नवी दिल्ली: भारताचा फलंदाज श्रेयस अय्यर आणि अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांनी न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात रंगणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात पुनरागमन केले आहे. फिटनेस प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच श्रेयसचा भारतीय संघात समावेश केला जाणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत सिराजकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानंतर यावेळी मात्र निवड समितीने त्याच्या गुणवत्तेची, फिटनेसची दखल घेतली. त्याचा सहकारी जसप्रीत बुमरा याला मात्र या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. पुढील महिन्यात रंगणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेवर लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी बुमराला या संघात स्थान देण्यात आलेले नाही. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी श्रेयस अय्यरला दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल करावे लागले होते. मात्र श्रेयसने दणदणीत कमबॅक करत संघाचे उपकर्णधारपदही प्राप्त केले आहे. मात्र संघातील त्याचे स्थान निश्चित होण्यासाठी श्रेयसला ६ जानेवारीला विजय हजारे करंडक स्पर्धेत आपली तंदुरुस्ती सिद्ध करावी लागणार आहे. हार्दिक पंड्याने एका सामन्यात १० षटके टाकण्याचा फिटनेस अद्याप सिद्ध न केल्यामुळे टीम इंडियाच्या सेंटर ऑफ एक्सलन्सने त्याला फिटनेस प्रमाणपत्र दिले नाही. त्यामुळेच त्याचा न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात समावेश होऊ शकला नाही.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेला ११ जानेवारीपासून बडोदा येथे सुरुवात होत आहे. अन्य दोन सामने राजकोट आणि इंदूर येथे अनुक्रमे १४ आणि १८ जानेवारी रोजी खेळवण्यात येतील.
"श्रेयसची उपलब्धता ही त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल. हार्दिक पंड्याला फिटनेस प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे त्याला संघात घेण्यात आले नाही. तसेच फेब्रुवारी महिन्यात रंगणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी त्याच्यावर अतिरिक्त भार टाकणे उचित ठरले नसते," मालिकेत असे बीसीसीआयच्या पत्रकात म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दणदणीत शतक झळकावले असले तरी ऋतुराज गायकवाडला निवड समितीचे मन वळवता आले नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेला कर्णधार शुभमन गिल मुकला होता, मात्र आता त्याचे पुनरागमन झाले आहे. खराब फॉर्ममध्ये असला तरी ऋषभ पंतन दुसरा यष्टीरक्षक म्हणून संघात स्थान मिळवले आहे. तिलक वर्मा आणि ध्रुव जुरेल हे गेल्या मालिकेचा भाग होते, मात्र आता सिनियर खेळाडूंच्या पुनरागमनामुळे त्यांना संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी मोहम्मद सिराज, हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांच्यावर असेल. अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी हा चौथा पर्याय असेल. सुपरस्टार रोहित शर्मा आणि विराट कोहली हे फक्त वनडेपुरते मर्यादित असून त्यांचे संघातील स्थान अबाधित ठेवण्यात आले आहे.