IND vs NZ : भारताचा बरोबरीसाठी आटापिटा! आजपासून दुसरी कसोटी, गिल पुनरागमनासाठी सज्ज; कुलदिपच्या जागी वॉशिंग्टनला संधी?

भारतीय क्रिकेट संघावर तब्बल १२ वर्षांनी मायदेशात कसोटी मालिका गमावण्याची नामुष्की ओढवू शकते. मात्र यापूर्वीही भारताने अनेकदा ०-१ अशा पिछाडीवरून मालिका जिंकण्याचा पराक्रम केलेला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रट्विटर
Published on

पुणे : भारतीय क्रिकेट संघावर तब्बल १२ वर्षांनी मायदेशात कसोटी मालिका गमावण्याची नामुष्की ओढवू शकते. मात्र यापूर्वीही भारताने अनेकदा ०-१ अशा पिछाडीवरून मालिका जिंकण्याचा पराक्रम केलेला आहे. त्यामुळे गुरुवारपासून पुणे येथील सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारे भारताचे शिलेदार दमदार कामगिरी करतील, अशी आशा तमाम चाहते बाळगून आहेत.

उभय संघांतील बंगळुरू येथे झालेली पहिली कसोटी न्यूझीलंडने जिंकून ३ लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. यापूर्वी २०१२मध्ये इंग्लंडविरुद्ध भारताने भारतातच अखेरची कसोटी मालिका गमावली. तसेच २०१७मध्ये ऑस्ट्रेलिया व २०२१, २०२४मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिली कसोटी गमावूनसुद्धा भारताने झोकात पुनरागमन करत मालिका जिंकलेली आहे. आता गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर न्यूझीलंडशी दोन हात करताना मालिकेत १-१ अशी बरोबरी साधण्याचेच भारताचे लक्ष्य असेल. विशेष म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर खेळणारा युवा फलंदाज शुभमन गिल या कसोटीसाठी तंदुरुस्त होऊन संघात परतणार आहे. त्यामुळे के. एल. राहुल किंवा सर्फराझ खान यांच्यापैकी एकालाच अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळेल, हे निश्चित.

३२ वर्षीय राहुलने गेल्या ६ कसोटींपासून मधल्या फळीत फलंदाजी करताना १ शतक व २ अर्धशतके झळकावली आहेत. गेल्या लढतीत तो फक्त ० व १२ धावांवर बाद झाला. दुसरीकडे २७ वर्षीय मुंबईकर सर्फराझने पहिल्या कसोटीत चौथ्या स्थानी फलंदाजी करताना दीडशतक झळकावले. मात्र आता गिल परतल्यामुळे तो तिसऱ्या, विराट चौथ्या, तर ऋषभ पंत पाचव्या स्थानी खेळेल. अशा स्थितीत सहाव्या क्रमांकासाठी सर्फराझ व राहुलमध्ये जुगलबंदी आहे.

दुसरीकडे, टॉम लॅथमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंडने ३६ वर्षांनी भारतात कसोटी जिंकण्याची किमया साधली. त्यांना ऐतिहासिक मालिका विजय साकारण्याची संधी आहे. केन विल्यम्सन या कसोटीसाठीही अनुपलब्ध असेल. त्यांची वेगवान गोलंदाजी विरुद्ध भारताची फलंदाजी यांच्यातील द्वंद्व पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.

निरभ्र आकाश आणि फिरकीपटूंना सहाय्य

गहुंजे स्टेडियमची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी पोषक असेल, असे समजते. बंगळुरूत वेगवान गोलंदाजांसाठी पोषक खेळपट्टीवर भारताचा ४६ धावांत खुर्दा झाला. त्यामुळे आता पारंपरिकपणे तिसऱ्या-चौथ्या दिवसापासून फिरकीपटूंना सहाय्य मिळेल व पहिले दोन-तीन दिवस फलंदाजांचे वर्चस्व राहेल, असे चित्र पाहायला मिळू शकते. तसेच येथे पावसाची शक्यता नसून पाचही दिवस पुरेसा सूर्यप्रकाश असेल. अशा स्थितीत खेळाडूंच्या तंदुरुस्तीचाही कस लागणार आहे.

पंत तंदुरुस्त; रोहित, विराटवर लक्ष

ऋषभ पंतही गुडघ्याच्या दुखापतीतून सावरला असल्याने तो या लढतीत यष्टिरक्षण करणार आहे. मात्र फलंदाजीत प्रामुख्याने रोहित व विराट कोहली या खेळाडूंवर चाहत्यांचे लक्ष असेल. पुण्यात झालेल्या अखेरच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात विराटने शतक झळकावले होते. तसेच कसोटीतील सर्वोच्च २५४ धावांची खेळी त्याने पुण्यातच साकारली. गेल्या लढतीत रोहित व विराट या दोघांनीही अर्धशतक झळकावले. त्यामुळे आता चाहत्यांना या तारांकित फलंदाजांकडून मोठी खेळी अपेक्षित आहे. सलामीवीर यशस्वी जैस्वाल उत्तम लयीत आहे.

कुलदीपच्या जागी वॉशिंग्टनला संधी?

भारतीय संघ या कसोटीत पुन्हा एकदा तीन फिरकीपटूंसह मैदानात उतरू शकतो. गेल्या लढतीत रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा फलंदाजीत फारसे योगदान देऊ शकले नाहीत. तसेच न्यूझीलंडच्या संघात पहिल्या पाचमध्ये तीन डावखुरे फलंदाज आहेत. ते पाहता कुलदीप यादवच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला ऑफस्पिन गोलंदाजी व खालच्या क्रमांकावर फलंदाजीत योगदान देण्याच्या हेतूने संघात स्थान मिळू शकते. तसेच मोहम्मद सिराजच्या जागी आकाश दीपला संधी दिली जाऊ शकते. जसप्रीत बुमरावर पुन्हा एकदा गोलंदाजीचा भार असेल.

- उभय संघांत आतापर्यंत झालेल्या ६३ सामन्यांपैकी भारताने २२, तर न्यूझीलंडने १४ कसोटी जिंकलेल्या आहेत. उर्वरित २७ लढती अनिर्णित राहिल्या आहेत. त्यामुळे आकडेवारीनुसार भारताचे पारडे जड आहे.

प्रतिस्पर्धी संघ

- भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, के. एल. राहुल, सर्फराझ खान, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमरा, वॉशिंग्टन सुंदर.

- न्यूझीलंड : टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल, मार्क चॅपमन, डेवॉन कॉन्वे, जेकब टफी, मॅट हेन्री, डॅरेल मिचेल, विल्यम ओरूरके, एजाझ पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, इश सोधी, टिम साऊदी, विल यंग.

logo
marathi.freepressjournal.in