बडोदा : टी-२० वर्ल्डकप अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपला असतानाच, भारताची आता न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत परीक्षा असेल. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे फक्त वनडेत खेळत असून सध्या ते तुफान फॉर्मात आहेत. त्यामुळेच रविवारी न्यूझीलंडविरुद्ध बडोदा येथे सुरू होणाऱ्या वनडे मालिकेत या दोन दिग्गज फलंदाजांवर सर्वांच्या नजरा असतील.
पुढील सात दिवसांत तीन वनडे सामने रंगणार आहेत आणि त्यानंतर पाच दिवसांत तीन टी-२० लढती होतील. दुखापती आणि खराब फॉर्ममुळे भारताचा कर्णधार शुभमन गिलला टी-२० वर्ल्डकप संघातून डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुखापतीमुळे त्याला गेल्या वर्षअखेरीस झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेला मुकावे लागले होते. आता गिलचे संघात पुनरागमन झाल्यास, सलामीवीर यशस्वी जैस्वालला संधी मिळणे अवघड आहे. यशस्वीने आफ्रिकेविरुद्धच्या गेल्या सामन्यात आपले पहिलेवहिले वनडे शतक झळकावले होते. श्रेयस अय्यरही संघात परतल्यामुळे आता फलंदाजीतील प्रयोग थांबवावे लागणार आहेत. श्रेयस चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणार आहे. त्यामुळे लोकेश राहुलला तळाच्या क्रमांकावर फलंदाजीला यावे लागेल. राहुलला संधी मिळाल्यास, ऋषभ पंतला बेंचवर बसावे लागेल. अय्यर, पंत आणि मोहम्मद सिराज हे आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेचा भाग नव्हते. रवींद्र जडेजाने शनिवारी नेटमध्ये कसून सराव केला, त्यामुळे पहिल्या वनडेत त्याचे संघातील स्थान पक्के मानले जात आहे.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि हार्दिक पंड्या यांना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि प्रसिध कृष्णा यांच्यावर असेल. कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि
जडेजा यांच्यावर फिरकी गोलंदाजीची जबाबदारी असेल. बडोदा क्रिकेट असोसिएशनच्या खेळपट्टीवर रात्री दव पडण्याची शक्यता असल्यामुळे आक्रमक वेगवान गोलंदाजांची चलती असणार आहे. कोटम्बी येथील नव्याने बांधलेल्या बडोदा क्रिकेट असेसिएशनवर पहिल्यांदाच पुरुषांचा आंतरराष्ट्रीय सामना रंगणार आहे.
गेल्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारताकडून पत्करलेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी न्यूझीलंड संघ उत्सुक आहे. त्याचबरोबर नव्या दमाच्या खेळाडूंना वापरून पाहण्याची नामी संधी किवींसमोर असेल. २०२४-२५मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंडने भारताचा कसोटी मालिकेत ३-० असा धुव्वा उडवला होता. त्यावेळी 'भारतीय गोलंदाजांवर प्रथम प्रहार करा, नंतर शांततेने खेळा,' हा मंत्र न्यूझीलंडच्या खेळाडूंनी वापरला होता. आता त्याचपद्धतीने रणनीती पाहुण्या किवी संघाकडून आखण्यात आली आहे.
मिचेल सान्तनेर मांडीचे स्नायू दुखावले गेल्यामुळे वनडे मालिकेला मुकला आहे. त्याचबरोबर पुत्ररत्न झाल्यामुळे टॉम लॅथम मायदेशी परतला आहे. माजी कर्णधार केन विल्यम्सन टी-२० मालिकेनिमित्त दक्षिण आफ्रिकेत खेळत असल्यामुळे या मालिकेत खेळू शकणार नाही. त्याचबरोबर अष्टपैलू रचिन रवींद्र आणि वेगवान गोलंदाज जेकब डफी यांना विश्रींती देण्यात आली आहे. दुखापतीमुळे मॅट हेन्री हासुद्धा मायदेशी परतला आहे. सान्तनेरच्या अनुपस्थितीत मायकेल ब्रेसवेल याच्याकडे न्यूझीलंडचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. अष्टपैलू कायले जेमिसन आणि २३ वर्षीय लेगस्पिनर आदित्य अशोक यांच्याकडून न्यूझीलंडला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. जेडन लेनॉक्स याला सान्तनेरच्या जागी न्यूझीलंड संघात संधी देण्यात आली आहे. डेवॉन कॉनवे, डॅरिल मिचेल, हेन्री निकोल्स, विल यंग आणि ग्लेन फिलिप्स या अनुभवी खेळाडूंवर न्यूझीलंडची मुख्य भिस्त असेल.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, नितीशकुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि हर्षित राणा.
न्यूझीलंड : मिचेल ब्रेसवेल (कर्णधार), डेवॉन कॉनवे, मिचेल हाय, निक केली, हेन्री निकोल्स, विल यंद, जोश क्लार्कसन, झाक फोल्क्स, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, आदित्य अशोक, ख्रिस्तियन क्लार्क, कायले जेमिसन, जेडन लेनॉक्स, मिचेल राय.