
बर्मिंगहॅम : फलंदाजांना पोषक खेळपट्टीवर बुधवारी भारताचा कर्णधार शुभमन गिलने नेत्रदीपक खेळी साकारली. त्याने कसोटी कारकीर्दीतील सातवे शतक साकारताना शुभसंकेत दिले. त्यामुळे बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन स्टेडियमवर सुरू झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताने पहिल्या दिवशी ३०० धावांचा पल्ला गाठला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत गिल २१६ चेंडूंत नाबाद ११४, तर रवींद्र जडेजा ६७ चेंडूंत ४१ धावांवर खेळत होता. भारताने ८५ षटकांत ५ बाद ३१० धावांपर्यंत मजल मारली होती.
आयसीसीने २०१९पासून जागतिक कसोटी अजिंक्यपद (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) स्पर्धा सुरू केली. तेव्हापासून भारताने दोन वेळेस म्हणजेच २०२१ व २०२३च्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र दोन्ही वेळेला भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०२५मध्ये मात्र भारताला अंतिम फेरीही गाठता आली नाही. मायदेशात भारताने तब्बल १२ वर्षांनी कसोटी मालिका गमावली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धही बॉर्डर-गावस्कर मालिकेत सपाटून मार खाल्ला. रोहित शर्मा व विराट कोहली या तारांकित फलंदाजांची कामगिरी यादरम्यान खालावली. परिणामी दोघांनीही जून महिन्यात कसोटी क्रिकेटला अलविदा केला. आता २०२५-२७च्या दोन वर्षांच्या डब्ल्यूटीसी हंगामाकडे पाहता २५ वर्षीय गिलकडे भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. म्हणूनच या मालिकेकडे तमाम देशवासियांचे लक्ष लागून आहे.
मात्र गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या पर्वाची सुरुवात पराभवाने झाली. लीड्स येथे झालेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने भारताला ५ गडी राखून धूळ चारली. मुख्य म्हणजे भारताकडून या कसोटीत पाच शतके झळकावली गेली. परंतु अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण व सुमार गोलंदाजीचा भारताला फटका बसला. जसप्रीत बुमरावर अतिविसंबून राहणेही भारताला महागात पडले. इंग्लंडने ३७१ धावांचा पाचव्या दिवशी यशस्वी पाठलाग करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मुख्य म्हणजे गेल्या ९ कसोटींपैकी भारताने फक्त एका सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे आता भारताला मालिकेत बरोबरी साधण्यासाठी एजबॅस्टनवर चांगला खेळ करावा लागेल. तारांकित जसप्रीत बुमराला भारताने या सामन्यासाठी विश्रांती दिली. तसेच शार्दूल ठाकूर व तिसऱ्या क्रमांकावरील डावखुरा फलंदाज साई सुदर्शन यांना वगळले. त्यांच्या जागी भारताने अनुक्रमे वेगवान गोलंदाज आकाश दीप, अष्टपैलू नितीश रेड्डी व फिरकी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर यांना संधी दिली. भारताच्या संघनिवडीवर अनेक माजी क्रिकेटपटूंनी टीका केली आहे.
दरम्यान, इंग्रजीचा पेपर भारतासाठी नेहमीच कठीण गेला आहे. भारताने आजवर फक्त तीनदाच इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. २००७मध्ये भारताने राहुल द्रविडच्या नेतृत्वात येथे अखेरची मालिका जिंकली. त्यानंतर महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांच्या नेतृत्वात भारताने इंग्लंड दौरे केले. मात्र त्यांना यश लाभले नाही. २०२१-२२मध्ये भारताने इंग्लंडला २-२ असे बरोबरीत रोखले. त्यावेळी काही सामन्यांत विराट, तर काही सामन्यात बुमरा भारताचा कर्णधार होता.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून पुन्हा एकदा प्रथम गोलंदाजी स्वीकारली. यावेळी के. एल. राहुल (२) स्वस्तात बाद झाला. ख्रिस वोक्सने त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर मुंबईकर यशस्वी आणि तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या करुण नायरने संघाला सावरले. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८० धावांची भर घातली. यशस्वीने कसोटीतील ११वे अर्धशतक साकारताना १३ चौकार लगावले. ब्रेडन कार्सने करुणचा ३१ धावांवर अडसर दूर केला. उपहाराला भारताची २ बाद ९५ अशी स्थिती होती.
दुसऱ्या सत्रात मग यशस्वीने गिलच्या साथीने किल्ला लढवला. यशस्वी सलग दुसरे शतक साकारणार असे वाटत असतानाच स्टोक्सने त्याला ८७ धावांवर बाद केले. मग शोएब बशीरने ऋषभ पंतला जाळ्यात अडकवले. पंतने २५ धावा केल्या. त्याने एक चौकार व एक षटकार लगावला. तर नितीश फक्त एका धावेवर बाद झाला. ५ बाद २११ अशा स्थितीतून मग गिल व जडेजाची जोडी जमली. गिलने १२ चौकारांसह अखेरीस सलग दुसरे व कसोटी कारकीर्दीतील सातवे शतक साकारले. गिलने पहिल्या कसोटीतसुद्धा शतक झळकावले होते. यावेळी त्याने रूटला चौकार लगावून थाटात शतकाची वेस ओलांडली.
दरम्यान, दुसरी कसोटी जेथे होणार आहे ते एजबॅस्टन स्टेडियम भारतासाठी आतापर्यंत दुर्दैवी ठरले आहे. एजबॅस्टन येथील ८ पैकी ७ कसोटींमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला आहे, तर एक लढत अनिर्णित राहिली आहे. २०२२मध्ये येथे भारत-इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी झाली होती. मात्र या कसोटीच्या चौथ्या डावात इंग्लंडने चक्क ३७८ धावांचे लक्ष्य गाठले. त्याशिवाय २०१८मध्ये भारताला येथे विराटच्या नेतृत्वात एका कसोटीत फक्त ३१ धावांनी पराभव पत्करावा लागला. एजबॅस्टनच्या खेळपट्टीवर साधारणपणे चौथ्या डावात २०० धावांचा पाठलाग करणेही कठीण जाऊ शकते. मात्र त्यासाठी हवामानाची साथ लाभणे आवश्यक आहे. हवामान काहीसे ढगाळ असेल, तर आपोआप फिरकीपटूंना सहाय्य मिळेल. त्यामुळे भारतीय फलंदाजांनी पहिल्या डावातच मोठी धावसंख्या उभारणे फार गरजेचे आहे. त्यामुळे गुरुवारचा दिवस निर्णायक ठरणार आहे.
संक्षिप्त धावफलक
भारत (पहिला डाव) : ८२ षटकांत ५ बाद ३०३ (शुभमन गिल नाबाद १०९, यशस्वी जैस्वाल ८७, रवींद्र जडेजा नाबाद ३९; ख्रिस वोक्स २/५१)