रविवारी अर्थात आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या साखळी लढतीतील अखेरचा पण उपांत्यफेरीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा सामना होणार आहे. दोन्ही संघ उपांत्य फेरीत आधीच दाखल झाले असून आजच्या सामन्यातील विजेता संघ अ गटात अव्वल स्थानी राहणार आहे. दुसरीकडे ब गटाचे चित्र आधीच स्पष्ट झालेले आहे. या गटातून दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानी तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. आजच्या सामन्यातील निकालानंतर भारताची उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया की दक्षिण आफ्रिकाविरुद्ध लढत होणार याचे उत्तर मिळणार आहे.
बघा कसे असेल उपांत्य फेरीचे समीकरण?
ग्रुप A मध्ये भारत आणि न्यूझीलंड दोन्ही अजूनपर्यंत एकही सामना पराभूत झालेले नाहीत. त्यामुळे त्यांचे प्रत्येकी चार गुण झाले आहेत. रविवारी जो संघ जिंकेल तो अव्वल स्थानावर येईल, तर पराभूत संघ दुसऱ्या स्थानावर असेल. यजमान पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोन संघ आधीच या गटातून बाद झाले आहेत.
जर सामना अनिर्णित राहिला, तर धावगतीच्या बळावर न्यूझीलंड क्रमवारीत पहिल्या स्थानी राहील आणि भारत दुसऱ्या स्थानी असेल.
भारत-न्यूझीलंड सामन्याच्या संभाव्य निकालांनुसार उपांत्य फेरीची मांडणी अशी असू शकते:
जर भारत आजच्या सामन्यात जिंकून ग्रुप A मध्ये अव्वल स्थानी आला तर:
भारत वि. ऑस्ट्रेलिया – ४ मार्च, दुबई
न्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिका – ५ मार्च, लाहोर
जर न्यूझीलंड आजच्या सामन्यात जिंकून ग्रुप A मध्ये अव्वल स्थानी आला किंवा सामना अनिर्णीत राहिला तर:
भारत वि. दक्षिण आफ्रिका – ४ मार्च, दुबई
न्यूझीलंड वि. ऑस्ट्रेलिया – ५ मार्च, लाहोर