पुणे : न्यूझीलंडचा डावखुरा ऑफस्पिनर मिचेल सेंटनरने (५३ धावांत ७ बळी) शुक्रवारी भारतीय फलंदाजांना फिरकीच्या तालावर नाचवले. भारताचा पहिला डाव १५६ धावांत गुंडाळल्यावर न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसअखेर तब्बल ३०१ धावांची आघाडी मिळवली आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघावर तब्बल १२ वर्षांनी मायदेशात कसोटी मालिका गमावण्याचे सावट निर्माण झाले आहे.
पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर सुरू असलेल्या या कसोटीत भारताचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रातच ४५.३ षटकांत १५६ धावांत आटोपला. त्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या डावात ५३ षटकांत ५ बाद १९८ धावा केल्या असून टॉम ब्लंडेल (नाबाद ३०) आणि ग्लेन फिलिप्स (नाबाद ९) यांची जोडी मैदानावर टिकून आहे. किवी संघाने दुसऱ्या दिवसअखेरच ३०१ धावांची आघाडी मिळवलेली असून शनिवारी ते आणखी किती धावांची भर घालणार, हे पाहणे रंजक ठरेल, तर भारतीय संघाच्या किमान पुढील ५० धावांत टिपून ३५० धावांचा पाठलाग करण्याचे त्यांचे उद्दीष्ट असेल.
गहुंजे येथे खेळवण्यात येणाऱ्या या कसोटीत पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा संघ २५९ धावांत गारद झाला. त्यानंतर भारताने रोहितला शून्यावर गमावले. पहिल्या दिवसअखेर भारताने १ बाद १६ धावा केल्या होत्या. तेथून पुढे शुक्रवारी दुसऱ्या दिवसाला प्रारंभ करताना शुभमन गिल व यशस्वी जैस्वाल यांनी सावध सुरुवात केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी रचली. यादरम्यान दोघांना पंचांच्या निर्णयानेही वाचवले. मात्र सँटनरने अखेरीस २२व्या षटकात गिलला ३० धावांवर पायचीत पकडून किवी संघासाठी दिवसातील पहिला बळी मिळवला.
तेथून मग सँटनर व ग्लेन फिलिप्स यांच्या फिरकीच्या जाळ्यात भारताची कोंडी झाली. ३२ वर्षीय सँटनरच्या फुलटॉस चेंडूवर विराट कोहली फसला व ९ चेंडूंत अवधी १ धाव काढून त्रिफळाचीत होत माघारी परतला. फिलिप्सच्या गोलंदाजीवर डॅरेल मिचेलने स्लीपमध्ये यशस्वीचा (३०) उत्तम झेल टिपला. ठराविक अंतराने विकेट पडू लागल्याने तसेच खेळपट्टीही फिरकीपटूंसाठी अधिक लाभदायी ठरत असल्याने भारताचे फलंदाज दडपणाखाली आहे. याचेच प्रतीक म्हणून ऋषभ पंतही १८ धावांवर साधारण चेंडूवर त्रिफळाचीत झाला. तर सर्फराझ खानने (११) सँटनरच्या गोलंदाजीवर सोपा झेल दिला. रविचंद्रन अश्विनही (४) प्रतिकार करू शकला नाही. उपहाराला भारताची ७ बाद १०७ अशी स्थिती होती.
रवींद्र जडेजाने दुसऱ्या सत्रात वॉशिंग्टन सुंदरच्या साथीने संघाला सावरण्याचे प्रयत्न केले. मात्र आठव्या विकेटसाठी ३३ धावांची भर घातल्यावर जडेजाला सेंटनरने पायचीत पकडले व कारकीर्दीत प्रथमच डावात पाच बळी घेण्याचा पराक्रम केला. जडेजाने भारताकडून ४६ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारासह सर्वाधिक ३८ धावा केल्या. मग आकाश दीप व जसप्रीत बुमरा यांना बाद करून सँटनरने बळी सप्तक पूर्ण केले. सुंदर १८ धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडला पहिल्या डावात १०३ धावांची आघाडी मिळाली.
दुसऱ्या डावात मग न्यूझीलंडने आक्रमक सुरुवात केली. कर्णधार टॉम लैथम व डेवॉन कॉन्वे यांनी झटपट ३६ धावा केल्या. सुंदरने कॉन्वेला (१७) पायचीत पकडले. त्यानंतर अश्विनने विल यंगला (२३) बाद केले. भरवशाचा रचिन रवींद्र (९) यावेळी अपयशी ठरला व सुंदरच्या गोलंदाजीवर त्याचा त्रिफळा उडाला. मात्र लॅथमने कर्णधाराला साजेशी खेळी साकारताना १० चौकारांसह ३० वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. सुंदरनेच लॅबमला ८६, तर डरेल मिचेलला १८ धावांवर बाद केले. लॅथम व टॉम ब्लंडेल यांनी पाचव्या विकेटसाठी ६० धावांची भर घालून भारतीय गोलंदाजांना हैराण केले. आता ब्लंडेल व फिलिप्स यांची जोडी अद्याप मैदानावर असून भारतीय फिरकीपटूंविरुद्ध त्यांची कसोटी लागेल. त्यामुळे किवींच्या उर्वरित ५ फलंदाजांना भारताचे गोलंदाज किती लवकर गुंडाळणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे. तर न्यूझीलंड ऐतिहासिक मालिका विजयासाठी उत्सुक आहे.
विराट फुलटॉसवर बाद होणे माझ्यासाठीही धक्कादायक : सँटनर
कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद करणाऱ्या सँटनरनेसुद्धा दिवसाचा खेळ संपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना विराटच्या विकेटबाबत मत व्यक्त केले. "विराट सारख्या अव्वल दर्जाच्या खेळाडूचा फुलटॉस चेंडूवर त्रिफळा उडावल्याने मीसुद्धा आश्चर्यचकीत झालो, तो असे चेडू सहज चुकवत नाही. मात्र त्याची फटक्याची निवड चुकली. संघासाठी निर्णायक क्षणी योगदान देता आल्याने मी समाधानी आहे. मात्र सामना अद्याप संपलेला नाही. दुसऱ्या डावात भारताचे फलंदाज आक्रमण करतील, याची आम्हाला कल्पना आहे. असे सेंटनर म्हणाला, सेंटनरने यापूर्वी २८ कसोटीमध्ये एकदाही डावात किमान ४ बळीसुद्धा मिळवले नव्हते. मात्र भारताविरुद्ध त्याने मिळालेल्या संधीचे सोने केले. त्यामुळे न्यूझीलंडला सध्या भारतातील पहिलावहिला ऐतिहासिक मालिका विजय खुणावत आहे.
- भारताने यापूर्वी १२ २०१२मध्ये इंग्लंडविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका गमावली होती.
- भारताने २००८ मध्ये ३८७ चेन्नईत इंग्लंडविरुद्ध चौथ्या डावात ३८७ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. ही भारतातील कसोटीमधील आजवरची चौथ्या डावातील सर्वोच्च धावसंख्या आहे, है विशेष.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड (पहिला डाव): ७९.१ षटकांत सर्व बाद २५९ भारत (पहिला डाव): ४५.३ घटकांत सर्व बाद १५६ (रवींद्र जडेजा ३८, यशस्वी जैस्वाल ३०, मिचेल सँटनर ७/५३, ग्लेन फिलिप्स २/२६) न्यूझीलंड (दुसरा डाव): ५३ घटकांत ५ बाद १९८ (टॉम लैथम ८६. टॉम ब्लंडेल नाबाद ३०, वॉशिंग्टन सुंदर ४/५६)