
दुबई : दुबईच्या रणांगणात भारताच्या कोहलीने विराट रूप धारण करताना १११ चेंडूंत नाबाद १०० धावांची खेळी करत पाकिस्तानची दाणादाण उडवली. त्याने झळकावलेल्या ५१व्या एकदिवसीय शतकाच्या बळावर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत रविवारी पाकिस्तानला ६ गडी आणि ४५ चेंडू राखून नामोहरम केले. या विजयासह भारताने अ-गटात अग्रस्थान मिळवतानाच उपांत्य फेरीतील स्थान जवळपास पक्के केले. तसेच पाकिस्तानवरील आयसीसी स्पर्धांमधील वर्चस्व अबाधित राखले.
दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या अ-गटातील या सामन्यात पाकिस्तानने दिलेले २४२ धावांचे लक्ष्य भारताने ४२.३ चार फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले. विराटने चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिले तसेच आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील एकंदर ८२वे शतक साकारले. संघाला जिंकण्यासाठी २ धावांची, तर स्वत:च्या शतकासाठी ४ धावांची गरज असताना विराटने खुशदील शाहच्या ४३व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर चौकार लगावून थाटात भारताच्या विजयासह शतकावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे विराटलाच सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. या विजयासह भारताने अ-गटात ४ गुणांसह अग्रस्थान मिळवले आहे. आता रविवार, २ मार्च रोजी भारताची न्यूझीलंडशी गाठ पडेल. पाकिस्तानला मात्र न्यूझीलंडनंतर भारताकडूनही पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.
गेल्या काही वर्षांपासून बिघडलेल्या राजकीय संबंधांमुळे आयसीसी स्पर्धा अथवा आशिया चषकाच्या निमित्तानेच चाहत्यांना भारत-पाकिस्तान या दोन संघांमधील थरार पाहता येतो. त्यातच २०१७ मध्ये झालेल्या अखेरच्या चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानने अंतिम फेरीत भारताला नमवले होते. त्यामुळे यावेळी भारताला त्या पराभवाचा वचपा घेण्याची उत्तम संधी होती. त्या दृष्टीनेच भारताने पूर्ण लढतीत खेळ केला. पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवावने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली.
बाबर आझम व इमाम उल हक यांनी चांगली सुरुवात केली. मात्र हार्दिक पंड्याने बाबरचा (२६) अडसर दूर केला. त्यानंतर अक्षर पटलेने इमामला धावचीत केले. यानंतर रिझवान व सौद शकील यांनी तिसऱ्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी रचली. मात्र त्यांनी यासाठी तब्बल १४४ चेंडू घेतले. त्यामुळे पाकिस्तानची धावगती खालावली. अक्षरनेच रिझवानचा (४६) त्रिफळा उडवला, तर हार्दिकने शकीलचा (६२) अडसर दूर केला. त्यानंतर पाकिस्तानची फलंदाजी ढेपाळली. कुलदीप यादवने एकाच षटकात दोन फलंदाजांना माघारी पाठवले. पाकिस्तानचा संघ ४९.४ षटकांत २४१ धावांत गारद झाला.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने कर्णधार रोहित शर्माला लवकर गमावले. रोहितने १५ चेंडूंत २० धावा केल्यावर शाहीन आफ्रिदीने त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंत विराट व शुभमन गिल यांची जोडी जमली. या दोघांनी नेत्रदीपक फटके लगावताना दुसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी रचली. अब्रार अहमदने अफलातून चेंडूवर गिलचा ४६ धावांवर त्रिफळा उडवला. मात्र त्यानंतर मुंबईकर श्रेयस अय्यर व विराटच्या जोडीने पाकिस्तानला हैराण केले.
श्रेयसने ५ चौकार व १ षटकारासह एकदिवसीय कारकीर्दीतील २०वे अर्धशतक साकारले. विराट-श्रेयसने ११४ धावांची भागीदारी रचली. खुशदीलने श्रेयसला बाद केले. मग हार्दिकही (८) फटकेबाजीच्या नादात बाद झाला. मात्र अक्षरच्या साथीने विराटने भारताला विजयरेषा ओलांडून दिली. विराटने नोव्हेंबर २०२३ नंतर प्रथमच एकदिवसीय प्रकारात शतक झळकावून तमाम भारतीयांचा आनंद द्विगुणित केला. आता यापुढेही संघ कामगिरीत सातत्य राखून चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावेल, अशीच आशा आहे.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान : ४९.४ षटकांत सर्व बाद २४१ (सौद शकील ६२, मोहम्मद रिझवान ४६; कुलदीप यादव ३/४०, हार्दिक पंड्या २/३१) पराभूत वि.
भारत : ४२.३ षटकांत ४ बाद २४४ (विराट कोहली नाबाद १००, श्रेयस अय्यर ५६, शुभमन गिल ४६; शाहीन आफ्रिदी २/७४)
सामनावीर : विराट कोहली