IND vs NZ, 4th T20I : फिलिप्सचे वादळी शतक; भारताचा पहिला पराभव

ग्लेन फिलिप्सचे (४९ चेंडूंत १०७ धावा) तुफानी शतक आणि वेगवान गोलंदाज जेकब डफीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने चौथ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचा ८७ धावांनी दणदणीत पराभव केला.
IND vs NZ, 4th T20I : फिलिप्सचे वादळी शतक; भारताचा पहिला पराभव
IND vs NZ, 4th T20I : फिलिप्सचे वादळी शतक; भारताचा पहिला पराभव(Photo-X)
Published on: 

ऑकलंड : ग्लेन फिलिप्सचे (४९ चेंडूंत १०७ धावा) तुफानी शतक आणि वेगवान गोलंदाज जेकब डफीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने चौथ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचा ८७ धावांनी दणदणीत पराभव केला. शुक्रवारी झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर प्रभावी कामगिरी केली. मात्र, पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने पहिले तीन सामने जिंकून यापूर्वीच विजयी आघाडी घेतली आहे. या विजयामुळे न्यूझीलंडने मालिकेत १-३ अशी पिछाडी कमी केली.

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने सात गड्यांच्या मोबदल्यात २० षटकांत २५९ धावांचा डोंगर उभा केला. ग्लेन फिलिप्सने अवघ्या ४९ चेंडूंत १०७ धावांची आक्रमक खेळी केली. त्याला मायकेल ब्रेसवेलने २५ चेंडूंत ६५ धावा करत उत्कृष्ट साथ दिली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी अवघ्या ४१ चेंडूंत ११५ धावांची भागीदारी केली. भारताविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.

२६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. जेकब डफीने पहिल्याच षटकात संजू सॅमसन (४) आणि इशान किशन (०) यांना बाद करत भारताला मोठा धक्का दिला. या सुरुवातीच्या धक्क्यातून भारतीय संघाला अखेरपर्यंत सावरता आले नाही. भारताला निर्धारित २० षटकांत नऊ बाद १७२ धावांपर्यंतच मजल मारता आली.

कर्णधार श्रेयस अय्यर आणि अभिषेक शर्मा यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, अभिषेक १५ चेंडूंत २७ धावा करून मॅथ्यू फिशरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर (११ चेंडूंत २२ धावा) याला अ‍ॅडम मिल्नेने त्रिफळाचीत केले. कर्णधार मिचेल सँटनरनेही दोन विकेट घेत भारतीय फलंदाजांवर अंकुश ठेवला. डफीने २३ धावांत चार विकेट घेत भारताच्या पराभवात निर्णायक भूमिका बजावली.

तत्पूर्वी, न्यूझीलंडच्या डावात फिलिप्स आणि ब्रेसवेल यांनी भारतीय गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. फिलिप्सने फिन अ‍ॅलनसोबत तिसऱ्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली. त्यानंतर ब्रेसवेलच्या साथीने त्याने भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवला.

फिलिप्सने नितीश रेड्डीच्या १६व्या षटकात चार षटकार आणि एक चौकार ठोकत तब्बल ३२ धावा वसूल केल्या. त्याने अवघ्या ३१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. दुसरीकडे, ब्रेसवेलने अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर एका षटकात चार चौकार-षटकारांची आतषबाजी केली. त्याने केवळ १८ चेंडूंत अर्धशतक झळकावले.

फिलिप्सने ४६ चेंडूंत आपले तिसरे टी-२० आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. विशेष म्हणजे त्याचे दुसरे अर्धशतक केवळ १५ चेंडूंत पूर्ण झाले. भारताकडून मयांक यादवने प्रभावी गोलंदाजी केली. अर्शदीप सिंगने या सामन्यात टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५० विकेट पूर्ण करणारा पहिला भारतीय गोलंदाज होण्याचा मान मिळवला.

कृष्णा एकदिवसीय मालिकेला मुकणार

न्यूझीलंडविरुद्ध ४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याला दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडावे लागले आहे. दरम्यान, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याचा न्यूझीलंड ‘अ’ विरुद्ध शनिवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या चार दिवसीय सामन्यासाठी भारत ‘अ’ संघात समावेश करण्यात आला आहे.

प्रसिद्ध कृष्णाला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मायदेशातील वनडे मालिकेदरम्यान हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली होती; मात्र त्याचा समावेश तंदुरुस्तीच्या चाचणीत उत्तीर्ण होण्याच्या अटीवर करण्यात आला होता. तो आगामी मालिकेपर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकणार नसल्याचे वृत्त पीटीआयने बुधवारीच दिले होते.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)