फिरकीपटूंच्या मेहनतीवर फलंदाजांचे पाणी! न्यूझीलंडला २३५ धावांत गुंडाळल्यावर दिवसअखेर भारताची ४ बाद ८६ अशी स्थिती

IND vs NZ : २० हजार दर्दी क्रिकेटप्रेमींच्या साक्षीने मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या रणभूमीवर शुक्रवारपासून भारत-न्यूझीलंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना सुरू झाला.
फिरकीपटूंच्या मेहनतीवर फलंदाजांचे पाणी! न्यूझीलंडला २३५ धावांत गुंडाळल्यावर दिवसअखेर भारताची ४ बाद ८६ अशी स्थिती
Published on

ऋषिकेश बामणे/मुंबई : २० हजार दर्दी क्रिकेटप्रेमींच्या साक्षीने मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या रणभूमीवर शुक्रवारपासून भारत-न्यूझीलंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना सुरू झाला. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर भारतीय संघ संपूर्ण दिवसावर वर्चस्व गाजवेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र या कसोटीतही पहिल्या दोन लढतींप्रमाणेच भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांनी पाणी फेरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा (६५ धावांत ५ बळी) आणि ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदर (८१ धावांत ४ बळी) या फिरकी जोडीने कमाल करत किवी संघाचा पहिला डाव ६५.४ षटकांत २३५ धावांत गुंडाळला. त्यानंतर फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे पहिल्या दिवसअखेर भारताची १९ षटकांत ४ बाद ८६ अशी स्थिती आहे. कर्णधार रोहित शर्मा (१८ धावा), मुंबईकर यशस्वी जैस्वाल (३०) आणि विराट कोहली (४) असे आघाडीचे फलंदाज माघारी परतले आहेत. शुभमन गिल (नाबाद ३१), तर ऋषभ पंत (नाबाद १) यांची जोडी मैदानावर असून पहिल्या डावात भारतीय संघ अद्याप १४९ धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे शनिवारी भारतीय संघ आघाडी घेण्यात यशस्वी ठरणार की न्यूझीलंड त्यांना झटपट गुंडाळून निर्भेळ यश मिळवण्याच्या दिशेने कूच करणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. न्यूझीलंडने या लढतीसाठी मिचेल सँटनर व टीम साऊदी यांच्या जागी अनुक्रमे ईश सोधी व मॅट हेन्री यांना संधी दिली. तर भारताने आजारी जसप्रीत बुमराच्या जागी मोहम्मद सिराजचा संघात समावेश केला.

न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. वेगवान गोलंदाज आकाश दीपने चौथ्याच षटकात धोकादायक डेवॉन कॉन्वेला ४ धावांवर पायचीत पकडले. त्यानंतर कर्णधार टॉम लॅथम आणि विल यंग यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४४ धावांची भर घातली. अखेर सुंदरने लॅथमचा २८ धावांवर व त्यानंतर ३ षटकांच्या अंतरात रचिन रवींद्रचा ५ धावांवर त्रिफळा उडवला व न्यूझीलंडची ३ बाद ७२ अशी स्थिती केली. उपाहारापर्यंत मग यंग व डॅरेल मिचेल यांनी आणखी पडझड होऊ न देता संघाला २७ षटकांत ९२ धावांपर्यंत नेले.

दुसऱ्या सत्रात यंग व मिचेल यांनी आणखी संयमी फलंदाजी करताना जवळपास तासभर भारताला यश मिळू दिले नाही. ३१ वर्षीय यंगने मालिकेतील पहिले, तर कारकीर्दीतील आठवे कसोटी अर्धशतक साकारले. दुसऱ्या बाजूने मिचेलने १२वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी रचल्यावर अखेर जडेजाने ४५व्या षटकात यंगला स्लीपमध्ये रोहितकडे झेल देण्यास भाग पाडले. यंगने १३८ चेंडूंत ७१ धावा केल्या. त्याच षटकातील पाचव्या चेंडूवर जडेजाने टॉम ब्लंडेलचा शून्यावर त्रिफळा उडवला. ग्लेन फिलिप्स व मिचेल यांनी काहीसा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र जडेजानेच फिलिप्सला (१७) त्रिफळाचीत करून चहापानाला किवी संघाची अवस्था ५५ षटकांत ६ बाद १९२ अशी केली.

