IND vs NZ : रायपूरमध्ये राज्य कोणाचे? भारताचा आज न्यूझीलंडशी दुसरा टी-२० सामना; दव ठरणार निर्णायक

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बेधडक वृत्तीच्या भारतीय टी-२० संघाला न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत २-० अशी आघाडी घेण्याची संधी आहे. रायपूर येथील शहीद वीर नारायणसिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर शुक्रवारी उभय संघांतील दुसरा सामना खेळवण्यात येईल. त्यामुळे रायपूरमध्ये कोणाचे वर्चस्व पाहायला मिळणार, याकडे चाहत्यांचे लक्ष आहे.
IND vs NZ : रायपूरमध्ये राज्य कोणाचे? भारताचा आज न्यूझीलंडशी दुसरा टी-२० सामना; दव ठरणार निर्णायक
IND vs NZ : रायपूरमध्ये राज्य कोणाचे? भारताचा आज न्यूझीलंडशी दुसरा टी-२० सामना; दव ठरणार निर्णायकPhoto : X
Published on

रायपूर : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बेधडक वृत्तीच्या भारतीय टी-२० संघाला न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत २-० अशी आघाडी घेण्याची संधी आहे. रायपूर येथील शहीद वीर नारायणसिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर शुक्रवारी उभय संघांतील दुसरा सामना खेळवण्यात येईल. त्यामुळे रायपूरमध्ये कोणाचे वर्चस्व पाहायला मिळणार, याकडे चाहत्यांचे लक्ष आहे.

बुधवारी नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर झालेल्या पहिल्या लढतीत भारतीय फलंदाजांनी धावांचा अभिषेक केला. डावखुरा सलामीवीर अभिषेक शर्माने (३५ चेंडूंत ८४ धावा) केलेल्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला ४८ धावांनी धूळ चारली. याबरोबरच भारताने पाच लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताने प्रथम फलंदाजी करताना २३८ धावांचा डोंगर उभारल्यावर न्यूझीलंडचा संघ धावांचा पाठलाग करताना २० षटकांत ७ बाद १९० धावांपर्यंतच मजल मारू शकला. आता दुसऱ्या लढतीतही धावांचा वर्षाव अपेक्षित असून येथे दवाचा घटकही निर्णायक भूमिका बजावेल.

मायदेशात रंगणारी आयसीसी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आता ‌अवघ्या तीन आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेली टी-२० मालिका ही भारतासाठी एकप्रकारे विश्वचषकाची पूर्वपरीक्षा असणार आहे. न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आला असून उभय संघांत नुकताच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडली. यामध्ये न्यूझीलंडने २-१ अशी बाजी मारली. मात्र आता लक्ष पूर्णपणे टी-२० सामन्यांकडे वळले आहे. भारतीय संघ अनुक्रमे २१, २३, २५, २८ व ३१ जानेवारी या दिवशी न्यूझीलंडशी अनुक्रमे पाच सामने खेळणार आहे. मग ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषकाचे आयोजन केले जाणार आहे. २०२४मध्ये भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वात विश्वचषक उंचावला होता. त्यामुळे भारतापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल.

मुख्य म्हणजे गेल्याच महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेपूर्वी शुभमन गिल भारताचा उपकर्णधार होता. त्या मालिकेत भारताने ३-१ असे यश संपादन केले. मात्र आता गिल भारतीय संघाचा भाग नाही. तसेच विश्वचषकासाठी भारताने १५ खेळाडूंची निवड केलेली असून तिलक वर्मा या मालिकेतील किमान तीन सामन्यांना मुकणार आहे, तर वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेत खेळू शकणार नाही. त्यांच्या जागी रवी बिश्नोई व श्रेयस अय्यर यांना संघात स्थान देण्यात आले आहे. इशान किशनचेसुद्धा दोन वर्षांनी संघात पुनरागमन झाले.

सूर्यकुमारच्या नेतृत्वात भारताने गतवर्षी आशिया चषकाचे जेतेपद मिळवले. मग भारताने ऑस्ट्रेलियालाही त्यांच्याच देशात धूळ चारली. आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका जिंकून भारताने विश्वचषकाच्या तयारीच्या दिशेने योग्य वाटचाल केली. भारताने २०२४च्या टी-२० विश्वचषकापासून एकही टी-२० मालिका गमावलेली नाही. म्हणजेच गेल्या ३५ सामन्यांत भारताने ३० टी-२० लढती जिंकलेल्या आहेत. जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या यांना एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. ते आता टी-२० मालिकेत परतल्याने संघ बळकट होईल.

