IND vd ENG ICC T20 WC26 : वानखेडेवर आज अहमदाबादचे तिकीट? इंग्लंडला नमवून अंतिम फेरी गाठण्याचे भारताचे ध्येय

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ गुरुवारी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी रंगणाऱ्या उपांत्य सामन्यात मुंबईसमोर इंग्लंडचे आव्हान असेल. त्यामुळे ही लढत जिंकून रविवार, ८ मार्च रोजी अहमदाबादला होणाऱ्या सामन्याचे तिकीट मिळवण्यासाठी भारतीय संघ आतुर असेल.
वानखेडेवर आज अहमदाबादचे तिकीट? इंग्लंडला नमवून अंतिम फेरी गाठण्याचे भारताचे ध्येय
वानखेडेवर आज अहमदाबादचे तिकीट? इंग्लंडला नमवून अंतिम फेरी गाठण्याचे भारताचे ध्येय
Published on

मुंबई : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ गुरुवारी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी रंगणाऱ्या उपांत्य सामन्यात मुंबईसमोर इंग्लंडचे आव्हान असेल. त्यामुळे ही लढत जिंकून रविवार, ८ मार्च रोजी अहमदाबादला होणाऱ्या सामन्याचे तिकीट मिळवण्यासाठी भारतीय संघ आतुर असेल.

भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या १०व्या पर्वाचे आयोजन करण्यात येत आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदाही गेल्या वेळेप्रमाणे २० संघ सहभागी झाले होते. भारत २०१६ नंतर प्रथमच टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. रोहितच्या नेतृत्वात २०२४मध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावला होता. या स्पर्धेत साखळी फेरीसाठी प्रत्येकी पाच संघांचा एक असे चार गट बनवण्यात आले होते. मग सुपर-आठ फेरीत दोन गट तयार करण्यात आले. पहिल्या गटातून दक्षिण आफ्रिका व भारत यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला, तर दुसऱ्या गटातून इंग्लंड व न्यूझीलंड यांनी आगेकूच केली होती. आता एकीकडे न्यूझीलंडने अंतिम फेरीत धडक मारलेली असल्याने रविवारी त्यांच्यासमोर भारतीय संघाचे आव्हान असावे, अशीच प्रार्थना तमाम भारतीय करत असतील.

भारताने साखळी फेरीत सलग चार सामने जिंकताना अनुक्रमे अमेरिका, पाकिस्तान, नेदरलँड्स व नामिबिया या संघांना नमवले. मग सुपर-आठ फेरीत भारताला पहिल्याच लढतीत आफ्रिकेकडून दारुण पराभव पत्करावा लागला. मात्र त्यातून सावरत भारताने झिम्बाब्वे व वेस्ट इंडिज यांना पराभूत केले. त्यामुळे भारताने लय मिळवली असून आता वानखेडेवर इंग्लंडला नमवून एकंदर चौथ्यांदा टी-२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्याचे भारताचे लक्ष्य असेल. भारताने २००७ व २०२४मध्ये टी-२० विश्वचषक उंचावलेला आहे. तर २०१४मध्ये त्यांना अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. मात्र २०१६मध्ये वानखेडेवरच उपांत्य सामन्यात भारतीय संघ यापूर्वी पराभूत झाला होता.

दुसरीकडे हॅरी ब्रूकच्या नेतृत्वात खेळणाऱ्या इंग्लडंने साखळी फेरीतून दुसऱ्या स्थानासह आगेकूच केली. मात्र सुपर-आठ फेरीत त्यांनी लय मिळवताना सलग तीन विजयांसह अग्रस्थान पटकावले. इंग्लंडचा संघ या स्पर्धेत वानखेडेवर दोन सामने खेळला आहे. त्यामुळे भारताप्रमाणेच तेसुद्धा येथील खेळपट्टीचा नूर जाणतात. इंग्लंडने २०१० व २०२२मध्ये टी-२० विश्वचषक जिंकलेला आहे. तर २०१६मध्ये त्यांना अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. आता तेसुद्धा चौथ्यांदा अंतिम फेरी गाठण्यास आतुर असतील. मुख्य म्हणजे २०२४च्या टी-२० विश्वचषकात भारताने इंग्लंडला उपांत्य फेरीतच नमवले होते.

