

अहमदाबाद : रविवारी रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भारत चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला असून यावेळी घरच्या मैदानावरच विश्वविजयाची हॅटट्रिक (२००७, २०२४) साधण्याची संधी टीम इंडियाला मिळाली आहे. या सामन्यात भारतीय संघ विजयासाठी फेव्हरिट मानला जात असला तरी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील भारताची कामगिरी आणि टी-२० वर्ल्डकपमधील न्यूझीलंडविरुद्धची कामगिरी, यावरून भारताची हॅटट्रिकची संधी हुकते की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. १९ नोव्हेंबर २०२३ रोजी पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत रोहित शर्माच्या टीम इंडियाचे मनसुबे उधळून लावत नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थित ९३ हजार चाहत्यांच्या माना निराशेने झुकवल्या होत्या. मात्र रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने याची परतफेड करत विंडीज बेटांवर टी-२० विश्वचषकाचे जेतेपद उंचावले होते. आता दोन वर्षांनी पन्हा एकदा गतविजेत्या भारतीय संघाला पुन्हा एकदा मुंबईकर खेळाडूच्या नेतृत्वाखाली टी-२० वर्ल्डकपवर नाव कोरण्याची नामी संधी चालून आली आहे.
आतापर्यंत एकाही संघाला सलग दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकप जिंकता आलेला नाही, ही संधी सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियाला मिळाली आहे. न्यूझीलंडने दुसऱ्यांदा (२०२१ आणि आता) टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत मजल मारली आहे. याआधी त्यांना ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली आहे. त्यामुळे पहिल्यावहिल्या टी-२० विश्वचषकावर मोहोर उमटवण्यासाठी किवींचा संघही सज्ज झाला आहे. न्यूझीलंडने टीम इंडियाला मात दिल्यास, त्यांचे हे पहिलेवहिले विश्वविजेतेपद ठरेल, कारण त्यांना एकदिवसीय क्रिकेटमध्येही दोन वेळा अंतिम फेरी गाठूनही विश्वचषकाने हुलकावणी दिली आहे.
सूर्यकुमारच्या टीम इंडियाचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास फारसा धक्कादायक नाही. सुपर-८ फेरीतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धची हार सोडली तर आतापर्यंतचे सर्व सामने त्यांनी जिंकले आहेत. उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध २५३ धावा उभारूनही भारताला फक्त ७धावांनी विजय मिळवता आला, यावरून न्यूझीलंडला हरवण्यासाठी टीम इंडियाला विशेष कामगिरी करावी लागणार आहे. कारण न्यूझीलंडने तगड्या दक्षिण आफ्रिकेचे आव्हान नऊ विकेट्सनी सहज पार करत टी-२० वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठली आहे.
फलंदाजी आणि गोलंदाजीवर भारताची प्रमुख मदार असली तरी आघाडीच्या फलंदाजांमध्ये सातत्य बिलकुल दिसत नाही. टी-२० विश्वचषकाआधी जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून नावलौकिक मिळवणारा अभिषेक शर्मा सध्या सुपर फ्लॉप ठरला आहे. शून्यावर बाद होण्याची हॅटट्रिक लगावल्यानंतर त्याने झिम्बाब्वेसारख्या दुबळ्या संघाविरुद्ध केलेली अर्धशतकी खेळी, हीच त्याची या विश्वचषकातील चांगली कामगिरी म्हणावी लागेल. रिंकू सिंगची जागा घेतल्यानंतर सर्वांत जास्त प्रभावी ठरला तो म्हणजे संजू सॅमसन. पहिल्या तीन सामन्यांत संधी न मिळालेला संजू सॅमसन थेट 'सुपर- ८' फेरीत भारतीय संघाचा भाग बनला. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या 'करो या मरो' सामन्यात नाबाद ९७ धावा करत त्याने भारताला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून दिला. सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध ८९ धावांची खेळी करत संजू सॅमसनच भारताच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला.
गोलंदाजीतही भारतीय संघ फक्त जसप्रीत बुमरावरच अधिक अवलंबून आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही १८व्या षटकांत फक्त ६ धावा देत बुमराने भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. बुमरा सातत्यपूर्ण कामगिरी करत असताना, भारतीय संघ ज्या वरुण चक्रवर्तीवर सर्वाधिक अवलंबून होता, तोच भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात सपेशल अपयशी ठरला आहे. अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्या आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर वेळोवेळी योगदान देत आहेत.
न्यूझीलंडचा संघ कोण्या एकट्याच्या कामगिरीवर नव्हे तर सांघिक खेळाच्या बळावर अंतिम फेरीपर्यंत पोहोचला आहे. मिचेल सान्तनेरचे शांत आणि संयमी नेतृत्व, आक्रमक फलंदाजी, गोलंदाजीतील सुसूत्रता आणि अद्वितीय असे क्षेत्ररक्षण अशा आघाड्यांवर न्यूझीलंडने यश संपादन केले आहे. फिन अलेन आणि टिम सेईफर्ट यांची सलामीची कामगिरी न्यूझीलंडच्या यशात महत्त्वपूर्ण ठरली आहे. ग्लेन फिलिप्स, डॅरेल मिचेल आणि रचिन रवींद्र यांच्यामुळे किवींच्या मधल्या फळीला स्थैर्य लाभले आहे. तसेच लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री आणि जेकब डफी यांच्या वेगवान गोलंदाजीला फिरकीपटू सान्तनेरची साथ लाभत आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३० सामने झाले असून त्यात भारताने १८ सामन्यांत विजय मिळवला असून ११ लढती गमावल्या आहेत. एक सामना बरोबरीत सुटला आहे.
