IND vs NZ : सॅमसनच्या कामगिरीची चिंता! विशाखापट्टणम येथे भारतीय संघाचा आज न्यूझीलंडशी चौथा टी-२० सामना

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे बुधवारी रंगणाऱ्या चौथ्या टी-२० लढतीत विजयी चौकार लगावण्याची भारताला संधी आहे. मात्र सलामीवीर संजू सॅमसनच्या कामगिरीची भारताला चिंता सतावत आहे.
सॅमसनच्या कामगिरीची चिंता! विशाखापट्टणम येथे भारतीय संघाचा आज न्यूझीलंडशी चौथा टी-२० सामना
सॅमसनच्या कामगिरीची चिंता! विशाखापट्टणम येथे भारतीय संघाचा आज न्यूझीलंडशी चौथा टी-२० सामनाPhoto : PTI
Published on

विशाखापट्टणम : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे बुधवारी रंगणाऱ्या चौथ्या टी-२० लढतीत विजयी चौकार लगावण्याची भारताला संधी आहे. मात्र सलामीवीर संजू सॅमसनच्या कामगिरीची भारताला चिंता सतावत आहे. त्यामुळे विशाखापट्टणम येथे त्याला सूर गवसणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

मायदेशात रंगणारी आयसीसी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आता ‌अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेली टी-२० मालिका ही भारतासाठी एकप्रकारे विश्वचषकाची पूर्वपरीक्षा असणार आहे. न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आला असून उभय संघांत नुकताच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडली. यामध्ये न्यूझीलंडने २-१ अशी बाजी मारली. आता लक्ष पूर्णपणे टी-२० सामन्यांकडे वळले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच लढतींनंतर ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषकाचे आयोजन केले जाणार आहे. २०२४मध्ये भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वात विश्वचषक उंचावला होता. त्यामुळे भारतापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल.

भारताने अनुक्रमे नागपूर, रायपूर, गुवाहाटी येथे झालेल्या लढतींमध्ये किवी संघावर एकतर्फी वर्चस्व गाजवले. पहिल्या सामन्यात २३८ धावांचा डोंगर उभारून भारताने ४८ धावांनी विजय मिळवला. मग दुसऱ्या लढतीत २०९ धावांचे लक्ष्य १५.२ षटकांत गाठले. तर तिसऱ्या सामन्यात भारताने किवी गोलंदाजांचा धुव्वा उडवताना १० षटकांतच १५४ धावांचे लक्ष्य सर करून मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमरा यांसारख्या भारताच्या जवळपास सर्व खेळाडूंनी छाप पाडली आता उर्वरित दोन लढतींमध्ये भारताकडे खेळाडूंना विश्रांती देण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

मात्र ३१ वर्षीय सलामीवीर सॅमसनला लय मिळवणे गरजेचे आहे. सॅमसनने या मालिकेत आतापर्यंत अनुक्रमे १०, ६, ० अशा एकूण १६ धावा केल्या आहेत. त्याच तुलनेत पर्यायी यष्टिरक्षक व सध्या तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या किशनने ८, ७६, २८ धावा फटकावल्या आहेत. तिलक वर्मा सध्या शस्त्रक्रियेतून सावरत असल्याने या मालिकेचा भाग नाही. मात्र विश्वचषकात तो परतल्यावर तिसऱ्या क्रमांकावर खेळेल, हे पक्के आहे. अशा स्थितीत सॅमसन किंवा किशनपैकी एकालाच संधी दिली जाईल. विश्वचषकात किशन सॅमसनच्या जागी सलामीला यावा, असे अनेकांचे मत आहे.

मुख्य म्हणजे गेल्याच महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेपूर्वी शुभमन गिल भारताचा उपकर्णधार होता. त्या मालिकेत भारताने ३-१ असे यश संपादन केले. मात्र आता गिल भारतीय संघाचा भाग नाही. त्यामुळे सॅमसनला छाप पाडण्यासह लय मिळवण्याची उत्तम संधी होती. मात्र तूर्तास तो संघर्ष करताना दिसत आहे. विश्वचषकासाठी भारताने १५ खेळाडूंची निवड केलेली असून १ फेब्रुवारीपर्यंत त्यामध्ये बदल करण्याची मुभा आहे.

