

मेलबर्न : अनुभवी गोलंदाज जोश हेझलवूडने (१३ धावांत ३ बळी) केलेल्या प्रभावी माऱ्यापुढे भारतीय फलंदाजांची भंबेरी उडाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतावर ४ गडी व ४० चेंडू राखून मात केली. याबरोबरच त्यांनी पाच लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
उभय संघांतील पहिली लढत पावसामुळे रद्द झाली होती. दुसऱ्या सामन्यावरही पावसाचे सावट होते. मात्र सुदैवाने पूर्ण लढत पार पडली. भारताला १८.४ षटकांत १२५ धावांत गुंडाळल्यावर ऑस्ट्रेलियाने १३.२ षटकांत सहा फलंदाजांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. कर्णधार मिचेल मार्शने २६ चेंडूंत ४६ धावा फटकावल्या. हेझलवूड सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. आता रविवारी तिसरी लढत होबार्ट येथे खेळवण्यात येईल.
दिवाळीच्या झगमगाटात रोहित शर्मा-विराट कोहली यांच्या संस्मरणीय खेळीचा आनंद लुटल्यानंतर आता तमाम चाहत्यांसह भारतीय संघ टी-२० मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला बुधवारपासून कॅनबरा येथे प्रारंभ झाला. आशिया चषक विजेत्या सूर्यकुमारच्या नेतृत्वात खेळताना टी-२० मालिकेत यश संपादन करण्यासाठी भारत उत्सुक आहे. मात्र पहिली लढत फक्त ९.४ षटकांची झालेली असताना पावसाची तुफानी बॅटिंग सुरू झाली. त्यानंतर खेळ सुरू करणे शक्य न झाल्याने लढत रद्द करण्यात आली. भारताने ९.४ षटकांत १ बाद ९७ धावांपर्यंत मजल मारली होती. सूर्यकुमार ३९, तर शुभमन गिल ३७ धावांवर नाबाद होता.
दरम्यान, भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका नुकताच पार पडली. मिचेल मार्शच्या नेतृत्वात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतावर २-१ असा विजय मिळवला. मात्र त्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रोहितने शतक, तर विराटने अर्धशतक झळकावून चाहत्यांची मने जिंकली. तसेच अद्यापही आपल्यात धमक असून २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आपण शर्यतीत असल्याचे दाखवले. मात्र आता भारताच्या युवा ब्रिगेडकडे सर्वांचे लक्ष असेल.
पुढील वर्षी मार्च महिन्यात भारतात टी-२० विश्वचषक रंगणार आहे. त्यामुळे त्यादृष्टीने संघबांधणी करण्यासह प्रयोगांची चाचपणी करण्यासाठी भारताला या मालिकेत संधी मिळेल. सूर्यकुमारच्या नेतृत्वात सप्टेंबरमध्ये भारताने दुबईत नवव्यांदा आशिया चषक टी-२० स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. त्यानंतर आता महिन्याभराने भारतीय संघ टी-२० प्रकाराकडे वळला आहे. भारताचे पुढील ८ दिवसांत होबार्ट (२ नोव्हेंबर), गोल्ड कोस्ट (६ नोव्हेंबर) व ब्रिस्बेन (८ नोव्हेंबर) येथे अनुक्रमे लढती होतील.
दुसऱ्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना भारताचा संघ हेझलवूडपुढे ढेपाळला. त्याने शुभमन गिल (५), कर्णधार सूर्यकुमार यादव (१) व तिलक वर्मा (०) यांना माघारी पाठवले. एलिसने संजू सॅमसनला (२) पायचीत पकडले. अक्षर पटेलही ७ धावांवर धावचीत झाला. त्यामुळे भारतीय संघ ५ बाद ४९ अशा संकटात होता. त्यावेळी अनपेक्षितपणे हर्षित राणाला बढती देण्यात आली. त्याने ३३ चेंडूंत ३५ धावा करतानाच अभिषेकसह निर्णायक भागीदारी रचली.
एका बाजूने विकेट पडत असताना अभिषेक फटकेबाजी करतच होता. त्याने ८ चौकार व २ षटकारांसह टी-२० कारकीर्दीतील सहावे अर्धशतक साकारले. अभिषेक व हर्षितने सहाव्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी रचली. झेव्हियर बार्टलेटने हर्षित व शिवम दुबेचा (२) अडसर दूर केला, तर एलिसने अभिषेकला जाळ्यात अडकवले. त्यामुळे भारतीय संघ १२५ धावांतच गारद झाला. ऑस्ट्रेलियाच्या सर्व गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली.
लक्ष्याचा पाठलाग करताना मार्श व ट्रेव्हिस हेड (२८) यांनी २७ चेंडूंत ५१ धावांची सलामी नोंदवली. कुलदीप यादवने मार्श व जोश इंग्लिसला (२०) बाद केले. तर वरुण चक्रवर्तीने हेड व टिम डेव्हिडला तंबूत पाठवले. मात्र मिचेल ओवन (नाबाद १४) व मार्कस स्टोइनिस (नाबाद ६) यांनी १३.२ षटकांत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर दिमाखात शिक्कामोर्तब केले. भारताने ११ धावा अवांतरही दिल्या. आता तिसऱ्या लढतीत भारतीय संघ उत्तम कामगिरी करून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.
संक्षिप्त धावफलक
भारत : १८.५ षटकांत सर्व बाद १२५ (अभिषेक शर्मा ६८, हर्षित राणा ३५; जोश हेझलवूड ३/१३) पराभूत वि.
ऑस्ट्रेलिया : १३.२ षटकांत ६ बाद १२६ (मिचेल मार्श ४६, ट्रेव्हिस हेड २८; वरुण चक्रवर्ती २/२३)
सामनावीर : जोश हेझलवूड