
लंडन : इंग्लंडच्या लंडनमध्ये वसलेल्या लॉर्ड्स स्टेडियमला क्रिकेटमध्ये ऐतिहासिक महत्त्व आहे. क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या याच लॉर्ड्स स्टेडियमवर गुरुवारपासून भारत-इंग्लंड यांच्यातील निर्णायक तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. उभय संघांतील पाच लढतींची मालिका १-१ अशी बरोबरीत असल्याने दोन्ही संघांमध्ये आघाडी घेण्यासाठी जोरदार चुरस असेल. तसेच वेगवान गोलंदाजांना पोषक खेळपट्टीवर दोन्ही संघांतील फलंदाजांचा कस लागणार आहे.
आयसीसीने २०१९पासून जागतिक कसोटी अजिंक्यपद (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) स्पर्धा सुरू केली. तेव्हापासून भारताने दोन वेळेस म्हणजेच २०२१ व २०२३च्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र दोन्ही वेळेला भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०२५मध्ये मात्र भारताला अंतिम फेरीही गाठता आली नाही. मायदेशात भारताने तब्बल १२ वर्षांनी कसोटी मालिका गमावली. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धही बॉर्डर-गावस्कर मालिकेत सपाटून मार खाल्ला. रोहित शर्मा व विराट कोहली यांची कामगिरी यादरम्यान खालावली. परिणामी दोघांनीही जून महिन्यात कसोटी क्रिकेटला अलविदा केला. आता २०२५-२७च्या दोन वर्षांच्या डब्ल्यूटीसी हंगामाकडे पाहता २५ वर्षीय शुभमन गिलकडे भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. म्हणूनच या मालिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या पर्वाची सुरुवात पराभवाने झाली. लीड्स येथे झालेल्या पहिल्या कसोटीत बेन स्टोक्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या इंग्लंडने भारताला ५ गडी राखून धूळ चारली. मात्र दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ शैलीला नेस्तनाबूत करून त्यांचा ३३६ धावांनी धुव्वा उडवला. त्यातच आता तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराही संघात परतला असल्याने भारताचा आत्मविश्वास बळावला आहे. लॉर्ड्सची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना पोषक असून येथे चेंडूला अधिक उंची मिळण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, भारताने आजवर फक्त तीनदाच इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. २००७मध्ये भारताने राहुल द्रविडच्या नेतृत्वात येथे अखेरची मालिका जिंकली.