पुणे : विश्वविजेतेपद मिळवण्याच्या दिशेने सुसाट निघालेल्या भारतीय संघाच्या मार्गात गुरुवारी बांगला टायगर्स असतील. एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांगलादेश गुरुवारी आमनेसामने येतील. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (गहुंजे), पुणे येथे रंगणाऱ्या या लढतीत रखरखीत उन्हात चौकार-षटकारांची आतषबाजी करून विजयी चौकार लगावण्यासाठी रोहित शर्माचे शिलेदार सज्ज आहेत.
यजमान भारताने या विश्वचषकात धडाक्यात प्रारंभ करताना आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान या संघांना सहज धूळ चारली. या तिन्ही सामन्यांत भारताच्या गोलंदाजांनी वर्चस्वपूर्ण कामगिरी केली. त्याशिवाय फलंदाजीत रोहित, विराट कोहली, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर या सर्वांनी योगदान दिले. आता बांगला टायगर्सशी विश्वचषकात सहाव्यांदा भारतीय संघ दोन हात करणार असून या लढतीसाठीही यजमानांचेच पारडे जड मानले जात आहे.
दुसरीकडे शाकिब अल हसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बांगलादेशने तीनपैकी एक लढत जिंकली. अफगाणिस्तानला सलामीच्या सामन्यात नमवल्यानंतर बांगलादेशला इंग्लंड व न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागली. मात्र भारताविरुद्ध आशिया चषकातील विजय तसेच गेल्या एकदिवसीय मालिकेत साधलेली सरशी, याद्वारे प्रेरणा मिळवून बांगलादेशचा संघ उलटफेर करू शकतो. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरातील चाहत्यांना गुरुवारी रोमहर्षक लढत पाहायला मिळू शकते. फलंदाजीला पोषक अशी गहुंजेची खेळपट्टी असून सायंकाळच्या वेळेस येथे दवाचा घटक निर्णायक ठरेल.
भारत
गिलकडून मोठी खेळी अपेक्षित
युवा सलामीवीर शुभमन गिल डेंग्यूतून सावरला असून त्याने पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत चौकार लगावून उत्तम सुरुवातही केली. आता गिलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. यंदाच्या विश्वचषकात भारतासाठी आतापर्यंत सर्वाधिक २१७ धावा करणारा रोहित पुन्हा आक्रमक शैलीत खेळेल, यात शंका नाही. विराट, श्रेयस, राहुल असे सर्वच भारतीय फलंदाज फॉर्मात आहेत. हार्दिक पंड्या व रवींद्र जडेजा यांचे अष्टपैलू पर्यायही भारताकडे आहेत.
गोलंदाजांची फळी लयीत
जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि हार्दिक असे सर्वच भारतीय गोलंदाज सध्या लयीत आहेत. त्यांच्याविरुद्ध बांगलादेशचे फलंदाज किती वेळ तग धरणार, यावर सामन्याचे भवितव्य अवलंबून असेल. तसेच गरज पडली तर शार्दूल ठाकूरऐवजी मोहम्मद शमी किंवा रविचंद्रन अश्विनला खेळवण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. बुमराने भारतासाठी आतापर्यंत विश्वचषकात सर्वाधिक ८ बळी मिळवले आहेत.
बांगलादेश
लिटन, शाकिब, रहिमवर भिस्त
सलामीवीर लिटन दास, अनुभवी शाकिब आणि यष्टीरक्षक मुशफिकूर रहिम यांच्यावर प्रामुख्याने बांगलादेशच्या फलंदाजीची भिस्त आहे. नजमूल होसेन शांतोकडून मात्र त्यांना फलंदाजीत योगदान अपेक्षित आहे. शाकिब व रहिम भारताविरुद्ध विश्वचषकातील पाचवा सामना खेळणार आहेत. त्यामुळे या जोडीपासून भारताला सावध रहावे लागेल. त्याशिवाय मेहदी हसन मिराज त्यांच्यासाठी हुकमी एक्का ठरू शकतो.
तस्किन, मुस्तफिजूरकडे लक्ष
डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान आणि तस्किन अहमद यांच्या माऱ्याकडे चाहत्यांचे लक्ष असेल. बांगलादेशला फिरकी विभागात शाकिब व मेहदीकडून अपेक्षा आहेत. मात्र भारतीय फलंदाजांनी आक्रमण केल्यास बांगलादेशचे गोलंदाज दडपण कसे हाताळणार, हे पाहणे रंजक ठरेल.
यांच्यातील जुगलबंदीकडे लक्ष
रोहित विरुद्ध मुस्तफिजूर
डावखुऱ्या वेगवान गोलंदाजासमोर रोहित शर्मा अपयशी ठरल्याचे अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे मुस्तफिजूर रहमानविरुद्ध तो कशी फलंदाजी करणार, हे पाहणे मजेशीर ठरेल.
विराट विरुद्ध शाकिब
विराट कोहली आणि शाकिब अल हसन एकमेकांचे चांगले मित्र असून फार पूर्वीपासून एकमेकांच्या विरोधातही खेळत आले आहेत. डावखुऱ्या फिरकीपटूसमोर कोहली अनेकदा बाद झाला आहे. त्यामुळे विराट विरुद्ध शाकिब द्वंद्व रंगतदार होईल.
बुमरा विरुद्ध लिटन
जसप्रीत बुमरा सुरुवातीच्या षटकांत बळी मिळवण्यात पटाईत असून बांगलादेशचा लिटन दास आक्रमक प्रारंभ करण्यावर भर देतो. त्यामुळे बुमरा त्याला कसे रोखणार, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
२५
तब्बल २५ वर्षांनी प्रथमच बांगलादेशचा संघ भारताविरुद्ध भारतातच एकदिवसीय सामना खेळणार आहे. यापूर्वी मे, १९९८ रोजी वानखेडेवर उभय संघ अखेरचे आमनेसामने आले होते.
४२
२०२२पासून झालेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे ४२ फलंदाज डावखुऱ्या फिरकीपटूकडून बाद झाले आहेत. तर लेगस्पिनर्सने भारताचे २४ फलंदाज गारद केले आहेत.