

नवी दिल्ली : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ गुरुवारी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर त्यांची अ-गटात नामिबियाशी गाठ पडणार आहे. या लढतीसाठी तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघात परतणार आहे, मात्र अभिषेक शर्माच्या प्रकृतीविषयी संभ्रम असल्याने संजू सॅमसनला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदाही गेल्या वेळेप्रमाणे २० संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येकी पाच संघांचा एक असे चार गट बनवण्यात आले आहेत. भारत २०१६नंतर प्रथमच टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. रोहितच्या नेतृत्वात २०२४मध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावला. आता भारतापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल.
या स्पर्धेत अ-गटात भारत, पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड्स, नामिबिया यांचा समावेश आहे. ब-गटात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड, झिम्बाब्वे, ओमान हे संघ आहेत. क-गटात इंग्लंड, वेस्ट इंडिज, नेपाळ, इटली, स्कॉटलंड यांना स्थान देण्यात आले आहे, तर ड-गटात न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, कॅनडा, संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांचा समावेश आहे. प्रत्येक गटातून आघाडीचे दोन संघ सुपर-आठ फेरीत दाखल होतील. मग सुपर-आठ फेरीत दोन गट तयार केले जातील. या फेरीच्या अखेरीस आघाडीवर असलेले दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होतील. ७ मार्चला अंतिम सामना खेळवण्यात येईल.
दरम्यान, जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारताने पहिल्या साखळी सामन्यात वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेला २९ धावांनी पराभूत केले. आघाडीची फळी ढेपाळल्यानंतर सूर्यकुमारने अनुभव पणाला लावून कर्णधारपदाला साजेशी नाबाद ८४ धावांची जिगरबाज खेळी साकारली होती. त्यामुळे भारताने १६१ पर्यंत मजल मारली. मग गोलंदाजांनी छाप पाडून अमेरिकेला १३२ धावांत रोखले. या सामन्यात बुमराह ताप आल्यामुळे खेळू शकला नव्हता. मात्र बुधवारी बुमराहने कसून सराव केला. तसेच तो लढतीसाठी उपलब्ध असल्याचे भारताचाच खेळाडू तिलक वर्माने बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
डावखुरा सलामीवीर अभिषेकची मात्र प्रकृती बिघडल्याने त्याच्या खेळण्याबाबत संभ्रम आहे. अमेरिकाविरुद्ध पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर अभिषेक क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला नाही. त्यावेळी त्याला ताप आला होता. मात्र भारतीय संघ नामिबियाविरुद्धच्या लढतीसाठी दिल्लीत दाखल झाल्यावर अभिषेकची प्रकृती आणखी बिघडली. पोट बिघडल्यामुळे त्याला मंगळवारी रुग्णालयातही दाखल करण्यात आले.
बुधवारी सायंकाळी त्याला डिस्चार्ज देण्यात आल्याचे समजते. मात्र अभिषेक गुरुवारी खेळणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. तिलकनेसुद्धा परिषदेत सामन्याच्या दिवशीच याविषयी निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. तसेच बुधवारी सॅमसन फलंदाजीचा सराव करताना आढळला. त्याने प्रशिक्षक गौतम गंभीर व अन्य सलामीवीर इशान किशनसह चर्चादेखील केली. त्यामुळे सॅमसनला संधी देण्यात येईल, असे समजते. भारताचा पुढील सामना रविवारी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.
सिराज किंवा अर्शदीपला वगळणार
बुमराह संघात परतणार असल्याने मोहम्मद सिराज किंवा अर्शदीप सिंग यांच्यापैकी एकाला संघाबाहेर करण्यात येईल, हे पक्के आहे. दिल्लीच्या कोटला स्टेडियमवर सायंकाळच्या वेळेस दव मोठ्या प्रमाणात येते. तसेच फिरकीपटूंना येथे पुरेसे सहाय्य लाभते. त्यामुळे भारतीय संघ वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल या फिरकी जोडीला विश्रांती देणे टाळेल. हार्दिक पंड्या व शिवम दुबे यांचे मध्यमगती गोलंदाजीचे पर्यायही भारतापुढे उपलब्ध आहेत. कुलदीप यादवसारखा अनुभवी फिरकीपटू संघाबाहेर आहे. त्याशिवाय अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरही तंदुरुस्त असून तो उर्वरित स्पर्धेसाठी संघात दाखल झाला आहे. त्यामुळे भारताकडे पुरेसे पर्याय आहेत.
सूर्या लयीत, अन्य फलंदाजांकडून अपेक्षा
अमेरिकाविरुद्ध भारताची फलंदाजी ढेपाळली होती. एकवेळ भारताची ६ बाद ७७ अशी स्थिती होती. सूर्यकुमार व अक्षर यांनी डोलारा सावरल्यामुळे भारताने सन्मानजनक धावसंख्या उभारली. आता दुसऱ्या लढतीत इशान किशन, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या यांच्याकडून सुधारणा अपेक्षित आहे. विशेषत: अभिषेक नसल्यास पॉवरप्लेमध्ये किशनवर आक्रमण करण्याची जबाबदारी असेल. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत किशनने चांगली कामगिरी केली होती. तसेच शिवम दुबे व रिंकू सिंग यांनाही जबाबदारीने खेळावे लागेल. डावखुऱ्या फलंदाजांचा भारताकडे भरणा असल्याने मधल्या फळीत सूर्यकुमारने फिरकीपटूंविरुद्ध टिकून राहणे निर्णायक असेल. सूर्यकुमारभोवतीच भारताचे अन्य फलंदाज आक्रमकपणे फटकेबाजी करू शकतील. आता नामिबियाविरुद्ध भारतीय फलंदाजांना लय मिळवण्याची उत्तम संधी आहे.
ट्रंपलमन, इरॅस्मसवर नामिबियाची भिस्त
जेराल्ड इरॅस्मसच्या नेतृत्वात खेळणाऱ्या नामिबियाला पहिल्या साखळी लढतीत नेदरलँड्सकडून पराभव पत्करावा लागला. भारताला ते कितपत झुंज देणार, याकडे लक्ष असेल. फिरकीपटू बर्नार्ड स्कोल्ट्झ, वेगवान गोलंदाज रुबेन ट्रंपलमन आणि जॅन निकोल यांच्यावर नामिबियाची भिस्त असेल. सराव सामन्यात नामिबियाला भारत-अ संघाकडून पराभव पत्करावा लागला होता.
भारताने टी-२० विश्वचषकात सलग ९ सामने जिंकले आहेत. यामध्ये २०२४च्या टी-२० विश्वचषकातील ८ सामन्यांचा समावेश आहे. तर नववा सामना भारताने नुकताच अमेरिकाविरुद्ध जिंकला. बुमराह या ९पैकी ८ लढतींमध्ये भारतीय संघाचा भाग होता.
भारत-नामिबिया यांच्यात आतापर्यंत एकच टी-२० सामना झाला आहे. २०२१च्या टी-२० विश्वचषकात झालेल्या त्या लढतीत भारताने नामिबियावर ९ गडी राखून वर्चस्व गाजवले होते.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज.
नामिबिया : जेराल्ड इरॅस्मस (कर्णधार), जॅन बाल्ट, जॅक ब्रेसेल, जॅन फ्रेलिंक, झेन ग्रीन, मॅक्स हेंगो, मलान क्रुगर, डायलन लिचर, जॅन निकोल, विल्यम मायबर्ग, बर्नार्ड स्कोल्ट्झ, बेन शिकोंगो, जेजे स्मित, लॉरेन स्टीनकॅम्प, रुबेन ट्रंपलमन.