एकूणच वानखेडेवर होणाऱ्या या लढतीकडे आता अवघ्या क्रीडाविश्वाचे लक्ष लागून आहे. तिकीटांसाठीही प्रचंड बोलणी चालू असून प्रत्येकाला स्टेडियममधून या लढतीचा आनंद लुटायचा आहे. अखेरीस भारतीय संघ विजयी व्हावा, हीच आशा बाळगून गुरुवारी तमाम क्रीडाप्रेमी वानखेडे स्टेडियम गाठतील. त्यामुळे आता उपांत्य फेरीत भारतीय खेळाडूंवर दडपणही असेल.

सॅमसन, बुमरावर भारताची भिस्त

वेस्ट इंडिजविरुद्ध निर्णायक खेळी साकारणारा संजू सॅमसन व तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा यांच्यावर पुन्हा एकदा भारताची भिस्त असेल. त्याशिवाय अभिषेक शर्मा व इशान किशन यांच्याकडून फटकेबाजी अपेक्षित आहे. सूर्यकुमार यादव व हार्दिक पंड्या यांनादेखील सातत्य दाखवता आलेले नाही. गोलंदाजीत वरुण चक्रवर्ती हुकमी एक्का ठरू शकतो. शिवम दुबेचा अष्टपैलू पर्यायही भारताकडे उपलब्ध आहे. अर्शदीप सिंग व अक्षर पटेल आपली कामगिरी चोख बजावत आहेत. प्रत्येक लढतीत भारतासाठी एखाद्या खेळाडूने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत भारतासाठी कोण नायक ठरणार, हे पाहणे रंजक ठरेल.

ब्रूक, आर्चरवर इंग्लंडची मदार, बटलरकडे लक्ष

इंग्लंडसाठी हॅरी ब्रूक व वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांची कामगिरी निर्णायक असेल. त्यांनी संपूर्ण स्पर्धेत सातत्याने चांगला खेळ केला आहे. मात्र अनुभवी सलामीवीर जोस बटलरच्या कामगिरीची इंग्लंडला चिंता सतावत आहे. कारण बटलरला या स्पर्धेत अद्याप एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. त्यामुळेच बटलरला वानखेडेवर सुरू गवसला, तर भारतासाठी धोक्याचे ठरू शकते.

खेळपट्टी आणि वातावरणाचा अंदाज

वानखेडेवर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला नेहमी सहाय्य लाभते. गुरुवारीसुद्धा असेच चित्र पाहायला मिळेल. खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक असून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघास सुरुवातीचे ५-१० षटके मदत मिळेल.

हे माहीत आहे का?

  • भारत-इंग्लंड टी-२० विश्वचषकात पाच वेळा आमनेसामने आले आहेत. त्यांपैकी ३ वेळा भारताने, २ वेळा इंग्लंडने विजय मिळवला आहे.

  • मुख्य म्हणजे इंग्लंडने २०२२च्या उपांत्य फेरीत भारताला नमवले, तर २०२४च्या टी-२० विश्वचषकातील उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडला हरवले. त्यामुळे आता २०२६मध्ये काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज.

इंग्लंड : हॅरी ब्रूक (कर्णधार), बेन डकेट, जोफ्रा आर्चर, रेहान अहमद, जोश टंग, लुक वूड, सॅम करन, फिल सॉल्ट (यष्टिरक्षक), जोस बटलर, जेमी ओव्हर्टन, जेकब बेथल, लियाम डॉसन, विल जॅक्स, आदिल रशिद, टॉम बँटन.

logo
marathi.freepressjournal.in