वॉशिंग्टनचे सुंदर सप्तक! न्यूझीलंडला २५९ धावांत गुंडाळले, भारतासाठी पहिल्यांदाच दोन ऑफस्पिनरने केली 'अशी' कामगिरी

IND vs NZ, 2nd Test : पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये जमलेल्या दर्दी चाहत्यांना गुरुवारी वॉशिंग्टन सुंदरच्या (५९ धावांत ७ बळी) ऑफस्पिन गोलंदाजीचा अतिसुंदर नजराणा पाहायला मिळाला.
वॉशिंग्टनचे सुंदर सप्तक! न्यूझीलंडला २५९ धावांत गुंडाळले, भारतासाठी पहिल्यांदाच दोन ऑफस्पिनरने केली 'अशी' कामगिरी
बीसीसीआय
Published on

पुणे : पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये जमलेल्या दर्दी चाहत्यांना गुरुवारी वॉशिंग्टन सुंदरच्या (५९ धावांत ७ बळी) ऑफस्पिन गोलंदाजीचा अतिसुंदर नजराणा पाहायला मिळाला. २५ वर्षीय सुंदरला ३८ वर्षीय रविचंद्रन अश्विनची (६४ धावांत ३ बळी) उत्तम साथ लाभली. तमिळनाडूच्या या फिरकी जोडीने कमाल केल्यामुळे भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर वर्चस्व गाजवले. गहुंजे येथे सुरू असलेल्या या लढतीत भारताने न्यूझीलंडचा पहिला डाव ७९.१ षटकांत २५९ धावांत गुंडाळला. पण, त्यानंतर भारताचीही सुरूवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्माच्या रूपात भारताने पहिली विकेट स्वस्तात गमावली. टिम साऊदीच्या अप्रतिम चेंडूवर रोहितचा शून्यावरच त्रिफळा उडाला.

रोहितनंतर शुभमन गिल (३२ चेंडूंत नाबाद १०) आणि यशस्वी जैस्वाल (२५ चेंडूंत नाबाद ६) यांनी उर्वरित षटके संयमीपणे खेळून काढली. पहिल्या दिवसअखेर ११ षटकांत १ बाद १६ धावा केल्या आहेत. भारतीय संघ अद्याप २४३ धावांनी पिछाडीवर असून फिरकीला पोषक खेळपट्टीवर ते दुसऱ्या दिवशी कशी फलंदाजी करतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

तत्पूर्वी, उभय संघांतील ३ लढतींच्या मालिकेत न्यूझीलंड १-० अशी आघाडीवर आहे. त्यामुळे ही कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचे भारतावर दडपण आहे. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याचे ठरवले. मॅट हेन्री दुखापतीमुळे या लढतीत खेळत नसून किवी संघाने डावखुरा फिरकीपटू मिचेल सँटनरला संघात स्थान दिले. तर भारतानेसुद्धा ३ बदल केले. शुभमन गिल संघात परतल्याने के. एल. राहुल संघाबाहेर गेला. तसेच कुलदीप यादवच्या जागी सुंदर, तर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या जागी आकाश दीपला संधी देण्यात आली. रोहित व संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर चाहत्यांनी तसेच क्रीडा तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली, तर काहींच्या भुवयाही उंचावल्या. मात्र सुंदरने तरी त्याची निवड सध्या सार्थ ठरवली.

न्यूझीलंडची सुरुवात आश्वासक झाली. जसप्रीत बुमरा व आकाश यांचा पहिला ७ षटकांचा स्पेल लॅथम व डेवॉन कॉन्वे यांनी उत्तमरित्या खेळताना ३२ धावा वसूल केल्या. मात्र आठव्या षटकात अश्विनचे गोलंदाजीसाठी आगमन झाले व त्याने लॅथमला (१५) पायचीत पकडले. विल यंगनेसुद्धा १८ धावा करताना कडवा प्रतिकार केला. मात्र अश्विनच्या लेग स्टम्पबाहेरील चेंडूला छेडण्याच्या नादात तो ऋषभ पंतकडे झेल देऊन माघारी परतला. यंग व कॉन्वेने ४४ धावांची भर घातली. उपाहाराला किवी संघाने ३१ षटकांत २ बाद ९२ धावा केल्या.

