

विशाखापट्टणम : न्यूझीलंड संघाविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताला ५० धावांनी पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद २१५ धावा केल्या. मात्र शिवम दुबेच्या (२३ चेंडूंत ६५ धावा) अर्धशतकानंतरही भारताचा संघ १८.४ षटकांत १६५ धावांत गारद झाला. मालिकेत भारताकडे ३-१ अशी आघाडी असून शनिवारी पाचवा सामना खेळवण्यात येईल.
मायदेशात रंगणारी आयसीसी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आता अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेली टी-२० मालिका ही भारतासाठी एकप्रकारे विश्वचषकाची पूर्वपरीक्षा असणार आहे. न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आला असून उभय संघांत नुकताच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडली. यामध्ये न्यूझीलंडने २-१ अशी बाजी मारली. आता लक्ष पूर्णपणे टी-२० सामन्यांकडे वळले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच लढतींनंतर ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषकाचे आयोजन केले जाणार आहे. २०२४मध्ये भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वात विश्वचषक उंचावला होता. त्यामुळे भारतापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल.
दरम्यान, भारतीय संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिका खेळत आहे. भारताने अनुक्रमे नागपूर, रायपूर, गुवाहाटी येथे झालेल्या लढतींमध्ये किवी संघावर एकतर्फी वर्चस्व गाजवून आधीच आघाडी घेतली.