

नागपूर : नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर बुधवारी भारतीय फलंदाजांनी धावांचा अभिषेक केला. डावखुरा सलामीवीर अभिषेक शर्माने (३५ चेंडूंत ८४ धावा) केलेल्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर भारताने पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडला ४८ धावांनी धूळ चारली. याबरोबरच भारताने पाच लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून दुसरा सामना शुक्रवारी खेळवण्यात येईल.
भारताने प्रथम फलंदाजी करताना २३८ धावांचा डोंगर उभारल्यावर न्यूझीलंडचा संघ धावांचा पाठलाग करताना २० षटकांत ७ बाद १९० धावांपर्यंतच मजल मारू शकला. ग्लेन फिलिप्सने ४० चेंडूंत ७८ धावांची घणाघाती खेळी साकारली. तसेच मार्क चॅपमन (३९), डॅरेल मिचेल (२८) यांनीही कडवी झुंज दिली. मात्र फिरकीपटू वरुण चक्रवर्ती व शिवम दुबे यांनी प्रत्येकी २, तर हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १ बळी मिळवून किवी संघाला रोखले. अभिषेकला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
मायदेशात रंगणारी आयसीसी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आता अवघ्या तीन आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध बुधवारपासून सुरू झालेली टी-२० मालिका ही भारतासाठी एकप्रकारे विश्वचषकाची पूर्वपरीक्षा असणार आहे. न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आला असून उभय संघांत नुकताच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडली. यामध्ये न्यूझीलंडने २-१ अशी बाजी मारली. मात्र आता लक्ष पूर्णपणे टी-२० सामन्यांकडे वळले आहे. भारतीय संघ अनुक्रमे २१, २३, २५, २८ व ३१ जानेवारी या दिवशी न्यूझीलंडशी अनुक्रमे पाच सामने खेळणार आहे. मग ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषकाचे आयोजन केले जाणार आहे. २०२४मध्ये भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वात विश्वचषक उंचावला होता. त्यामुळे भारतापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल.
मुख्य म्हणजे गेल्याच महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेपूर्वी शुभमन गिल भारताचा उपकर्णधार होता. त्या मालिकेत भारताने ३-१ असे यश संपादन केले. मात्र आता गिल भारतीय संघाचा भाग नाही. तसेच विश्वचषकासाठी भारताने १५ खेळाडूंची निवड केलेली असून तिलक वर्मा या मालिकेतील किमान तीन सामन्यांना मुकणार आहे, तर वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेत खेळू शकणार नाही. त्यांच्या जागी रवी बिश्नोई व श्रेयस अय्यर यांना संघात स्थान देण्यात आले आहे.
दरम्यान, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने गतवर्षी आशिया चषकाचे जेतेपद मिळवले. मग भारताने ऑस्ट्रेलियालाही त्यांच्याच देशात धूळ चारली. आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका जिंकून भारताने विश्वचषकाच्या तयारीच्या दिशेने योग्य वाटचाल केली. भारताने २०२४च्या टी-२० विश्वचषकापासून एकही टी-२० मालिका गमावलेली नाही. म्हणजेच गेल्या ३४ सामन्यांत भारताने २९ टी-२० लढती जिंकलेल्या आहेत. ३५ वर्षीय सूर्यकुमारला गेल्या वर्षभरात एकही टी-२० अर्धशतक झळकावता आलेले नाही. तसेच १५हून अधिक डावांत तो एकेरी धावसंख्येत बाद झाला आहे. अनुभवी खेळाडू म्हणून सूर्यकुमारने चौथ्या स्थानी खेळताना आता लय मिळवणे गरजेचे आहे.
बुधवारी न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. संजू सॅमसन (१०) व इशान किशन (८) स्वस्तात बाद झाले. मात्र अभिषेक व सूर्यकुमार यांची जोडी जमली. अभिषेकने ५ चौकार व ८ षटकारांसह टी-२० कारकीर्दीतील सातवे अर्धशतक साकारले. तर सूर्यकुमारनेही लय गवसल्याचे संकेत देताना २२ चेंडूंत ३२ धावा फटकावल्या. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी रचली.
सूर्यकुमार बाद झाल्यावर हार्दिक पंड्या (१६ चेंडूंत २५) व रिंकू सिंग (२० चेंडूंत नाबाद ४४) यांनीही उपयुक्त फटकेबाजी केली. अभिषेकला शतक साकारण्याची संधी होती. मात्र तो इश सोधीच्या गोलंदाजीवर ८४ धावा काढून बाद झाला. दुबे व अक्षर लवकर बाद झाल्यावर मग रिंकूने संघाला २० षटकांत ७ बाद २३८ धावांचा डोंगर उभारून दिला.
लक्ष्याचा पाठलाग करताना अर्शदीपने डेवॉन कॉन्वेला शून्यावर बाद केले, तर हार्दिकने रचीन रवींद्रचा (१) अडसर दूर केला. फिलिप्स व टिम रॉबिन्सन यांनी प्रतिकार केला. मात्र अक्षरने फिलिप्सचा बळी मिळवला व भारताच्या विजयावर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले. आता दुसऱ्या सामन्यातही भारताकडून चमकदार कामगिरी अपेक्षित आहे.
संक्षिप्त धावफलक
भारत : २० षटकांत ७ बाद २३८ (अभिषेक शर्मा ८४, रिंकू सिंग नाबाद ४४; जेकब डफी २/२७) विजयी
न्यूझीलंड : २० षटकांत ७ बाद १९० (ग्लेन फिलिप्स ७८, मार्क चॅपमन ३९; वरुण चक्रवर्ती २/३७)
सामनावीर : अभिषेक शर्मा