

राजकोट : भारताच्या के. एल. राहुलने (९२ चेंडूंत नाबाद ११२ धावा) साकारलेल्या शतकावर न्यूझीलंडच्या डॅरेल मिचेलचे (११७ चेंडूंत नाबाद १३१ धावा) शतक भारी ठरले. भारताच्या गोलंदाजांनी सुमार मारा करून त्यास हातभार लावला. त्यामुळे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने भारतावर ७ गडी व १५ चेंडू राखून वर्चस्व गाजवले. याबरोबरच न्यूझीलंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर झालेल्या या लढतीत भारताने दिलेले २८५ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने ४७.३ षटकांत तीन फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले. मिचेलने ११ चौकार व २ षटकारांसह आठवे शतक साकारले. त्याला विल यंगच्या (८७) अर्धशतकाची सुरेख साथ लाभली. भारताकडून हर्षित राणा, प्रसिध कृष्णा, कुलदीप यादव यांनी एकेक बळी मिळवला. मात्र मिचेलला दिलेले जीवदान तसेच मधल्या षटकांतील स्वैर मारा भारताला महागात पडला. दवानेसुद्धा निर्णायक भूमिका बजावली. आता रविवार, १८ जानेवारीला रंगणाऱ्या तिसऱ्या लढतीत मालिका कोण जिंकणार, याकडे लक्ष असेल.
न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आला असून उभय संघांत तीन एकदिवसीय व पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. एकदिवसीय मालिकेच्या निमित्ताने चाहत्यांना पुन्हा एकदा रोहित शर्मा व विराट कोहली यांना एकत्रित खेळताना पाहण्याची संधी मिळत आहे. दुखापतीतून सावरलेल्या गिलचे या मालिकेसाठी भारतीय संघात पुनरागमन झाले असून तोच कर्णधारपद भूषवत आहे. तसेच श्रेयस अय्यरही संघात परतला आहे. गिल मानेच्या तसेच पायाच्या दुखापतीमुळे एक महिना संघाबाहेर होता, तर श्रेयसला ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या यांना मात्र फेब्रुवारीत होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने विश्रांती देण्यात आली आहे. एकदिवसीय प्रकाराचा विश्वचषक थेट २०२७मध्ये असल्याने भारताकडे त्याकरिता संघबांधणी करण्यासाठी तूर्तास पुरेसा वेळ आहे.
दरम्यान, रविवारी बडोदा येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय लढतीत भारताने न्यूझीलंडवर ४ गडी राखून मात केली होती. दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने ७ बाद २८४ धावा केल्या. रोहित व गिल यांनी १२ षटकांत ७० धावांची सलामी नोंदवली. मात्र यावेळी रोहित संघर्ष करताना दिसला. ३८ चेंडूंत २४ धावा काढून रोहित बाद झाला. त्यानंतर विराट (२३), श्रेयस अय्यर (८) स्वस्तात बाद झाल्याने मधली फळी कोसळली. कर्णधार गिलने ९ चौकारांसह अर्धशतक साकारले. मात्र जेमिसनने त्याचा अडसर दूर केला. ४ बाद ११८ स्थितीतून राहुल व रवींद्र जडेजा यांनी पाचव्या विकेटसाठी ७३ धावांची भर घातली. जडेजा २७ धावांवर बाद झाल्यावर नितीश रेड्डीसह राहुलने सहाव्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी रचली. नितीश (२०) बाद झाल्यावरही राहुलने मात्र अखेरपर्यंत फटकेबाजी केली व संघाला पावणेतीनशे धावांपलीकडे नेले. अन्यथा संघाला २५० धावा करणेही कठीण गेले असते.
लक्ष्याचा पाठलाग करताना मग न्यूझीलंडने डेवॉन कॉन्वे (१६) व हेन्री निकोल्स (१०) यांना लवकर गमावले. मात्र यंग व मिचेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी १६२ धावांची भागीदारी रचून विजयाचा पाया रचला. यंगला कुलदीपने बाद केले. मात्र मिचेलने ग्लेन फिलिप्सच्या (नाबाद ३२) साथीने न्यूझीलंडला ४७.३ षटकांत विजय मिळवून दिला. मिचेलचे हे भारताविरुद्ध तिसरे शतक ठरले, हे विशेष. आता तिसऱ्या सामन्यात भारतीय संघ दमदार कामगिरी करून मालिकेत २-१ अशी सरशी साधेल, अशी अपेक्षा तमाम भारतीय चाहत्यांना आहे.
जागतिक क्रमवारीत विराट अग्रस्थानी
भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहलीने तब्बल पाच वर्षांनी पुन्हा एकदा जागतिक एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अग्रस्थान काबिज केले. त्याने भारताचा रोहित शर्मा व न्यूझीलंडचा डॅरेल मिचेल यांच्यावर सरशी साधली. विराट यापूर्वी जुलै २०२१मध्ये क्रमवारीत अग्रस्थानी होता. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी रोहित पहिल्या, तर विराट दुसऱ्या स्थानी होता. मात्र आता रोहितची तिसऱ्या स्थानी घसरण झाली असून मिचेलने दुसरे, तर विराटने अग्रस्थान पटकावले आहे. विराटच्या खात्यात सध्या ७८५ गुण असून मिचेलकडे ७८४ गुण आहेत. रोहित ७७४ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. गिल पाचव्या क्रमांकावर कायम आहे. राहुलने ११वा क्रमांक मिळवला आहे. गोलंदाजांमध्ये भारताच्या कुलदीप यादवने तिसरे स्थान कायम राखले असून अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशिद खान पहिल्या क्रमांकावर आहे.
संक्षिप्त धावफलक
भारत : ५० षटकांत ७ बाद २८४ (के. एल. राहुल नाबाद ११२, शुभमन गिल ५६; क्रिस्टियन ३/५६) पराभूत
न्यूझीलंड : ४७.३ षटकांत ३ बाद २८६ (डॅरेल मिचेल नाबाद १३१, विल यंग ८७, ग्लेन फिलिप्स नाबाद ३२; प्रसिध कृष्णा १/४९)
सामनावीर : डॅरेल मिचेल