
लॉर्ड्स : क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स स्टेडियमवरील तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांना बळी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. इंग्लंडने पहिल्या दिवशी सावध सुरुवात केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने ८३ षटकांत ४ बाद २५१ धावा केल्या होत्या. त्यांचा अनुभवी फलंदाज जो रूट शतकापासून केवळ एक धाव दूर आहे. १९१ चेंडूंत ९९ धावांची झुंजार खेळी करुन रूट नाबाद आहे.
आयसीसीने २०१९पासून जागतिक कसोटी अजिंक्यपद (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) स्पर्धा सुरू केली. तेव्हापासून भारताने दोन वेळेस म्हणजेच २०२१ व २०२३च्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र दोन्ही वेळेला भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०२५मध्ये मात्र भारताला अंतिम फेरीही गाठता आली नाही. मायदेशात भारताने तब्बल १२ वर्षांनी कसोटी मालिका गमावली. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धही बॉर्डर-गावस्कर मालिकेत सपाटून मार खाल्ला. रोहित शर्मा व विराट कोहली यांची कामगिरी यादरम्यान खालावली. परिणामी दोघांनीही जून महिन्यात कसोटी क्रिकेटला अलविदा केला. आता २०२५-२७च्या दोन वर्षांच्या डब्ल्यूटीसी हंगामाकडे पाहता २५ वर्षीय शुभमन गिलकडे भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. म्हणूनच या मालिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या पर्वाची सुरुवात पराभवाने झाली. लीड्स येथे झालेल्या पहिल्या कसोटीत बेन स्टोक्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या इंग्लंडने भारताला ५ गडी राखून धूळ चारली. मात्र दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ शैलीला नेस्तनाबूत करून त्यांचा ३३६ धावांनी धुव्वा उडवला. त्यातच आता तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराही संघात परतल्याने भारतीय गोलंदाज लॉर्ड्सवर इंग्लंडला हैराण करतील, अशी आशा होती. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने या लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली.
बेन डकेट व झॅक क्रॉली यांनी यावेळी बॅझबॉल शैलीच्या विरोधात सावध सुरुवात केली. त्यांनी १३ षटकांत ४३ धावा फलकावर लावल्या. अखेरीस मध्यमगती गोलंदाज व अष्टपैलू नितीश रेड्डीने भारताला एकाच षटकात दुहेरी यश मिळवून दिले. १४व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर नितीशने डकेटचा (२३) अडसर दूर केला, तर त्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर त्याने अप्रतिम आऊटस्विंगवर क्रॉलीला (१८) चकवले. ऋषभ पंतने दोन्ही झेल घेतले. मात्र त्यानंतर रूट व ओली पोप यांची जोडी जमली. या दोघांनी उपहारापर्यंत संघाला २ बाद ८३ धावांपर्यंत नेले.
दुसऱ्या सत्रात इंग्लंडने एकही बळी गमावला नाही. रूटने कसोटीतील ६७वे अर्धशतक साकारले. तर पोपही अर्धशतकाकडे कूच करत होता. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १०९ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे चहापानाला इंग्लंडचा संघ २ बाद १५३ अशा सुस्थितीत होता. दुसऱ्या सत्रात पंतच्या बोटाला दुखापत झाल्याने ध्रुव जुरेल यष्टिरक्षणासाठी आला.
तिसऱ्या सत्रातील पहिल्याच चेंडूवर मात्र रवींद्र जडेजाने पोपचा (४४) अडसर दूर केला. त्यानंतर बुमराने अफलातून इनस्विंगवर हॅरी ब्रूकचा (११) त्रिफळा उडवला. ४ बाद १७२ धावांवरून रूट व स्टोक्स यांची जोडी जमल. त्यांनी ७३ षटकापर्यंत इंग्लंडला ४ बाद २२६ धावांपर्यंत मजल मारून दिली. त्यामुळे आता दुसऱ्या दिवशी भारताचे गोलंदाज काही कमाल करणार की इंग्लंड २०० धावांपलीकडे मजल मारणार, हे पाहणे रंजक ठरेल.
संक्षिप्त धावफलक
-इंग्लंड (पहिला डाव) : ८३ षटकांत ४ बाद २५१ (जो रूट (नाबाद) ९९, बेन स्टोक्स (नाबाद) ३९, ओली पोप ४४; नितीश रेड्डी २/४६)