सूर्यकुमारच्या नेतृत्वात भारताने गतवर्षी आशिया चषकाचे जेतेपद मिळवले. मग भारताने ऑस्ट्रेलियालाही त्यांच्याच देशात धूळ चारली. भारताने २०२४च्या टी-२० विश्वचषकापासून एकही टी-२० मालिका गमावलेली नाही. म्हणजेच गेल्या ३७ सामन्यांत भारताने ३२ टी-२० लढती जिंकलेल्या आहेत.

दुसरीकडे मिचेल सँटनरच्या नेतृत्वात खेळणारा न्यूझीलंडचा संघ संघर्ष करत आहे. लॉकी फर्ग्युसन व जीमी नीशाम या लढतीसाठी संघात परतण्याची शक्यता आहे. ग्लेन फिलिप्स, जेकब डफी, कायले जेमिसन व डॅरेल मिचेल यांच्यावर किवी संघाची भिस्त आहे.

अभिषेक, सूर्यकुमार भन्नाट फॉर्मात

भारतीय संघाला अभिषेकच्या रुपात धडाकेबाज सलामीवीर गवसला आहे. अभिषेकने तीन सामन्यांत अनुक्रमे ८४, ० व नाबाद ६८ धावा केल्या आहेत. गेल्या लढतीत त्याने १४ चेंडूंतच अर्धशतक साकारले. त्यामुळे अभिषेकने पॉवरप्लेमध्ये ठाण मांडले, तर भारताचे अर्धे काम सोपे होते. त्याशिवाय गेल्या वर्षभरात एकही अर्धशतक झळकावू न शकलेल्या कर्णधार सूर्यकुमारने आता सलग दोन लढतींमध्ये अर्धशतक साकारून सर्वांनाच इशारा दिला. किशनही उत्तम लयीत आहे. भारताला हार्दिक पंड्या, शिवम दुबे यांच्या फलंदाजीची फारशी गरज भासलेली नाही.

बुमरा, अर्शदीपला विश्रांती देणार?

तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा या मालिकेसाठी संघाचा भाग असल्याने गोलंदाजी विभाग आपोआप बळकट झाला आहे. गेल्या सामन्यात बुमराने ३ बळी मिळवतानाच सामनावीर पुरस्कारही पटकावला. आता मालिका भारताने जिंकलेली असल्याने बुमराला पुन्हा विश्रांती दिली जाऊ शकते. तसेच अर्शदीप सिंगच्या जागी वरुण चक्रवर्तीचे पुनरागमन होऊ शकते. कुलदीप यादव किंवा रवी बिश्नोई यांच्यापैकी एकालाच संधी मिळू शकेल. गोलंदाजीत भारताकडे सहा ते सात पर्याय उपलब्ध आहेत. अक्षर पटेलच्या तंदुरुस्तीबाबत मात्र संभ्रम कायम आहे.

उभय संघांत आतापर्यंत २६ टी-२० सामने झाले असून भारताने त्यापैकी १७, तर न्यूझीलंडने १० लढती जिंकल्या आहेत. त्यांच्यातील एक लढत टाय झाली होती.

हे महत्त्वाचे

विशाखापट्टणम येथे आतापर्यंत चार टी-२० सामने झाले असून तीन वेळा धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे. २०२३मध्ये येथे अखेरची टी-२० लढत झाली होती.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, रिंकू सिंग, जसप्रीत बुमरा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई.

न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), मिचेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेवॉन कॉन्वे, जेकब डफी, झॅक फोल्क्स, मॅट हेन्री, कायले जेमिसन, बेवॉन जेकब्स, डॅरेल मिचेल, जेम्स नीशाम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, टिम रॉबिन्सन, इश सोधी, क्रिस्टन क्लार्क.

logo
marathi.freepressjournal.in