
लंडन : ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत अतिबचावात्मक पवित्रा अवलंबणे भारताला महागात पडला, असे मत काही माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केले आहे. तसेच रवींद्र जडेजाने अखेरपर्यंत झुंज दिली असली, तरी त्याच्या मोठे फटके खेळण्याच्या इच्छाशक्तीवरही काहींना प्रश्न निर्माण केले आहेत.
भारत-इंग्लंड यांच्यात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून या मालिकेत इंग्लंडने २-१ अशी आघाडी घेतली आहे. सोमवारी पाचव्या दिवसातील अखेरच्या सत्रात १९२ धावांचा पाठलाग करणारा भारतीय संघ दुसऱ्या डावात १७० धावांत गारद झाला. त्यामुळे इंग्लंडने अवघ्या २२ धावांनी सरशी साधून क्रिकेटच्या पंढरीत संस्मरणीय विजय नोंदवला. शोएब बशीरच्या चेंडूवर मोहम्मद सिराज दुर्दैवीरीत्या त्रिफळाचीत झाल्याने इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. रवींद्र जडेजा १८१ चेंडूंत ६१ धावांची झुंजार खेळी साकारून नाबाद राहिला. मात्र जडेजाच्या याच बचावात्मक पवित्र्यावर सध्या काही माजी क्रिकेटपटूंनी टीका केली आहे.
“पाकिस्तानविरुद्ध चेन्नईत एका कसोटीत भारताला १२ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. इंग्लंडविरुद्धच्या पराभवाने मला त्याच पराभवाची आठवण झाली. जडेजासह जसप्रीत बुमरा व सिराज यांनी दिलेली झुंज कौतुकास्पद होती. मात्र संघाला विजयासाठी ३० ते ४० धावांच्या जवळपास गरज असताना जडेजाने किमान फिरकीपटू बशीरवर आक्रमण करायला हवे होते,” असे माजी फिरकीपटू अनिल कुंबळे म्हणाला.
“जडेजाकडे फिरकीपटूंना पुढे सरसावून षटकार लगावण्याची क्षमता आहे. तो वेगवान गोलंदाजांच्या षटकात चौथ्या-पाचव्या चेंडूवर एकेरी धाव घेत होता, हे मी समजू शकतो. मात्र बशीरवर त्याला आक्रमण करून धावांचे अंतर आणखी कमी करता आले असते. कारण सिराज व बुमराने मिळून १४ षटके जडेजाला साथ दिली. जडेजालाही हा पराभव जिव्हारी लागला असेल,” असे कुंबळेने सांगितले. त्याशिवाय संजय मांजरेकर आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर हर्षल गिब्स यांनीही भारताच्या सावध पवित्र्यावर निशाणा साधला आहे. “जडेजाने झुंजार खेळी साकारली, यात शंका नाही. मात्र तो आणि नितीश रेड्डी जेव्हा फलंदाजी करत होते, तेव्हा दोघांपैकी किमान एकाने आक्रमण करणे गरजेचे होते. ते दोघेही जिंकण्यासाठी नव्हे, तर फक्त वेळ काढण्यासाठी खेळत होते, असे वाटले,” असे मांजरेकर म्हणाला.
“भारतीय संघाच्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या डावात फटके खेळण्याची इच्छाशक्तीच दिसून आली नाही. त्यांनी बचावात्मक खेळ करत इंग्लंडला सामन्याची पकड मिळवू दिली. १००च्या आत सात बळी जाऊनही भारताला जिंकण्याची संधी होती. मात्र कधी-कधी आपल्या मनातील भीती आपल्यावर विजय मिळवते, तसेच काहीसे भारतीय संघासह घडले,” असे गिब्सने ट्वीट केले.