

इंदूर : तारांकित फलंदाज विराट कोहलीने (१०८ चेंडूंत १२४ धावा) रविवारी एकदिवसीय कारकीर्दीतील ५४वे शतक साकारले. मात्र अन्य फलंदाजांची त्याला पुरेशी साथ लाभली नाही. त्यामुळे भारताला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. डॅरेल मिचेल (१३१ चेंडूंत १३७ धावा) व ग्लेन फिलिप्स (८८ चेंडूंत १०६ धावा) यांनी झळकावलेल्या शतकांच्या बळावर न्यूझीलंडने तिसऱ्या सामन्यात भारताला ४१ धावांनी नमवून मालिकेत २-१ असे यश संपादन केले.
इंदूर येथील होळकर स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या ३३८ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ ४६ षटकांत ४९६ धावांत गारद झाला. विराटने १० चौकार व ३ षटकारांसह शतक साकारले. त्याला नितीश रेड्डी (५३) व हर्षित राणा (५२) यांनी अर्धशतके झळकावून एकवेळ साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र विराट बाद झाला व भारताचा पराभव पक्का झाला.
न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आला असून उभय संघांत तीन एकदिवसीय व पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. एकदिवसीय मालिकेच्या निमित्ताने चाहत्यांना पुन्हा एकदा रोहित शर्मा व विराट कोहली यांना एकत्रित खेळताना पाहण्याची संधी मिळत आहे. दुखापतीतून सावरलेल्या शुभमन गिलचे या मालिकेसाठी भारतीय संघात पुनरागमन झाले असून तोच कर्णधारपद भूषवत आहे. तसेच श्रेयस अय्यरही संघात परतला आहे. गिल मानेच्या तसेच पायाच्या दुखापतीमुळे एक महिना संघाबाहेर होता. तर श्रेयसला ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या यांना मात्र फेब्रुवारीत होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने विश्रांती देण्यात आली आहे. एकदिवसीय प्रकाराचा विश्वचषक थेट २०२७मध्ये असल्याने भारताकडे त्याकरिता संघबांधणी करण्यासाठी तूर्तास पुरेसा वेळ आहे.
दरम्यान, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेलासुद्धा मुकणार आहे. त्याच्या जागी लेगस्पिनर रवी बिश्नोईचे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच तिलक वर्माच्या जागी मुंबईकर श्रेयस अय्यरला संघात स्थान देण्यात आले आहे.