IND vs ENG 5th Test : धरमशालाच्या गारव्यात आजपासून कसोटीची पर्वणी; 'शतकवीर' अश्विनकडे लक्ष

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. मात्र...
IND vs ENG 5th Test : धरमशालाच्या गारव्यात आजपासून कसोटीची पर्वणी; 'शतकवीर' अश्विनकडे लक्ष
(संग्रहित छायाचित्र)

धरमशाला : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. मात्र तरीही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) गुणतालिकेत अग्रस्थान मिळवण्याच्या हेतूने भारतीय संघ इंग्लंडवर पुन्हा एकदा वर्चस्व गाजवण्यासाठी आतुर आहे. धरमशाला येथील उंच पर्वतांच्या सानिध्यात आणि बोचणाऱ्या थंडीत भारत-इंग्लंड यांच्यात गुरुवारपासून पाचवी कसोटी सुरू होईल. या लढतीत प्रामुख्याने कारकीर्दीतील १००वी कसोटी खेळणाऱ्या अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.

हैदराबादला झालेल्या पहिल्या लढतीत बेन स्टोक्सच्या इंग्लंडने बाजी मारली. त्यानंतर मात्र रोहितच्या शिलेदारांनी विशाखापट्टणम, राजकोट आणि रांची येथे इंग्लंडचा धुव्वा उडवून मालिका खिशात घातली. स्टोक्स व प्रशिक्षक ब्रँडन मॅकलम यांच्या जोडीला ‘बॅझबॉल’ सुरू झाल्यापासून प्रथमच एखादी मालिका गमवावी लागली. विराट कोहली, के. एल. राहुल, मोहम्मद शमी असे अनुभवी खेळाडू नसतानाही भारताने युवा खेळाडूंच्या बळावर इंग्लंडला हैराण केले. त्यामुळे आता पाचव्या कसोटीतही युवा फलंदाज आणि अनुभवी गोलंदाज यांचा ताळमेळ साधून भारतीय संघ चमकदार कामगिरी करेल, असे अपेक्षित आहे.

धरमशालाची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना लाभदायक असेल, असे म्हटले जात असले तरी भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाजांना खेळवण्याचा निर्णय घेणे कठीण आहे. स्वत: रोहितने याबाबतीत पत्रकार परिषदेत इशारा दिला. तसेच इंग्लंडनेसुद्धा दोन वेगवान गोलंदाजांनाच संघात स्थान दिले आहे. येथील तापमान ५ ते १० डिग्रीच्या आसपास असल्याने इंग्लंडला त्यांच्या मायदेशात खेळत असल्याचे जाणवू शकते.

दरम्यान, कारकीर्दीतील ९९ कसोटींमध्ये ५०७ बळी टिपणाऱ्या ३७ वर्षीय अश्विनसाठी ही लढत संस्मरणीय असेल. अश्विनने या मालिकेत आतापर्यंत १७ बळी मिळवले असून त्याला या लढतीतही विविध विक्रम खुणावत आहेत. त्याशिवाय इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोचासुद्धा हा १००वा कसोटी सामना असेल. १०० कसोटी खेळणारा अश्विन हा १४वा भारतीय, तर बेअरस्टो हा इंग्लंडचा १७वा क्रिकेटपटू ठरेल.

बुमराचे पुनरागमन; यशस्वी सुसाट, पाटिदारवर दडपण

भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा विश्रांतीनंतर या लढतीसाठी संघात परतला आहे. त्यामुळे आकाश दीपला संघाबाहेर बसावे लागू शकते. भारतीय संघ अश्विन, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा या फिरकी त्रिकुटाशी फारशी छेडछाड करणार नाही. जडेजाला कसोटीतील ३०० बळींचा आकडा गाठण्यासाठी ८ बळींची गरज आहे. फलंदाजीचा विचार करता मालिकेत सर्वाधिक ६५५ धावा करणाऱ्या डावखुऱ्या यशस्वी जैस्वालवर पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष असेल. तसेच रोहित व शुभमन गिलसुद्धा योगदान देत आहेत. यष्टिरक्षक ध्रुव जुरेलने दुसऱ्याच सामन्यात जिगरबाज खेळी साकारून ठसा उमटवला. मात्र तीन कसोटींमध्ये फक्त ६३ धावा करणाऱ्या रजत पाटिदारकडून यावेळी मोठी खेळी अपेक्षित आहे. त्याच्या जागी देवदत्त पडिक्कलला संधी मिळणार का, हे पाहणे रंजक ठरेल. तसेच गेल्या सामन्यात अपयशी ठरल्यावर मुंबईकर सर्फराझ खान या कसोटीत पुन्हा लय मिळवण्यास सज्ज आहे.