दुसऱ्या सत्रात कॉन्वे व रचिन रवींद्र या डावखुऱ्या फलंदाजांच्या जोडीने भारतीय फिरकीपटूंवर आक्रमण केले. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी रचली. कॉन्वेने ११ चौकारांसह सलग दुसरे अर्धशतक साकारले. अखेर अश्विननेच त्याला ७६ धावांवर बाद करून ही जोडी फोडली. रचिन मात्र एका बाजूने सहज धावा लुटत होत्या. डॅरेल मिचेलनेही त्याला सुरेख साथ दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ५९ धावांची भर घातली. पहिल्या लढतीतील सामनावीर रचिनने ५ चौकार व १ षटकारासह ६५ धावा केल्या. चहापानाला अवघी १५ मिनिटे शिल्लक असताना रोहितने पुन्हा सुंदरच्या हाती चेंडू दिला व येथून सामन्याला कलाटणी मिळाली.

सुंदरने अफलातून चेंडूवर रचिनला चकवून यष्ट्यांचा वेध घेतला. तर दुसऱ्या सत्रातील अखेरच्या चेंडूवर त्याने टॉम ब्लंडेलचाही (३) त्रिफळा उद्ध्वस्त केला. ५ बाद २०१ धावांवरून तिसऱ्या सत्राला प्रारंभ झाल्यावर सुंदरने किवी फलंदाजांची कोंडी करण्याचे काम सुरूच ठेवले. त्याने मिचेलला १८ धावांवर पायचीत पकडले. अचानक न्यूझीलंडची ३ बाद १९७ वरून ६ बाद २०४ अशी घसरगुंडी उडाली. त्यामुळे ग्लेन फिलिप्स व सँटनर यांनी आक्रमण केले. मात्र सुंदरने फिलिप्सला (९) फार काळ टिकू दिले नाही. मग साऊदीला (५) जाळ्यात अडकवून त्याने कारकीर्दीत प्रथमच एका डावात ५ बळी घेण्याची किमया साधली.

सँटनरने ३ चौकार व २ षटकारांसह ३३ धावा करून न्यूझीलंडला अडीचशे धावांचा पल्ला गाठून दिला. अखेर सुंदरनेच प्रथम एजाझ पटेल (४) व नंतर सँटनरचाही (३३) त्रिफळा उडवला व २५९ धावांवर किवी संघाचा डाव संपुष्टात आणला. सुंदरने ७ व अश्विनने ३ बळी मिळवून फिरकीपटूंसाठी खेळपट्टी लाभदायी असल्याचे पहिल्याच दिवशी दाखवून दिले.

चाहत्यांची होरपळ आणि पाण्यासाठी वणवण

पुण्यातील स्टेडियममध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने चाहत्यांची काळजी घेतली नाही, अशी टीका स्टेडियममधीलच संतप्त क्रीडाप्रेमींनी केली. येथील अर्ध्याहून स्टेडियमवरील भागात छप्पर नसल्याने भर उन्हात चाहत्यांची होरपळ झाली. तसेच चाहत्यांसाठी मोफत पाण्याची सुविधाही येथे नव्हते. कोणत्याही आंतरराष्ट्रीय लढतीसाठी चाहत्यांना मोफत पाणी देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. अखेर संघटनेच्या सचिवांना याबाबत समजल्यावर त्यांनी दुसऱ्या सत्रापर्यंत प्रत्येक स्टँडबाहेर मोफत पाण्याचा स्टॉल लावला. मात्र तोपर्यंत चाहत्यांचे हाल झाल्याने अनेकांनी ‘एमसीए हाय हाय, एमसीए हमे पानी दो’ अशो घोषणा स्टँडबाहेर तसेच प्रत्यक्ष सामना सुरू असतानाही लगाल्या.

भारतासाठी प्रथमच दोन ऑफस्पिनरने केली 'अशी' कामगिरी

- भारतासाठी प्रथमच एका डावातील सर्व १० बळी उजव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या ऑफस्पिनरने घेतले. अश्विनने पहिले ३, तर सुंदरने त्यानंतरचे ७ बळी मिळवले. यापूर्वी एकंदर ४ वेळा ऑफस्पिनरने डावातील १० बळी मिळवले आहेत. यामध्ये मुरलीधरन-अजंथा मेंडिस, मुरलीधरन-कुमार धर्मसेना, टॉनी ग्रेग-पॅट पकॉक व जिम लेकर यांचा समावेश आहे.

संक्षिप्त धावफलक

-न्यूझीलंड (पहिला डाव) : ७९.१ षटकांत सर्व बाद २५९ (डेवॉन कॉन्वे ७६, रचिन रवींद्र ६५; वॉशिंग्टन सुंदर ७/५९, रविचंद्रन अश्विन ३/६४)

-भारत (पहिला डाव) : ११ षटकांत १ बाद १६ (शुभमन गिल नाबाद १०, यशस्वी जैस्वाल नाबाद ६, रोहित शर्मा ०; टिम साऊदी १/४)

logo
marathi.freepressjournal.in