कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्याला शुक्रवारी (दि. २७) सकाळी सुरूवात झाली. मात्र, या सामन्यादरम्यान बांगलादेशचा 'सुपरफॅन' टायगर रॉबी याने त्याला भारतीय प्रेक्षकांनी मारहाण केल्याचा दावा केला आहे. तथापि, उत्तर प्रदेश पोलिसांनी रॉबीच्या आरोपांचे खंडन केले. तो डिहायड्रेशनमुळे कोसळला होता आणि त्याच्यावर कोणीही हल्ला केला नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे.
रॉबीच्या म्हणण्यानुसार ही घटना लंच ब्रेकच्या आधी घडली. “सकाळपासून जमावाचा एक भाग मला शिवीगाळ करीत होता. खेळ भोजनासाठी थांबला तेव्हा मी पाठिंबा देण्यासाठी फक्त नजमुल शांतो आणि मोमिनुल हक यांची जोरजोरात नावे घेत होतो. त्यावेळी जमावापैकी काही जणांनी मला हाकलायला सुरुवात केली, माझ्या अंगावरील कपडे आणि माझा ध्वज फाडण्याचा प्रयत्न केला. मी प्रतिकार केला असता त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली,” असे त्याने 'इंडियन एक्सप्रेस'ला सांगितले.
तथापि, घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने “ तो डिहायड्रेशनमुळे कोसळला. त्याच्यावर कोणाकडूनही हल्ला झाला नाही", असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी रॉबीला स्टेडियमच्या बाहेर नेले आणि रुग्णालयात दाखल केले.
स्टेडियमच्या एका ब्लॉकमधील बाल्कनीत रॉबी एकमेव चाहता होता, सुरक्षेच्या कारणास्तव ही बाल्कनी प्रेक्षकांसाठी बंद होती. “एका पोलिसाने मला त्या ब्लॉकमध्ये उभे राहू नका असे सांगितले. पण मी घाबरलो होतो म्हणून तिथे होतो. सकाळपासून ते शिवीगाळ करत होते. मी बरेच बॉलिवूड चित्रपट पाहिले आहेत, त्यामुळे शिवीगाळ मला समजते. स्वतःच्या संघाला, देशाला पाठिंबा देणे हा गुन्हा आहे का? ” असे तो म्हणाला. पोलिसांनी आरोपांचे खंडन केले असले तरी सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करुन त्याच्या आरोपांची चौकशी केली जाईल असे सांगितले आहे.
दरम्यान, बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर भारतात या मालिकेला विरोध होत होता. त्यानंतरही या मालिकेचे आयोजन करण्यात आले. आता कानपूर कसोटीच्या पहिल्याच दिवशी बांगलादेशच्या सुपरफॅनने आपल्याला प्रेक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या दिवसाचा खेळ ३५ षटकांनंतरच थांबवण्यात आला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशचे १०७ धावांवर तीन गडी बाद झालेत.