IND vs AUS : सॅम कॉन्स्टाससोबतची 'टक्कर' महागात; विराट कोहलीला ICC ने दिला झटका

मेलबर्नच्या मैदानावर गुरूवारी (दि.२६) बॉक्सिंग डे कसोटीचा पहिला दिवस संपताच आयसीसीने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला झटका दिला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा १९ वर्षीय सलामीवीर सॅम कॉन्स्टाससोबत झालेली 'टक्कर' आणि त्यानंतर झालेली शाब्दिक चकमक यामुळे आयसीसीने विराटवर कारवाई केली आहे.
IND vs AUS : सॅम कॉन्स्टाससोबतची 'टक्कर' महागात; विराट कोहलीला ICC ने दिला झटका
Published on

मेलबर्नच्या मैदानावर गुरूवारी (दि.२६) बॉक्सिंग डे कसोटीचा पहिला दिवस संपताच आयसीसीने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला झटका दिला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा १९ वर्षीय सलामीवीर सॅम कॉन्स्टाससोबत झालेली 'टक्कर' आणि त्यानंतर झालेली शाब्दिक चकमक यामुळे आयसीसीने विराटवर कारवाई केली आहे.

नेमकं काय झालं?

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाकडून सॅम कॉन्स्टासने पदार्पण करताना उस्मान ख्वाजासोबत डावाची आक्रमक सुरूवात केली. सुरूवातीला काही चेंडू चाचपडल्यानंतर कॉन्स्टासने थेट भारताचा सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवरच हल्ला चढवला. चौकार, षटकार ठोकत त्याने स्फोटक अर्धशतक झळकावले आणि ऑस्ट्रेलियाला चांगली सुरूवात करुन दिली. दरम्यान, १० वे षटक संपल्यानंतर मैदानातील वातावरण तापल्याचं बघायला मिळालं. षटक संपल्यामुळे विराट कोहली नॉन-स्ट्राइकरच्या दिशेने क्षेत्ररक्षणासाठी आपल्या जागी जात होता. तर, कॉन्स्टास दुसऱ्या बाजूला येत होता. यावेळी खेळपट्टीवरच दोघांचा खांदा धडकला. लगेचच दोघेही मागे वळले आणि जोरदार बाचाबाचीला सुरूवात झाली. अखेर उस्मान ख्वाजा आणि पंचांना मध्यस्थी करत हा वाद शांत करावा लागला.

आयसीसीने केली कारवाई

विराट कोहलीने जाणूनबुजून धक्का दिल्यामुळे त्याच्यावर एका कसोटी सामन्याची बंदी घातली जाईल, अशी शक्यता अनेक क्रिकेटपटूंनी वर्तवली होती. मात्र, सुदैवाने कोहलीवर तितकी कठोर कारवाई झाली नाही. आयसीसीने कोहलीला मॅच फीच्या २० टक्के दंड ठोठावला. तसेच, एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला. गेल्या २४ महिन्यांतील कोहलीचा हा पहिलाच डिमेरिट पॉइंट ठरल्यामुळे मोठे नुकसान झाले नाही. सोशल मीडियावर मात्र ही घटना चांगलीच चर्चेत असून फोटो-व्हिडिओ व्हायरल होत आहेत. नेटकरी, माजी खेळाडू आपआपली मतेही नोंदवत आहेत.

दरम्यान, कॉन्स्टासने कारकिर्दीतील पहिले अर्धशतक अवघ्या ५२ चेंडूत पूर्ण केले. तो ६५ चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकारांसह ६० धावांची खेळी करून रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर तंबूत परतला. ऑस्ट्रेलियासाठी कसोटीत अर्धशतक झळकावणारा सॅम हा दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला. बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने सहा गडी बाद ३११ धावा केल्या आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पात्र ठरण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि भारत दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.

logo
marathi.freepressjournal.in