तिसऱ्या सत्रातही ३५ वर्षीय जडेजाची जादू कायम राहिली. मिचेल एका बाजूने तळ ठोकून होता. मात्र जडेजाने ईश सोधी (७) व मॅट हेन्री (०) यांना एकाच षटकात बाद करून कारकीर्दीत १४ व्यांदा डावात पाच बळी घेण्याची किमया साधली. दुसऱ्या बाजूने सुंदरने मिचेलची खेळी ८२ धावांवर संपुष्टात आणली. मग सुंदरनेच एजाझ पटेलला पायचीत पकडून २३५ धावांवर किवी संघाच्या डावाला पूर्णविराम लावला. भारतासाठी जडेजाने ५, सुंदरने ४, तर आकाशने १ बळी मिळवला.

पहिल्या दिवशीच भारताची फलंदाजी आल्याने अनेक चाहत्यांनी तिसऱ्या सत्रात स्टेडियम गाठले. रोहित व यशस्वी यांच्या जोडीने २५ धावांची संयमी सुरुवातही केली. मात्र हेन्रीच्या उसळी घेणाऱ्या चेंडूवर रोहित फसला व १८ धावांवर माघारी परतला. त्यानंतर यशस्वी व गिल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५३ धावांची दमदार भागीदारी रचली. गिलने पुढे सरसावून षटकार लगावत चाहत्यांची मनेही जिंकली. दिवसातील अखेरची १० मिनिटे व ३ षटके शिल्लक असताना हीच जोडी नाबाद राहील, असे वाटत होते. मात्र एजाझला रिव्हर्स स्वीपचा फटका खेळताना यशस्वीचा ३० धावांवर त्रिफळा उडाला.

त्यानंतर चौथ्या क्रमांकावर साधारणपणे विराट फलंदाजीस येणे अपेक्षित होते. मात्र नाइट-वॉचमन म्हणून सिराजला पाठवण्यात आले. एजाझने पहिल्याच चेंडूवर सिराजला पायचीत पकडले. त्यानंतर विराटचे टाळ्यांच्या कडकडाटात आगमन झाले. विराटने पाचव्या चेंडूवर शानदार चौकार लगावून स्वतःचे खाते उघडले. मात्र पुढच्याच चेंडूवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात विराट धावचीत झाला. हेन्रीने मिड- ऑनच्या दिशेने स्टम्पवर थेट वेध साधला व स्टेडियममध्ये शांतता पसरली. त्यामुळे १ बाद ७८ वरून भारताची ४ बाद ८४ अशी घसरण उडाली. आता दिवसअखेर गिल ३१, तर पंत १ धावेवर नाबाद आहे.

कडक उन्हात खेळाडू आणि चाहत्यांची होरपळ

मुंबईतील तापमानाचा पारा शुक्रवारी ३६ अंशापर्यंत वाढला. याची झळ वानखेडे स्टेडियमवरील चाहत्यांनाही सोसावी लागली. अनेक स्टँडमध्ये जेथे ऊन येत आहे, तेथे चाहते डोक्यावर रुमाल बांधून सामना पाहताना दिसले. तसेच स्टँडच्या बाहेर मोफत पिण्याचे पाणी देत असल्याने तेथे लांबच्या लांब रांगा लागल्याचे दिसून आले. इतकेच नव्हे मैदानात खेळणारे खेळाडूही ३-४ षटकांच्या अंतरानंतर सातत्याने पाणी पीत होते अथवा स्वतःच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडून तंदुरुस्ती टिकवत होते. किवी संघाचे फलंदाज मिचेल व यंग यांचीही या उन्हात कसोटी लागली.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड (पहिला डाव): ६५.४ षटकांत सर्व बाद २३५ (डॅरेल मिचेल ८२, विल यंग ७१, रवींद्र जडेजा ५/६५, वॉशिंग्टन सुंदर ४/८१)

भारत (पहिला डाव): १९ षटकांत ४ बाद ८६ (शुभमन गिल नाबाद ३१, यशस्वी जैस्वाल ३०, रोहित शर्मा १८; एजाझ पटेल २/३३)

logo
marathi.freepressjournal.in