धमक असून २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आपण शर्यतीत असल्याचे दाखवले. मात्र आता भारताच्या युवा ब्रिगेडकडे सर्वांचे लक्ष असेल.
पुढील वर्षी मार्च महिन्यात भारतात टी-२० विश्वचषक रंगणार आहे. त्याचा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल. त्यामुळे त्यादृष्टीने संघबांधणी करण्यासह प्रयोगांची चाचपणी करण्यासाठी भारताला या मालिकेत संधी मिळाली. सूर्यकुमारच्या नेतृत्वात सप्टेंबरमध्ये भारताने दुबईत नवव्यांदा आशिया चषक टी-२० स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. या मालिकेनंतर भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धही भारताचे ३ टी-२० सामने होतील.
ऑस्ट्रेलियाचा विचार करता जोश हेझलवूड, ट्रेव्हिस हेड यांच्यासह काही प्रमुख खेळाडूंना ॲशेस कसोटी मालिकेच्या तयारीसाठी वेळ देण्यात आला आहे. अशा स्थितीत त्यांना नॅथन एलिस, बेन ड्वारशुइस व झेव्हियर बार्टलेट या वेगवान गोलंदाजांकडून अपेक्षा असतील. फलंदाजीत मार्शसह जोश इंग्लिस, टिम डेव्हिड व ग्लेन मॅक्सवेल यांच्यावर कांगारूंची भिस्त असेल. या लढतीवर पावसाचे सावट नसून वेगवान गोलंदाजांना गॅबा येथे नेहमीच सहाय्य लाभले आहे. तसेच चेंडू बॅटवर सहज येत असल्याने फलंदाजांनाही चौकार-षटकार लगावणे सोपे जाईल.
नोव्हेंबर २०१८मध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात गॅबा येथे एकमेव टी-२० सामना झाला होता. त्यावेळी कांगारूंनी बाजी मारली होती. मात्र यावेळी भारताचे पारडे जड आहे. तसेच टी-२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना ठरू शकतो. कारण त्यानंतर ते फक्त बिग बॅश या फ्रँचायझी लीगद्वारे टी-२० प्रकारात खेळताना दिसतील. त्यामुळे कांगारूंनाही संघनिवडीच्या दृष्टीने योग्य पावले उचलावी लागतील.
अक्षरवर भिस्त, बुमरावर लक्ष
गेल्या लढतीत फलंदाजीत ११ चेंडूंत नाबाद २१ धावा करण्यासह अक्षरने गोलंदाजीतही छाप पाडून २० धावांत २ बळी मिळवले. त्यामुळे त्याच्या अष्टपैलू योगदानावर पुन्हा एकदा संघाची भिस्त असेल. तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला मात्र या मालिकेतील ३ सामन्यांत फक्त ३ बळी मिळवता आले आहेत. त्यामुळे आगामी आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी बुमराने ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट धडाक्यात करावा, अशी अपेक्षा आहे. अर्शदीप सिंग व शिवम दुबे बुमरासह वेगवान माऱ्याची धुरा वाहतील. अक्षर, वरुण चक्रवर्ती व वॉशिंग्टन सुंदर फिरकीची बाजू सांभाळतील. गोलंदाजीत भारताचे पारडे कांगारूंपेक्षा नक्कीच जड आहे.
गिल, तिलककडून मोठी खेळी अपेक्षित
उपकर्णधार शुभमन गिलने गेल्या लढतीत ४६ धावा केल्या. मात्र त्याने अद्याप मालिकेत एकही अर्धशतक साकारलेले नाही. त्याचप्रमाणे तिलक वर्माला या मालिकेत सातत्याने संघर्ष करावा लागला आहे. आता यानंतर थेट डिसेंबरमध्ये भारताची टी-२० मालिका असल्याने दोघेही खेळाडू मोठी खेळी साकारण्यासाठी आतुर असतील. त्याशिवाय अभिषेक शर्मा व सूर्यकुमार यांच्याकडून फटकेबाजी अपेक्षित आहे. जितेश शर्मा यष्टिरक्षक म्हणून छाप पाडत असल्याने संजू सॅमसनला आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते. नितीश रेड्डी व सुंदर हेसुद्धा फलंदाजीत पुरेसे योगदान देत आहे. शिवम दुबे अष्टपैलू भूमिका बजावत असल्याने भारतीय संघाचा योग्य समतोल साधला गेला आहे. फक्त एखाद्या फलंदाजाने मोठी खेळी साकारणे गरजेचे आहे.
हे महत्त्वाचे !
बुमराला टी-२०तील बळींचे शतक गाठण्यासाठी १ विकेटची गरज आहे. तसेच तिलकला टी-२० कारकीर्दीतील १,००० धावा पूर्ण करण्यासाठी ४ धावांची गरज आहे.
उभय संघांत आतापर्यंत ३६ टी-२० सामने झाले असून भारताने त्यापैकी २२, तर ऑस्ट्रेलियाने १२ लढती जिंकल्या आहेत. दोन सामने रद्द करण्यात आले आहेत.