IND vs BAN 2nd T20I : विजयी आघाडीसाठी टीम इंडिया सज्ज; प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार बदल? आज दुसरा टी-२० सामना

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय क्रिकेट संघ बुधवारी मालिका विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरणार
IND vs BAN 2nd T20I : विजयी आघाडीसाठी टीम इंडिया सज्ज; प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार बदल? आज दुसरा टी-२० सामना
एक्स (बीसीसीआय)
Published on

नवी दिल्ली : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय क्रिकेट संघ बुधवारी मालिका विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर (कोटला) भारत-बांगलादेश यांच्यात दुसरा टी-२० सामना रंगणार आहे.

गुवाहाटी येथील पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशला ७ गडी आणि ४९ चेंडू राखून सहज धूळ चारली. अर्शदीप सिंग व वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी ३ बळी मिळवून प्रथम बांगलादेशला १२७ धावांत रोखले. त्यानंतर संजू सॅमसन, सूर्यकुमार व हार्दिक पंड्या यांच्या उपयुक्त योगदानामुळे भारताने ११.५ षटकांत विजयी लक्ष्य गाठले. त्यामुळे आता बुधवारीच मालिका खिशात टाकण्यासाठी भारतीय संघ उत्सुक असेल.

दुसरीकडे नजमूल होसेन शांतोच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बांगलादेशला मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी ही लढत जिंकणे गरजेचे आहे. बांगलादेशने आधीच कसोटी मालिका ०-२ अशा फरकाने गमावलेली आहे. त्यामु‌ळे ते टी-२०मध्ये आव्हान देतील अशी अपेक्षा होती. मात्र नव्या दमाच्या भारतीय संघापुढेही बांगलादेश निष्प्रभ ठरला आहे. या स्टेडियममध्ये आयपीएलमधील १० पैकी ८ लढतीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने २०० धावा केल्या. त्यापैकी ३ वेळा धावांचा पाठलागही झाला. त्यामुळे बुधवारी चाहत्यांना चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळू शकते.

प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार बदल?

भारताने पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाज मयंक यादव आणि नितीश रेड्डी यांना पदार्पणाची संधी दिली होती. दोघांनीही आपला ठसा उमटवला. शिवाय, सलामीला संधी मिळालेल्या संजू सॅमसनसह अर्शदीप सिंगने वेगवान गोलंदाजीची भूमिका योग्य बजावली. तर फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीनेही तीन वर्षांनंतर यशस्वी पुनरागमन केले. संजूसोबत सलामीला आलेला अभिषेक शर्मानेही सुरूवात आक्रमक केली होती, पण लगेचच तो धावबाद झाला होता. त्यामुळे त्यालाही पुन्हा संधी मिळू शकते. एकंदरीत दुसऱ्या सामन्यात भारतीय संघव्यवस्थापन बदल करण्याची शक्यता कमीच आहे. हर्षित राणा, तिलक वर्मा, रवी बिश्नोई आणि जितेश शर्मा यांना संधीसाठी पुढील सामन्याची वाट बघावी लागू शकते.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयांक यादव.

बांगलादेश : नजमूल होसेन शांतो (कर्णधार), ताजिंद हसन, परवेज होसेन, तौहिद हृदय, महमदुल्ला रियाद, लिटन दास, जेकर अली, मेहदी हसन मिराज, मेहदी हसन, रिशाद होसेन, मुस्तफिझूर रहमान, तस्किन अहमद, शोरिफुल इस्लाम, तांझिम हसन शकिब, रकिबुल हसन.

वेळ : सायंकाळी ७ वाजल्यापासून , थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८ वाहिनी आणि जिओ सिनेमा ॲप

logo
marathi.freepressjournal.in