टी-२० विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंड संघ आतापर्यंत तीन वेळा एकमेकांशी भिडले असून तिन्ही सामन्यांत किवींनी टीम इंडियाला धूळ चारली आहे.
सर्वाधिक ५२६ धावा सूर्यकुमार यादवने टी-२० मध्ये भारताकडून न्यूझीलंडविरुद्ध काढल्या असून रोहित शर्माच्या नावावर ५११ धावा जमा आहेत. सूर्यकुमारने न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक नाबाद १११ धावांची सर्वोत्तम खेळी साकारली आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचे आतापर्यंत १० सामने झाले असून त्यापैकी ७ लढती भारताने जिंकल्या आहेत. भारताचे तीन पराभव हे इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे आहेत. यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताला ७६ धावांनी चिरडले आहे.
अहमदाबादच्या 'सरदार'ची भीती
न्यूझीलंडने उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या चिंधड्या उडवल्या असल्या तरी पाहुण्यांना सर्वाधिक भीती वाटते ती 'सरदार ऑफ अहमदाबाद' जसप्रीत बुमराची. बुमराची चार षटके इंग्लंडविरुद्ध निर्णायक ठरली होती. आता पुन्हा एकदा घरच्या मैदानावर 'बुम बुम बुमरा'ची जादू चालते का? ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आफ्रिकेविरुद्ध उपांत्य फेरीत ३३ चेंडूंत शतक झळकावणाऱ्या फिन अलेन वि. बुमरा असा हा सामना रंगणार आहे.
अभिषेक शर्माला डच्चू?
संपूर्ण स्पर्धेत सातत्याने अपयशी ठरणाऱ्या सलामीवीर अभिषेक शर्माला डच्चू मिळण्याची दाट शक्यता आहे. झिम्बाब्वेविरुद्धचा अपवाद वगळता, एकाही सामन्यात सूर न गवसल्यामुळे अभिषेकला फायनलमध्ये अंतिम संघात स्थान मिळण्याची शक्यता दिसत नाही. त्याला वगळल्यास, मधल्या फळीत रिकू सिंगला स्थान मिळण्याची शक्यता आहे.
वरुणच्या जागी कुलदीपचा समावेश?
'जादुई' फिरकीपटू वरुण चक्रवर्तीची जादू यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये दिसलीच नाही. पाटा खेळपट्ट्यांवर वरुणला चांगलाच चोप बसला आहे. वरुणची ऑफब्रेक गोलंदाजी खेळून काढण्याची क्षमता न्यूझीलंडच्या फलंदाजांमध्ये असल्यामुळे त्याच्या जागी कुलदीप यादव हा चांगला पर्याय ठरू शकतो, असे क्रिकेट जाणकारांचे मत आहे. आतापर्यंत या स्पर्धेत फक्त एकच सामना खेळलेल्या कुलदीप यादवला अंतिम लढतीत स्थान देण्याचा विचार भारतीय संघ व्यवस्थापन करत आहे.
खेळपट्टीत दडलंय काय?
अहमदाबादच्या काळ्या मातीच्या खेळपट्टीवर भारताची भंबेरी उडत आली आहे. काळ्या मातीच्या खेळपट्टीवर भारताला सुपर-८ फेरीत दक्षिण आफ्रिकेकडून अहमदाबादमध्ये हार पत्करावी लागली होती. त्यामुळे अंतिम फेरीसाठी मिश्र मातीची (काळी आणि लाल माती) खेळपट्टी तयार करण्यात आली असून या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना चांगला वेग आणि उसळी मिळणार आहे. त्यामुळे अंतिम फेरीच्या सामन्यात चांगली धावसंख्या जमवण्याची संधी फलंदाजांना मिळणार आहे. मात्र सुरुवातीच्या षटकांत वेगवान गोलंदाजांना यश मिळण्याची शक्यता आहे.
टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत वि. न्यूझीलंड
२००७ जोहान्सबर्ग : सुपर-८ फेरीत न्यूझीलंड संघाने भारताला १० धावांनी धूळ चारली होती. डॅनियल व्हेटोरीने निर्णायक खेळी करताना आपल्या अष्टपैलू कामगिरीची चमक दाखवली होती. न्यूझीलंडने २० षटकांत १९० धावा उभारल्यानंतर व्हेटोरीने २० धावांत ४ बळी मिळवत भारताला ९ बाद १८० धावांवर रोखले होते.
२०१६ नागपूर : साखळी फेरीत न्यूझीलंडने भारताचा ४७ धावांनी पाडाव केला होता. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडला २० षटकांत ७बाद फक्त १२६ धावा करता आल्या. मात्र मिचेल सान्तनेर (४ विकेट्स) आणि ईश सोधी (३ बळी) यांच्या फिरकी माऱ्यासमोर भारताचा डाव ७९ धावांवरच गडगडला होता.
२०२१ वर्ल्ड : सुपर-१२ फेरीत न्यूझीलंडने भारतावर आठ विकेट्स शिल्लक राखून विजय मिळवला होता. ट्रेंट बोल्ट (३ विकेट्स) आणि ईश सोधी (२ विकेट्स) यांनी भारताला ७ बाद ११० धावांवर रोखल्यानंतर न्यूझीलंडने हे आव्हान १४.३ षटकांत २ विकेट्सच्या मोबदल्यात पार केले होते.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), इशान किशन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, वरुण चक्रवर्ती, संजू सॅमसन, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग.
न्यूझीलंड : मिचेल सान्तनेर (कर्णधार), फिन अलेन, टिम सेईफर्ट, रचिन रवींद्र, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरेल मिचेल, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, कोल मॅककोंची, कायले जेमिसन, जेकब डफी, डेवॉन कॉनवे, जिमी नीशाम, ईश सोधी.
सामन्याची वेळ : सायं. ७ वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस नेटवर्क