अश्विनला अनेकदा विजयाचे पुरेसे श्रेय दिले जात नाही -रोहित

भारताचा कर्णधार रोहित शर्माने बुधवारी पत्रकार परिषदेत अश्विनचे कसोटी संघातील महत्त्व अधोरेखित करताना त्याला पुरेसे श्रेय दिले जात नाही, असे सांगितले. “२०११मध्ये अश्विनने कसोटी कारकीर्दीचा प्रारंभ केला. गेल्या १२-१३ वर्षांत त्याने कसोटी क्रिकेटसाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. तो आमच्यासाठी एक मॅचविनर आहे. १००व्या कसोटीसाठी त्याचे अभिनंदन. मात्र अनेकदा त्याला संघाच्या विजयाचे पुरेसे श्रेय दिले जात नाही. ५०० बळी मिळवणे सोपे काम नाही,” असे रोहित म्हणाला. “मी १७ ते १९ वर्षांखालच्या वयोगटात असल्यापासून अश्विनला जाणतो. त्यावेळी तो फलंदाज होता, तर मी ऑफस्पिन गोलंदाजी करायचो. मात्र कारकीर्दीच्या टप्प्यावर आम्ही दोघेही विरुद्ध दिशेला आहोत. त्याच्यासारखा खेळाडू संघात असल्यास कर्णधार म्हणून तुम्ही निश्चिंत असता. अश्विनला तुम्ही शब्दांत कधीच पकडू शकत नाही. क्रिकेटविषयीचे त्याचे ज्ञान कौतुकास्पद आहे,” असेही रोहितने नमूद केले. याव्यतिरिक्त, रोहितने पुन्हा एकदा खेळाडू तंदुरुस्त असेल, मात्र तो भारतीय संघाचा भाग नसेल तर त्याने त्यावेळी सुरू असलेल्या स्थानिक स्पर्धेत खेळणे अनिवार्य आहे, हे स्पष्ट केले. बीसीसीआयच्या वार्षिक कराराबाबत त्याने बोलणे टाळतानाच खेळाडूंनी स्थानिक स्पर्धांचे महत्त्व लक्षात घेणे गरजेचे आहे, हेदेखील सांगितले.

आईच्या सांगण्यावरून पुन्हा मैदान गाठले -अश्विन

राजकोट येथील तिसरी कसोटी सुरू असताना अश्विनची आई चित्रा यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना चेन्नईत रुग्णालयात आयसीयू विभागात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी अश्विन सामना अर्धवट सोडून माघारी परतला होता. मात्र आई रुग्णालयातील बेडवर असताना तिच्या सांगण्यावरूनच आपण पुन्हा दुसऱ्या दिवशी मैदानात परतलो, असे अश्विनने सांगितले. “जेव्हा मी रुग्णालयात पोहोचलो. तेव्हा आईला पाहून रडू कोसळले. मात्र तिने शुद्धीत आल्यावर मला ‘तू सामना सोडून का आलास?, हाच पहिला प्रश्न विचारला. तिच्या सांगण्यावरूनच मी दुसऱ्या दिवशी पुन्हा राजकोटला दाखल झालो,” असे अश्विन म्हणाला. सामना सोडून जाण्यापूर्वी अश्विनने ५००वा बळी मिळवला, तर दुसऱ्या दिवशी परतल्यावर त्याने ५०१वा गडी टिपला होता.

वूड परतला; रॉबिन्सनला इंग्लंडच्या संघातून डच्चू

इंग्लंडने नेहमीप्रमाणे एक दिवस अगोदरच अंतिम ११ खेळाडू जाहीर केले आहेत. त्यांनी ओली रॉबिन्सनच्या जागी मार्क वूड या वेगवान गोलंदाजाला पुन्हा संघात स्थान दिले आहे. जो रूटने गेल्या लढतीत शतक झळकावून फॉर्मात परतल्याचे संकेत दिल्याने इंग्लंडची चिंता कमी झाली आहे. मात्र सांघिक कामगिरी उंचावण्यात इंग्लंडचा संघ अपयशी ठरला आहे. तसेच स्टोक्स व बेअरस्टो यांनी फलंदाजीत निराशा केली आहे. बेअरस्टोने एकही अर्धशतकसुद्धा झळकावलेले नाही. त्यामुळे झॅक क्रॉली व बेन डकेट या सलामीवीरांवर अतिरिक्त दडपण येत आहे. गोलंदाजीत जेम्स अँडरसनला ७०० कसोटी बळींचा टप्पा गाठण्यासाठी फक्त २ विकेट्सची गरज आहे.

यशस्वीची क्रमवारीत १०व्या स्थानी झेप

मुंबईकर यशस्वी जैस्वालने बुधवारी आयसीसीच्या जागतिक कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत १०व्या स्थानी झेप घेतली. २०२३मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या यशस्वीने दोन स्थानांनी आगेकूच करताना ७२७ गुणांसह १०वा क्रमांक पटकावला. त्याच्यापुढे भारताचा विराट कोहली आठव्या स्थानी कायम आहे. रोहित शर्मा या यादीत ११व्या स्थानी आहे. न्यूझीलंडचा केन विल्यम्सन क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान आहे. गोलंदाजांमध्ये भारताच्या बुमरा आणि अश्विन यांनी अनुक्रमे पहिले दोन स्थान टिकवून ठेवले आहेत. अष्टपैलूंमध्ये भारताचा रवींद्र जडेजा पहिल्या क्रमांकावर आहे.

प्रतिस्पर्धी संघ

- भारत : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमरा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, सर्फराझ खान, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रजत पाटिदार, मुकेश कुमार, आकाश दीप, के. एस. भरत.

- इंग्लंड (अंतिम ११) : बेन स्टोक्स (कर्णधार), बेन डकेट, झॅक क्रॉली, जो रूट, ओली पोप, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टली, जेम्स अँडरसन, मार्क वूड, शोएब बशीर.

logo
marathi.freepressjournal.in