आज मुंबईतील वानखेडेवर भारत विरुद्ध न्यूझीलंड असा सामना होता . हा सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी वानखेडेवर गर्दी केली होती. सचिन तेंडुलकरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकदिवसीय सामन्यांमधील ४९ शतकांचा विक्रम आज विराट कोहलीनं भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या सामन्यात मोडला आहे . विराटच्या नावावर आता वनडे क्रिकेटमध्ये ५० शतकं पूर्ण झाली आहेत. विराटच्या या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी विराट कोहलीचं कौतुक आणि अभिनंदन केलं आहे.
"उत्कृष्टता आणि चिकाटीचं उदाहरण म्हणजे विराट कोहली असून हे शब्द सर्वोत्तम क्रीडापटूची व्याख्या आहे. हा उल्लेखनीय टप्पा त्याच्या चिरस्थायी समर्पणाचा आणि अपवादात्मक प्रतिभेचा पुरावा आहे. मी विराट कोहलीचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. विराटनं भावी पिढ्यांसाठी असेच मापदंड तयार करत राहोत” असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.
"एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 वं शतक झळकावण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठल्याबद्दल विराट कोहलीचं अभिनंदन. ही खेळी म्हणजे विराटच्या उत्कृष्ट खिलाडूवृत्ती, समर्पण आणि सातत्याची साक्ष आहे. विराटनं आपला खेळ अजून नवीन उंचीवर न्यावा. संपूर्ण देशाला तुझा अभिमान आहे," असं ट्विट अमित शहा यांनी केलं आहे.एवढेच नव्हे तर अनेक बॉलीवूडचे कलाकार यांनी देखील विराट कोहलीला शुभेच्या दिल्या आहेत.