
बर्मिंगहॅम : एमआरएफची बॅट आणि भारतीय कसोटी संघातील चौथ्या क्रमांकाचे स्थान यांचे एक वेगळेच नाते आहे. गुरुवारी कसोटी क्रिकेटच्या पटलावर याच बॅटचा तडाखा अवघ्या क्रीडाविश्वाला पाहायला मिळाला. भारतीय कसोटी संघाचा युवा कर्णधार शुभमन गिलने गुरुवारी कारकीर्दीतील पहिले द्विशतक साकारले. गिलच्या ३८७ चेंडूंतील २६९ धावांच्या खेळीपुढे इंग्लंडचा संघ हवालदिल झाला. त्यामुळे भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात १५१ षटकांत ५८७ धावांचा डोंगर उभारला.
बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन स्टेडियमवर सुरू असलेल्या या कसोटीत भारताच्या पहिल्या डावाच्या प्रत्युत्तरात मग इंग्लंडची सुरुवात खराब झाली. पहिल्या दिवसाच्या अखेरपर्यंत इंग्लंडने २० षटकांत ३ बाद ७७ धावा केल्या होत्या. जसप्रीत बुमराच्या जागी संघात संधी लाभलेल्या वेगवान गोलंदाज आकाश दीपने बेन डकेट आणि ओली पोप यांचा तिसऱ्याच षटकात अडसर दूर केला. दोघेही शून्यावर बाद झाले. मुख्य म्हणजे पहिल्या कसोटीत या दोघांनीही शतके झळकावली होती. त्यानंतर मोहम्मद सिराजने झॅक क्रॉलीचा (१९) बळी मिळवून भारताला वर्चस्व मिळवून दिले. त्यामुळे आता तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ कशी फलंदाजी करणार, हे पाहणे रंजक ठरेल.
आयसीसीने २०१९पासून जागतिक कसोटी अजिंक्यपद (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) स्पर्धा सुरू केली. तेव्हापासून भारताने दोन वेळेस म्हणजेच २०२१ व २०२३च्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र दोन्ही वेळेला भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०२५मध्ये मात्र भारताला अंतिम फेरीही गाठता आली नाही. मायदेशात भारताने तब्बल १२ वर्षांनी कसोटी मालिका गमावली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धही बॉर्डर-गावस्कर मालिकेत सपाटून मार खाल्ला. रोहित शर्मा व विराट कोहली या तारांकित फलंदाजांची कामगिरी यादरम्यान खालावली. परिणामी दोघांनीही जून महिन्यात कसोटी क्रिकेटला अलविदा केला. आता २०२५-२७च्या दोन वर्षांच्या डब्ल्यूटीसी हंगामाकडे पाहता २५ वर्षीय गिलकडे भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. म्हणूनच या मालिकेकडे तमाम देशवासियांचे लक्ष लागून आहे.
गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या पर्वाची सुरुवात पराभवाने झाली. लीड्स येथे झालेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने भारताला ५ गडी राखून धूळ चारली. मुख्य म्हणजे भारताकडून या कसोटीत पाच शतके झळकावली गेली. परंतु अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण व सुमार गोलंदाजीचा भारताला फटका बसला. जसप्रीत बुमरावर अतिविसंबून राहणेही भारताला महागात पडले. इंग्लंडने ३७१ धावांचा पाचव्या दिवशी यशस्वी पाठलाग करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मुख्य म्हणजे गेल्या ९ कसोटींपैकी भारताने फक्त एका सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे आता भारताला मालिकेत बरोबरी साधण्यासाठी एजबॅस्टन येथे विजय मिळवणे अनिवार्य आहे.
दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर भारताने ५ बाद ३१० धावा केल्या होत्या. तेथून पुढे गुरुवारी दुसऱ्या दिवसाला प्रारंभ करताना गिल व रवींद्र जडेजा यांनी उत्तम खेळ केला. जडेजाने १० चौकार व १ षटकारासह कसोटीतील २३वे अर्धशतक साकारले. त्याने व गिलने सहाव्या विकेटसाठी २०३ धावांची मॅरेथॉन भागीदारी रचली. उपहाराला ५ मिनिटे शिल्लक असताना जडेजा जोश टंगच्या गोलंदाजीवर ८९ धावांवर बाद झाला.
मग गिल व वॉशिंग्टन सुंदर यांची जोडी जमली. आठव्या क्रमांकावर सुंदरला संधी देण्याचा निर्णय संघाच्या कामी आला. सुंदरने ३ चौकार व १ षटकारासह ११७ चेंडूंत ४२ धावांची झुंजार खेळी साकारली. मुख्य म्हणजे त्याने गिलला आवश्यक ती साथ दिली. त्यामुळे गिल आक्रमक खेळ करू शकला. गिल व सुंदरने सातव्या विकेटसाठी १४४ धावांची भागीदारी रचून भारताला ५५० धावांपलीकडे नेले. गिल १९९ धावांवर असताना दोन षटके त्याला स्ट्राइक मिळाली नाही. मात्र टंग टाकत असलेल्या डावातील १२२व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर गिलने एकेरी धाव घेतली आणि थाटात द्विशतकाचा जल्लोष केला. गिलचे हे कसोटीतील पहिलेच द्विशतक ठरले. तसेच इंग्लंडमध्ये कसोटीत द्विशतक साकारणारा तो पहिलाच भारतीय कर्णधार ठरला.
सुंदरच्या साथीने गिलने लगेच वैयक्तिक २५० धावांचा पल्लाही गाठला. ही जोडी भारताला ६०० धावांपलीकडे नेणार, असे वाटत होते. सुंदर अर्धशतक साकारणार असे वाटत असतानाच जो रूटने त्याचा अडसर दूर केला. चहापानाला भारताने ७ बाद ५६४ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यावेळी गिल २६५, तर आकाश शून्यावर होता.
तिसऱ्या सत्रात गिल कसा फलंदाजी करणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र चार धावांची भर घातल्यावर २६९ धावांवर तो टंगच्याच गोलंदाजीवर पोपकडे झेल देत माघारी परतला. गिलने ३० चौकार व ३ षटकारांसह ३८७ चेंडूंत २६९ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. त्यानंतर शोएब बशीरने आकाश व मोहम्मद सिराज (८) यांना झटपट बाद केले व १५१ षटकांत ५८७ धावांवर भारताचा डाव गुंडाळला. बशीरने इंग्लंडसाठी सर्वाधिक ३ बळी मिळवले. तर टंग व ब्रेडन कार्सने २ बळी मिळवले.
संक्षिप्त धावफलक
भारत (पहिला डाव) : १५१ षटकांत सर्व बाद ५८७ (शुभमन गिल २६९, रवींद्र जडेजा ८९. यशस्वी जैस्वाल ८७, वॉशिंग्टन सुंदर ४२; शोएब बशीर ३/१६७)
इंग्लंड (पहिला डाव) : २० षटकांत ३ बाद ७७ (जो रूट १८ (नाबाद), ब्रूक ३० (नाबाद) आकाश दीप २/३६, मोहम्मद सिराज १/२१)