दुसरीकडे न्यूझीलंडच्या संघातही अनुभवी खेळाडू परतले असून डावखुरा मिचेल सँटनर त्यांचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. मिचेल ब्रेसवेलच्या तंदुरुस्तीविषयी संभ्रम असला तरी डेवॉन कॉन्वे, डॅरेल मिचेल, ग्लेन फिलिप्स असे प्रतिभावान खेळाडू किवी संघाच्या ताफ्यात आहे. फिलिप्सने अर्धशतक झळकावून पुन्हा धोक्याचा इशारा दिला. गोलंदाजीत जेकब डफी व कायले जेमिसन यांची जोडी निर्णायक आहे. मिचेल ब्रेसवेल व मॅट हेन्री हे खेळाडू या लढतीसाठी तंदुरुस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ मालिकेत बरोबरी साधण्यास आतुर असेल. त्यांनी नुकताच भारतात प्रथमच एकदिवसीय मालिका जिंकली.

सॅमसन, इशानकडून सुधारणा अपेक्षित

भारतीय संघात अभिषेक शर्मा व संजू सॅमसन यांचे स्थान सलामीला पक्के मानले जात आहे. तिसऱ्या ते सहाव्या क्रमांकापर्यंत कोणता फलंदाज सामन्याच्या स्थितीनुसार कोणत्या स्थानी येईल, हे सांगणे कठीण आहे. मात्र तूर्तास तिलक संघात नसल्याने इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर खेळणार आहे. पहिल्या लढतीत सॅमसन व किशन आक्रमक खेळण्याच्या नादात बाद झाले. आता त्यांच्याकडून सुधारणा अपेक्षित आहे. तसेच पाचव्या क्रमांकावर अष्टपैलू हार्दिक या मालिकेत भारतासाठी निर्णायक ठरेल. हार्दिक व अक्षर पटेल अनुक्रमे पाचव्या व सहाव्या स्थानी फलंदाजी करतील. सातव्या क्रमांकासाठी शिवम दुबे व रिंकू सिंग असे फलंदाज भारताच्या ताफ्यात आहेत. त्यामुळे भारताची फलंदाजी खोलवर पसरलेली आहे.

भारताची गोलंदाजी उत्तम लयीत

तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा या मालिकेसाठी संघाचा भाग असल्याने गोलंदाजी विभाग आपोआप बळकट होईल. हर्षित राणाने न्यूझीलंडविरुद्ध गोलंदाजीत छाप पाडतानाच आठव्या क्रमांकावर फलंदाजीतही योगदान दिले. मात्र भारतीय संघ तूर्तास अर्शदीप सिंगलाच प्राधान्य देत आहे. अर्शदीपने पहिल्या लढतीत छाप देखील पाडली. वरुण चक्रवर्ती भारताचा प्रमुख फिरकीपटू असेल. मात्र कुलदीप यादवलाही संधी दिली जाणार का, हे पाहणे रंजक ठरेल. तसेच रवी बिश्नोईचा पर्यायही भारताकडे उपलब्ध आहे. भारतीय संघात दुसऱ्या लढतीसाठी कोणताही बदल अपेक्षित नाही.

उभय संघांत आतापर्यंत २६ टी-२० सामने झाले असून भारताने त्यापैकी १५, तर न्यूझीलंडने १० लढती जिंकल्या आहेत. त्यांच्यातील एक लढत टाय झाली होती.

हे महत्त्वाचे

  • रायपूर येथे २०२३मध्ये एकमेव टी-२० सामना झाला होता. त्यावेळी भारताने १७४ धावांचा यशस्वी बचाव करताना २० धावांनी ऑस्ट्रेलियाला नमवले होते.

प्रतिस्पर्धी संघ

  • भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, रिंकू सिंग, जसप्रीत बुमरा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई.

  • न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), मिचेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेवॉन कॉन्वे, जेकब डफी, झॅक फोल्क्स, मॅट हेन्री, कायले जेमिसन, बेवॉन जेकब्स, डॅरेल मिचेल, जेम्स नीशाम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, टिम रॉबिन्सन, इश सोधी, क्रिस्टन क्लार्क.

logo
marathi.freepressjournal.in