

ॲडलेड : रोहित शर्मा, श्रेयस अय्यर यांच्या वैयक्तिक अर्धशतकांनंतरही गुरुवारी भारताला पराभवाचा सामना करावा लागला. २ विकेट आणि २२ चेंडू राखून ऑस्ट्रेलियाने बाजी मारत ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्याच्या निमित्ताने कुलदीप यादवला संघाबाहेर ठेवण्याच्या निर्णयावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
दबावाखाली खेळताना रोहित शर्माने शानदार फलंदाजी करत ९७ चेंडूंत ७३ धावांची खेळी खेळली. त्यामुळे भारताने निर्धारित ५० षटकांत ९ फलंदाज गमावून २६४ धावा केल्या. मात्र हे लक्ष्य २५ धावांनी कमी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेले ऑस्ट्रेलियाचे फलंदाज फिरकी विरुद्ध चाचपडताना दिसले. मात्र कुलदीप यादवऐवजी नितीश रेड्डीला संधी दिल्याने त्याची किंमत भारताला चुकवावी लागली.
कुपर कॉन्नॉली (५३ चेंडूंत नाबाद ६१) आणि मिचेल ओवेन (२३ चेंडूंत ३६ धावा) या दोघांनी शानदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला विजयी लक्ष्याचा पाठलाग करून दिला. यजमान संघाने ४६.२ षटकांत बाजी मारत मालिकेत ऑस्ट्रेलियाला २-० ने विजयी आघाडी मिळवून दिली. या जोडीने ६.३ षटकांत ५९ धावांची भर घातली. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग ३ पराभवांच्या मालिकेली ब्रेक दिला.
रेड्डी हा आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने १० चेंडूंत ८ धावा केल्या. गोलंदाजीत तो महागडा ठरला. त्याने ३ षटकांत २४ धावा मोजल्या. अक्षर पटेलने मॅथ्यू शॉर्टचा सोपा झेल सोडला. तिच चूक भारताला भोवली. शॉर्टने ७४ धावा जमवून ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा पाया रचला.
कुलदीप यादवच्या अनुपस्थितीत अन्य दोन फिरकीपटूंसमोर ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज चाचपडताना दिसले. अक्षर पटेलने (१० षटकांत १/५२) गोलंदाजीचा वेग कमी करत आणि शॉर्ट लेन्थवर मारा करत मॅट रेनशॉला (३० धावा) आपल्या सापळ्यात अडकवले. दुसरीकडे वॉशिंग्टन सुंदरने (२/३७) प्रभावी गोलंदाजी करत स्विप फटका मारण्याच्या प्रयत्नात असताना ॲलेक्स कॅरीला त्रिफळाचीत केले. मिचेल ओवेन फलंदाजीला आल्यावर त्याने हर्षित राणावर (८ षटकांत २/५९) हल्ला करत सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने वळवला.
रोहितने सुरुवातीला संयमी खेळ केला. मिचेल स्टार्कला स्क्वेअर लेगवर त्याने अप्रतिम फटका मारला. नंतर मिचेल ओवेनला सलग दोन पुल शॉट्स मारून रोहितने आपला स्वभाव दाखवला. मैदानात स्थिरस्थावर झाल्यावर रोहितने ॲडम झम्पाला फटके मारत त्याच्या आक्रमक खेळाची झलक दाखवली. मात्र, स्टार्कला स्क्वेअर लेगला षटकार मारण्याच्या प्रयत्नात रोहित झेलबाद झाला.
विराट पुन्हा अपयशी
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने याही सामन्यात निराश केले. सलग दुसऱ्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला. झेवियर बार्टलेटच्या चेंडूने अचानक आत वळण घेतल्याने विराट पायचीत झाला. या सामन्यात विराटला भोपळाही फोडता आला नाही. त्याने ४ चेंडूंचा सामना केला. मात्र त्यात त्याला एकही धाव जमवता आली नाही.
रोहित, श्रेयसची अर्धशतके व्यर्थ
भारतातर्फे रोहित शर्माने चमकदार फलंदाजी केली. त्याने ९७ चेंडूंत ७३ धावा केल्या. त्यात ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. जोश हेझलवुडने ‘पॉवर प्ले’मध्ये रोहितला सतावले. हेझलवुडने आपल्या १० षटकांत केवळ २९ धावा दिल्या. रोहितने हेजलवुडच्या सलग १७ चेंडूंवर एकही धाव काढली नव्हती. श्रेयस अय्यरसह तो अतिशय सावधपणे खेळत होता. श्रेयस अय्यरनेही शानदार फलंदाजी केली. त्याने ७७ चेंडूंत ६१ धावा करताना ७ चौकार लगावले. पराभवामुळे या दोन्ही अर्धशतकवीरांची खेळी व्यर्थ गेली.
सुटलेले झेल हे भारताच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले. भारताने दिलेले धावसंख्येचे लक्ष्य पुरेसे होते. जेव्हा तुम्ही दोन-तीन झेल सोडता, तेव्हा अशा धावसंख्येचे रक्षण करणे सोपे नसते. रोहित शर्माने दीर्घ विश्रांतीनंतर पुनरागमन करून शानदार फलंदाजी केली. सुरुवातीला त्याने बचावात्मक खेळ केला. मात्र त्यानंतर त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्याचा मला अभिमान आहे. तो मोठी खेळी करू शकला असता.
शुभमन गिल, कर्णधार, भारत